*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित श्री गजानन विजय ग्रंथ सारांश*
*****२० *****
कोणत्यारुपे येतील गजानन |
कैसे सांगावे, कैसे देतील दर्शन |
गणपतकांतेच्या स्वप्नी बोधन |
परमार्थ साधण्या वेचावे धन ||१||
लक्ष्मण जांजळाला स्टेशनी |
आणिले टाळ्याला खूण गोष्टींनी |
प्रतिवर्षी आपुल्या घराला |
पुण्यतिथीचा प्रारंभ केला ||२||
जोशी दमणी घाली नदीत |
अचानक नदी चढली |
आता सारे ‘ बाबांच्या ‘ हातात |
आपोआप पैलतटा पावली ||३||
राजाराम कवर निघे तेल्हार्यासी |
न घेता प्रसादासी |
भुले गाडीवान सरावासी |
चुकला वाट, परतला शेगावासी ||४||
प्रसादाचा अवमान भोवला |
रतनसाच्या नवसास पावला |
शेरणी वाटली, मुलगा वाचला |
तीर्थ-अंगारा गुण देई चंद्रभागेला ||५||
‘ मी लेखणी ‘ म्हणती दासगणू |
लिहिते लिहविते गजाननू |
आम्ही दास किती गणू |
थोरवी आपली कैसी वानू? ||६||
*************************** १७ *****
पुरविण्या भक्त मनोरथ |
निघे गजाननस्वामी समर्थ |
स्टेशनावरी सज्ज अग्निरथ |
पण झाला, झाला अनर्थ ||१||
बायकांच्या डब्यात खरा |
बैसला करुनी त्वरा |
स्टेशनमास्तर विनवी आदरा |
उतरले, नजाता मलकापुरा ||२||
शिष्य भास्कर झाला दंडित |
घटनेस तोच कारणभूत |
महाराज तर जीवनमुक्त |
वृथा आग्रह नसे उचित ||३||
संत आल्याचे कळता संताशी |
महताबशा आला भेटावयासी |
हुकुमासरशी गेला पंजाबासी |
मशिदीच्या कामास कृपाराशी ||४||
विहिरीतील जलतीर्थांनी |
अभिसिंचले उफाळूनी |
सुखावले गजानन |
एकाग्रचित्ते करा मनन ||५||
********************** *****१८ *****
बालपणापासून भक्तीचा लळा |
बायजेसी तरुणपणी आला फळा |
संसार लिहिला नव्हता भाळी |
गुरुसी शरण जिता कोण छळी ||१||
डाॅक्टर भाऊ कवराला |
जेव्हा दुर्धर फोड झाला |
तीर्थ अंगारा पाठविला |
गजानन लेकरासाठी धावला ||२||
गेले आषाढी एकादशीशी |
समर्थ मंडळींसह पंढरीसी |
बापुना एकला दर्शनाविना |
साधूच भेटवी रुक्मिणी रमणा ||३||
शीर ठेवता पायावरी |
आनंद भरला अंतरी |
पुन्हा पाहे जो वरी |
समर्थ दिसले पहिल्यापरी ||४||
मरीने ग्रस्त एक माळकरी |
सद्गुरु हात शिरावरी |
त्यासी बोले मधुरोत्तरी |
चल, टाळले गंडांतरी ||५||
पदस्पर्शे मृत कुत्रे उठविले |
कर्मठ ब्राह्मणास कळले |
साक्षात् सोवळे रुप धाडिले |
ईश्वराने, अज्ञान फिटले ||६||
**************************** १९ *****
झाले काशिनाथपंता संत दर्शन |
पाहिली जीवनमुक्ताची लक्षणं |
धन्य भाग्य दिसले चरण |
नुरले काही मागणं ||१||
गोपाळबुटी होता भाविकही |
समर्था नेई आपुल्या गेही |
शेगावीच्या लोकांस पाही |
अहंपणे करी मनाई ||२||
धनाच्या जोरावरी |
काय संता बांधता येई?|
ताकदीच्या जोरावरी |
हरी पाटील त्यास परत नेई ||३||
श्री वासुदेवानंद सरस्वती |
श्री सच्चिदानंद गुरुमूर्ति |
दृष्टादृष्ट दोघा देई आनंद |
बाळास कर्म-भक्ती-योग विशद ||४||
संताने अंतर्ज्ञानेजाणून |
खळ्याचे केले संरक्षण |
त्यास अज्ञाने भोंदू जाणून |
मारता, शिपायास आले मरण ||५||
ईश्वरेच्छेने संत अवतरती |
जन कल्याणाचे व्रत चालविती |
जीवन समाप्ती ही क्रमप्राप्ती |
विठ्ठलासी गजानन अनुज्ञा मागती ||६||
समाधिस्थ झाला अवलिया |
भाद्रपद शुद्ध पंचमीसी |
मनापासून आळवलिया |
उभा सतत भक्तांच्या पाठीशी ||७||
जय जय गजानना |
हे नरदेही नारायणा |
योगीराज दयाघना |
गाऊ भजना, करु समाराधना ||८||
***** २१ *****
उंचावरून झोक जाता |
मजूरास कोणी झेलला? |
खांब बाउच्या शरीरा पडता |
मुक्ती मिळाली आश्रित भूताला ||१||
रामचंद्र पाटला घरी |
गोसावी वेषे कोण जेवला?
बनविला मठाचा कारभारी |
उपदेशही देऊन गेला ||२||
समाधी भव्य सुंदर बांधली |
धर्मकृत्येही बहु झाली |
निष्ठा गजाननपदी जडली |
चरित्र पारायणे होऊ लागली ||३||
कळसापरी चमकणारा |
हा अध्याय एकविसावा |
भक्तांचा लळा पुरविणारा |
‘ श्री गजानन विजय ‘ एक विसावा ||४||
करुनी त्रिवार वंदना |
बोलली सुभाषी रसना |
विजयाच्या आनंदघना |
मान्य करा कवना ||५||
********************************
|| पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ||
||सीताकांत स्मरण जय जय राम ||
|| पार्वतीपते हर हर महादेव ||
*********************************
*समाप्त *
**********************************