देशाला कौतुक वाटेल असे काम या जिल्ह्यात करू : दीपक केसरकर
जोरदार शक्तिप्रदर्शनाने मंत्री दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
खासदार नारायण राणे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती
सावंतवाडी
सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढताना मी इथून हॅट्ट्रिक केली आहे. आता चौथ्यांदा देखील विजयी होईन. खा. नारायण राणे माझ्या सोबत आहेत. कोकणचा विकास करण्यासाठी आता निलेश व नितेश राणेंची सोबत मला लाभत आहे. त्यामुळे देशाला कौतुक वाटेल असं काम या पर्यटन जिल्ह्यात आम्ही करू, असा विश्वास महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे,शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, सौ. पल्लवी केसरकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरेगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री केसरकर म्हणाले, बापुसाहेब महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे शताब्दी वर्ष आहे.राजघराण्याचा आशीर्वाद आम्हाला आहे.
युवराज लखमराजे भोंसले आमच्यासोबत आहेत तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची साथ आम्हाला आहे. त्यामुळे महायुतीच्या संघटित शक्तीच्या जोरावर आमचा एकतर्फे विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केसरकर चौथ्यांदा आमदार होणार : सौ. पल्लवी केसरकर
सावंतवाडी : दीपक केसरकर यांनी केलेल्या कामामुळे जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. सलग तिनवेळा निवडून देत येथील जनतेने इतिहास रचला आहे. जनतेचे आशीर्वाद व प्रेम यामुळे ते चौथ्यांदा बहुमताने निवडून येतील अशी खात्री आहे असा विश्वास माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी कुटुंबासह नामनिर्देशन पत्र दाखल केल. यानंतर सौ. केसरकर बोलत होत्या. यावेळी त्यांची कन्या सौ. सोनाली वगळ, जावई सिद्धार्थ वगळ व नातू उपस्थित होते.