You are currently viewing दिवाळी माझी ! आता पूर्वी सारखी वागत नाही….!!!

दिवाळी माझी ! आता पूर्वी सारखी वागत नाही….!!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दिवाळी माझी ! आता पूर्वी सारखी वागत नाही….!!!*

 

फराळ जसा जसा

डब्याचा तळ गाठतो

तशी तशी दिवाळी

वाकोल्या दाखवत निघून जाते..!

काय मग दिवाळी कशी गेली !

आली अन् दबक्या पावलांनी निघून निरंजनाच्या ज्योतीत विझून गेली!

 

दिवाळी माझी पूर्वी सारखी वागत नाही

हल्ली आता दिवाळी

पूर्वी सारखी वागत नाही ..!

रांगोळीच्या कळीदार ठिपक्यांत

विचार मग्न कासव दिसत नाही ..!

चाळीस ठिपक्यांच्या गालीच्यात

फुलं ही उमटत नाही …!

 

भाजलेल्या रव्याचा खमंग सुवास

अफवे सारखा पसरतही नाही ..

डोक्याच खोबरेल तेल

आता केसांना चिटकतही नाही

थंडीची हलकी कुजबुज

कानात ऐकू येत नाही ..!

 

दिवाळीच दिवाळी सारखी

आता वागत नाही

पहाटे उठून कुणी

आंघोळ करत नाही ..!

नरकासूर ही आता

कुणाला छळत नाही …!

 

आंघोळ करायला लावणारी आजी

आता घरात असेलच असही नाही ..!

जुनी माणसं जुन्या आठवणीतून

पुढे सरकतही नाही ..!

 

दिवाळी माझी

दिवाळी सारखी वागत नाही ..!

फराळ जसा जसा

डब्याचा तळ गाठतो

तशी तशी दिवाळी

माझ्यातून निघून जाते ..!!!

 

बाबा ठाकूर

माझ्या गुलकंद या संग्रहातून..!

प्रतिक्रिया व्यक्त करा