*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*पाडवा (बलीप्रतिपदा)*
दिवाळीचा चवथा दिवस म्हणजे बलीप्रतिपदा. या दिवशी बळी राजाची पूजा केली जाते.बळी राजा राक्षस कुळातला.तो शेतकर्यांचा राजा.तो दानशूर,प्रजाहितवादी आणि सत्यवचनी होता.तो सात्विक वृत्तीचा ,दानी राजा होता. लोक देवाच्या आधी बळीराजाचे नाव घेऊ लागले.
त्यामुळे देव नाराज झाले.ते भगवान विष्णुकडे गेले.आणि त्यांनी बळीविरुद्ध साकडे घातले.विष्णुने वामनावतार धारण केला .आणि ते बळीकडे याचक म्हणून गेले.बळीने तेव्हां “तुला काय हवे ते माग ..”असे
वामनास सांगितले.
“फक्त त्रिपाद भूमी हवी मला ..”वामन उत्तरला.
बळी मनातून समजला होता.पण शब्द दिला तो पूर्ण व्हायलाच हवा.
“भूमी दिली ..”असे म्हणून त्याने शब्दपूर्ती केली.
वामनाने एका पावली स्वर्ग व्यापला,दुसर्या पावली पृथ्वी व्यापली.तिसरे पाऊल कुठे ठेऊ विचारताच बळीने मस्तक
पुढे केले.वामनाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात ढकलले.
बळीची दानशूरता पाहून वामन आनंदला. त्याने बळीला पाताळाचे राज्य दिले.आणि अशा दात्याची सेवा करण्यासाठी त्याने द्वारपालाचे काम स्वीकारले.
तो दिवस म्हणजेच कार्तीक शुद्ध प्रतिपदा!व विक्रम संवत्सराची सुरवात.
विष्णुने वामनाला वर दिला की “जो कुणी बलीप्रतिपदेला
दीपदान करेल त्यास यमयातना होणार नाहीत,आणि
लक्ष्मी तिथे वास करेल….”
विष्णुच्या या कृत्यामुळे लक्ष्मी खूश झाली व तिने
विष्णुचे औक्षण केले.अन् विष्णुने तिला रत्न ,माणके भेटीदाखल दिले.
म्हणून या पाडव्याच्या दिवशी पती पत्नीला ओवाळते.
व पती पत्नीला भेट देतो.
श्रीकृष्णाने याच दिवशी गोवर्धन पूजेला सुरवात केली.
आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
त्यामुळे पाडव्याला कृष्ण गोपीका, गोवर्धनच्या चित्ररुपी प्रतीकांची पूजा केली जाते…
हा पाडवा शुभकार्यासाठी साडेतीन मुहुर्तापैकी एक
मानला जातो.
या सणाचे सार असे आहे की बळीराजाच्या दानशूरपणामुळे अपात्रीही दान दिले जात होते.आणि त्यामुळे संहार आणि विनाशाचे भय निर्माण झाले होते.
तो संहार टाळण्यासाठी विष्णुला वामनावतार घेऊन बळीला समज द्यावी लागली.वरवर जरी हा देवांचा पॉवर गेम वाटत असला तरी तो आवश्यक होता.
मात्र त्याच वेळी बळीच्या सत्वशीलतेलाही दाद दिली गेली.हीच आपली परंपरा आहे.रामायणातही रामाने रावणाचा संहार करुन त्याचे राज्य बिभीषणाला दिले.
यातून हेच शिकायचे की गुणांचेही संतुलन राखावे.
तसेच त्याची कदरही करावी.
सण डोळसपणे साजरे करावेत.पौराणिक कथांच्या मूळ गाभ्या पर्यंत जावे…
सौ. राधिका भांडारकर..