*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सातबारा….चित्रगुप्ताचा…!!*
जमीनीवरच्या रेघोट्या मोजत
तहसीलदार सातबारा रेखाटतो
आकाशातही त्याचवेळी तुमचा
सातबारा चित्रगुप्त मांडतो..
माझं-माझं करीत जगणा-यांचा
ढगांत…हिशोब मांडला जातो
सारंकांही इथलं संपल्यानंतर
वरती…परतावा द्यावा लागतो..
जमवता-जमवता सारं आयुष्य
पडद्याआड निघून जात
शेवटी जमवलेलं सातबा-यावरचं
दुस-याच्याचं पदरात पडतं..
फोटोवरचा हार वाळताचं
कचेरीत… सातबारा कोरा होतो
वरती… यमाच्या कचेरीत
तुमचा..सातबारा चित्रगुप्त मांडतो
रजिस्ट्रार..सातबारा कोरा करताचं
यम..नव्याने सातबारा भरतो
रेकॉर्ड तुमचा पडताळून
चित्रगुप्त..सातबा-यावर रेघोट्या मारतो
उद्रेकाच्या मुळाशी सातबारा
शेवटी…पदरात पडतं तरी काय?
तुमचा..हिशोब तर मांडला जाणारचं
प्रश्न..सातबा-याचं पुढं होत तरी काय ?
बाबा ठाकूर