You are currently viewing पालकमंत्री रवींद्र चव्हाण येताच मतदारसंघाचे चित्र पालटले

पालकमंत्री रवींद्र चव्हाण येताच मतदारसंघाचे चित्र पालटले

पालकमंत्री रवींद्र चव्हाण येताच मतदारसंघाचे चित्र पालटले

युतीचा धर्म पाळत भाजपा पदाधिकारी मंत्री केसरकरांच्या प्रचारात झाले सक्रिय

सावंतवाडी:
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण गुरुवारी दुपारी सावंतवाडीत दाखल झाले अन् सावंतवाडी मतदारसंघातील चित्रच पालटले. गेले काही दिवस भाजपाचे पदाधिकारी काही उघडपणे काही अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार आणि भाजपचे पदच्युत युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत होते. त्यामुळे नाम. दिपक केसरकर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाल परब यांना अर्ज दाखल करू नका,असा केलेला दूरध्वनी रेकॉर्ड करून विशाल परब व फडणवीस या दोघांमधील संभाषण व्हायरल झाल्याने वरिष्ठ पातळीवरून हालचालींना वेग आला. मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी युतीचा धर्म पाळून नाम.केसरकर यांच्या प्रचारात सक्रिय न होता विशाल परब यांचा प्रचार करत असल्याचे निदर्शनास आल्याने मुंबई येथून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट सावंतवाडी गाठली आणि सावंतवाडी येथील राजवाड्यात नाम.केसरकर यांच्या उपस्थितीत भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेत सर्वानाच कानपिचक्या दिल्या.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनंतर काल परवापर्यंत विशाल परब यांच्या अवतीभवती फिरणारे भाजपाचे कार्यकर्ते युतीचा धर्म पाळत नाम. केसरकरांच्या प्रचारात सक्रिय झाले.
सावंतवाडीच्या राजवाड्यात नाम.केसरकर,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुतीचे प्रामाणिकपणे काम करून महायुतीचे उमेदवार नाम. दिपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे सांगितले. त्याचप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत जेवढे मतदान खास.नारायण राणे यांना झाले तेवढे किंबहुना त्यापेक्षाही जास्त मतदान प्रत्येक विभागातून महायुतीचे उमेदवार नाम.केसरकर साहेबांना झाले पाहिजे. असा सूचक इशारा देत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. त्यामुळे गेले काही दिवस विशाल परब यांच्या मागे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा हात आहे या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून शिवसेना व भाजप खऱ्या अर्थाने एक झाल्याचे चित्र मतदारसंघात उभे राहिले आहे.
नाम.रवींद्र चव्हाण यांच्याकडून कानपिचक्या मिळाल्याने लपूनछपून विशाल परब यांच्या सोबत असणारे भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आता नाम.केसरकर यांचे काम करणार असल्याचे बोलू लागले आहेत. राजन तेली भाजपामध्ये असताना तेली यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सावंतवाडीतील काही लोकप्रतिनिधी “चव्हाण साहेबांचा आदेश आहे, आम्ही आता नाम. दिपक केसरकर यांचेच काम करणार” असे उघडपणे सांगत आहेत. तर बांदा येथील देखील भाजपा कार्यकर्ते नाम. दिपक केसरकर यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाम.रवींद्र चव्हाण यांची सावंतवाडीला दिलेली भेट नाम. दिपक केसरकर यांच्यासाठी फलदायी ठरल्याचे दिसून येत आहे.
नाम.रवींद्र चव्हाण हे भाजपा मधील वजनदार नेते असून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांचा आधारही आहे आणि कार्यकर्त्यांवर वचक सुद्धा आहे. जुने भाजपा कार्यकर्ते रवींद्र चव्हाण यांचा स्वभाव चांगलेच ओळखून आहेत; त्यामुळे त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याचा धोका पत्करणार नाहीत तर राणेंसोबत नव्याने भाजपा मध्ये दाखल झालेले कार्यकर्ते राणेंच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे जे पदाधिकारी, कार्यकर्ते विशाल परब यांच्या सोबत फिरत होते त्यांना वेसण घालण्यासाठी नाम.रवींद्र चव्हाण यांनीच नाडी ओढणे आवश्यक होते आणि आज झालेही तसेच रवींद्र चव्हाण यांनी शब्दांचा प्रहार करताच सर्व पदाधिकाऱ्यांनी नाम.केसरकर यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा