You are currently viewing गॅरंटी

गॅरंटी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*

 

*गॅरंटी*

 

तुमच्या वास्तूची गॅरंटी घेतली आहे का?

“गॅरंटी” शब्द सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. बऱ्याच दुकानात लिहिलेले असते, “कोणत्याही मालाची गॅरंटी नाही” असा माल,सामान आपण घेतो का? मला वाटतं नाही. बहुतेक वेळा कापड दुकानात आपण हे पाहतो की, दुकानदार ज्या कापडाची गॅरंटी घेत नाही ते कापड आपण घेत नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना आपण ज्याचे पैसे देतो त्याची गॅरंटी असेल तरच ती वस्तू, माल, सामान आपण प्राधान्याने खरेदी करतो.

अहो अगदी शंभर रुपयाच्या आत असणारा बल्बवर सुद्धा आपण दुकानदाराकडून एक्सपायरी डेट लिहून घेतो.फॅन, मिक्सर या वस्तूंपासून ते टीव्ही, फ्रिज, एसी यासारख्या महागड्या वस्तूंचे गॅरंटी कार्ड आपण त्यांची गॅरंटी संपल्यानंतरही जपून ठेवतो. या सगळ्यांचा आपण इतका विचार करतो. खरं तर या वस्तू आपल्याला जीवनात दोन-तीन वेळा घ्याव्या लागतात. कारण त्यांची गुणवत्ता मर्यादित आहे.

मग जे घर किंवा जी वास्तू आपण एकदाच बांधतो किंवा घेतो, लाखो रुपये देऊन बांधतो. काहीजण तर कर्ज काढून घर बांधतात. तर काही आपल्या आयुष्याची पुंजी लावून स्वतःच्या मालकीचे घर बांधतात. घरासाठी जागा पाहतानाही आपण खूप विचार करतो एवढेच नाही तर घर बांधताना लागणारी प्रत्येक बाब वाळू, सिमेंट, विटा, लाकूड, टाइल्स इत्यादी बऱ्याच बाबी दुकानात जाऊन, भाव, गुणवत्ता पाहूनच खरेदी करतो.

शेवटची पायरी म्हणजे घर बांधकाम कोणाला द्यायचे हेही आपण अनेकांचा सल्ला घेऊन ठरवतो. मग जर एवढ्या सगळ्या बाबींचा आपण सखोल विचार करतो तर ज्याला घर बांधायला सांगितले त्याच्याकडून, घराच्या बांधकामाचे, लाकडी फर्निचर ची, टाइल्सची गॅरंटी घ्यायला नको का? लाखो रुपये खर्च केल्यानंतरही घराची दारे, खिडक्या, चौकट किती वर्षे व्यवस्थित राहतील? घराचा रंग किती टिकेल? घराच्या टाइल्स किती वर्षे व्यवस्थित राहतील? हे लेखी घ्यायला नको का?

मला वाटतं अगदी तारीख, महिना नसला तरी साधारण बांधकाम झाल्यानंतर किमान पाच वर्ष दहा वर्षांतील गॅरंटी असावी.

बऱ्याच वेळा वास्तु झाल्यानंतर, दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच स्लॅब गळायला लागतो. टाइल्स वर येतात. लाकडी दारे, खिडक्यांना फटी पडतात. अशावेळी एवढा खर्च करूनही आपल्याला पुन्हा खर्च करावा लागतो.म्हणून इंजिनीयर किंवा त्या त्या संबंधित व्यक्तींकडून आपण गॅरंटी लिहून घेतली पाहिजे. गॅरंटी लिहून घेतली असली म्हणजे वास्तूमालक निर्धास्त असतो. आणि संबंधित व्यक्तीही आपल्या कामाची गुणवत्ता समोरच्याला दाखवू शकते. अर्थात ती गॅरंटी लिहून घेताना इंजिनीयरने आणि वास्तुमालकाने देखील दोघांच्या सामंजस्याने नियम व अटी लिहूनच घ्याव्यात. अगदी घराप्रमाणेच ऑफिस, कार्यालय, दुकाने, हॉटेल्स इत्यादी प्रत्येक वास्तूची गॅरंटी आपण संबंधित व्यक्तींकडून घ्यायला हवी. त्या वास्तूमधील पीओपी, फर्निचर, नळ कनेक्शन, इलेक्ट्रिक कनेक्शन्स इत्यादी सगळ्या महागड्या बाबींची संबंधित व्यक्तींकडून आपण गॅरंटी घ्यायलाच हवी. कारण या बाबी पुन्हा पुन्हा होत नाहीत.

बघा पटत असेल तर आपल्या वास्तूची गॅरंटी घ्या. आणि काही वर्ष निर्धास्त रहा.

 

सौ. सीमा श्रीराम शास्त्री मोडक

मुख्याध्यापक

डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार

प्रतिक्रिया व्यक्त करा