*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*दिवाळीची चाहूल..*
दिवाळी…
अंधाराकडून उजेडाकडे म्हणजेच तिमिराकडून प्रकाशाकडे नेणारा दिव्यांचा उत्सव..दीपोत्सव..!
पहा पहा दिवाळी आली..
लक्ष दिव्यांची आरास झाली..
सडा रांगोळीने सजले अंगण..
फराळ करुनी तृप्त झाले मन..
दिवाळी येता अशा चारोळ्या स्फुरतात अन् तन मन प्रसन्न होतं, आनंदून जातं.. दिवाळीचा हा उत्सव म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा अन् अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक..! दिवाळीच्या सणाचे खास वैशिष्ट्य अंधारावर, तिमिरावर मात करणारे दिवे..!
घर, कार्यालय, देवालय सर्वत्र दीप प्रज्वलित करून “अंधारापेक्षा प्रकाश अधिक शक्तिशाली आहे” हे दाखवितात; अन् अंधारावर दिव्यांच्या तेजाने विजय मिळवितात.. घर अंगण पणत्यांच्या उजेडात लख्ख उजळून निघते..दारावर अन् घरावर दिव्यांच्या माळा लावल्या जातात..माळेतील ते लुकलुकणारे दिवे जणू नभांगणीचे तारेच अंगणी उतरून लुकलुकतात असाच भास होतो.. घरावर रंगबिरंगी आकाश कंदील तेजाने झगमगतात.. जणू जीवनातील अंधकार अपेक्षांचे आशावादी दिवे लावून दूर सारला जातो.. बाजारातून मातीच्या पणत्या आणून त्यांना कुंचल्यातून साकारणाऱ्या सुंदर रंगसंगतीने रंगवून सुशोभित करायचं.. बांबूच्या काठ्यांना सारख्या आकारात कापून धारदार सुरीने गुळगुळीत करायचं जसं की गालांवर हात फिरवल्यानंतर मुलायम वाटतं अगदी तसंच सुळसुळीत करायचं अन् पांढऱ्या शुभ्र तमल धाग्याने कसकन् आवळून आकाश दिवा बांधायचा.. दिवाळीत जसे आपण नवनवे कपडे घालतो अगदी तशाच रंगीत कागदांच्या सहाय्याने आकाश दिव्याला नटवायचं, सजवायचं.. टोकदार कोपऱ्यावर फुलांचे गुच्छ अन् लांब शेपट्या लावून हवेशी खेळवायचं…आणि दिवाळीच्या शामल सांजेला रंगबिरंगी रंगांच्या रांगोळीने हसलेलं घराचं अंगण दिव्यांच्या प्रकाशाने तेजोमय करण्यासाठी सज्ज करायचं.. हे काम आपल्याशिवाय दुसरं करणार कोण..?
दिवाळीच्या पूर्वी चाहूल लागते ती घराच्या साफसफाईची… वर्षभर घराच्या कानाकोपऱ्यात साचून राहिलेला मळ, केरकचरा झाडून पुसून काढायचा..आणि सुपलीत भरून घराच्या बाहेर दूरवर फेकून द्यायचा..जणू रुसून फुगून बसलेली घरातील नात्यांमधील नाराजी नाती गोंजारून, गोड बोलून नि मानसन्मान जपून गर्व, अभिमानाला स्वभावातून काढून टाकून पुन्हा एकत्र आणायची तशीच..! भिंतीवर लटकून असलेली, घराच्या छपरामध्ये अडकून लोंबकळत असलेली जळमटे उंच झाडूने झाडून टाकायची.. ही जळमटे असं तर सुचवीत नसतील ना की, आपल्या माणसांबद्दल आपल्याच मनावर साचलेली जळमटे दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या मनाने अलगद काढून टाकावी..! मग त्यातही आपण पुढेच रहायचं..कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष, कर्ता पुरुष बनून..!
वर्षभर भिंतींच्या अंगावर साचलेली धूळ, डाग, चट्टे साबणाच्या पाण्याने पुसून काढावेत अन् जसे आपल्या अंगावर दिवाळीत नवे कपडे चढवतो, सोन्याचांदीचे अलंकार घालतो तसाच नवा रंग देऊन भिंती रंगवायच्या.. रंगरंगोटी केल्याने घर कसं छान दिसतं.. दागदागिण्यांनी मढलेल्या नव्या नवेली नवरीसारखं.. सजलेल्या घरात मिठाई, चकली, शंकरपाळी, अनारसे, करंज्या, तिखट कांदा पोहे आणि गूळ खोबरे घातलेले गोड पोहे नसतील तर दिवाळीची मजा कशी काय येईल..?
मग ठरतो बेत फराळ करण्याचा.. बाजारातून सर्व सामान आणून सुरू होते तयारी फराळ बनविण्याची.. खसखशित दळलेल्या बेसन पिठात गाईचे तूप घालून कढईत खमंगदार भाजून घ्यायचं.. मग किसलेला नैसर्गिक गूळ आणि सुका मेवा बारीक करून मिसळून घ्यायचा.. देशी गाईच्या गरम केलेल्या शुद्ध तुपात लाडू वळून घ्यायचे..वरून छोटासा बेदाना लावून सजवून लाडू ठेवायचा.. लाडू वळता नाही आले तरी आपण गोल गोळे करून मदत करायचीच… कारण चव घेण्यासाठी पहिला लाडू आपल्याकडेच येणार…
खमंगदार चकलीचं भाजणीचं पीठ गरजेनुसार लाल तिखट घालून मळून घ्यायचं. वरून स्नेहाचं गरम मोहन घालून चकली करण्यासाठी थोडा वेळ तसच ठेऊन द्यायचं.. कढईत तेलाची स्निग्ध धार सोडली की, चकलीच्या भांड्यातून छान गोलाकार चकली गाळली जातात.. गाळण्याचे काम कष्टाचे..पण आपण ते सुद्धा लिलया पार पाडायचे.. तापलेल्या तेलात कुरकुर करत चकली पाण्यात सूर मारावा तशी उतरतात.. निळ्याशार पाण्याच्या तलावात उड्या मारून मुलं पोहण्याचा आनंद घेतात तशीच चकली यथेच्छ डुंबतात..नाकी तोंडी फेस काढतात.. तांबूस लालसर होईपर्यंत मजेत कोलांटी उडी मारत पोहतात.. अन् झाऱ्याने अलगद काढली जातात सुपात.
मैद्याच्या पिठाचा पिठी साखर, वेलची पूड घालून तयार शंकरपाळी करण्यासाठी तयार झालेल्या मोठ्या गोळ्याला लाटण्याने गोल लाटले जाते.. उभे आडवे चिर देऊन काजू कतली सारख्या छान शंकरपाळ्या तयार होतात.. एक एक शंकरपाळी तेलात सोडताच सुटणारा खमंग वास सुकलेल्या तोंडात..जिभेवर लाळेचा पूर आणतो.. मग काय धीर धरतय का आपलं तोंड…हळूच एक दोन चकल्या, शंकरपाळ्या चव घेण्याच्या बहाण्याने शांत विसावतात पोटात..अन् तृप्तीचा ढेकर देतात..
नवीन तयार झालेल्या वालयच्या भाताला उकडून घ्यायचं न्हाणीवर अन् सकाळी सकाळी गाठायची पोह्यांची गिरण..
मग काय..? उभं राहायचं रांगेत एक एक पिशवी पुढे सरकवत.. अन् पोहे कांढुन मिळताच डोळे मिटून पोट भरून घ्यायचं पोह्यांच्या वासानेच.. त्या नवीन पोह्यांचा वास मन तृप्त करतो..आणि दिवाळी दिवशी पोहे खाण्याची आतुरता वाढते.. हल्ली नेहमीच पोहे नाश्त्यात असले तरी दिवाळीत वालय भाताचे भिजवलेले पोहे किसून मिसळलेला गूळ अन् त्यावर शुभ्र धवल नारळाचे किसलेले खोबरे घातले की याची गोडी अवीटच..!
घरात लक्षीचा सदैव वास रहावा म्हणून केले जाणारे लक्ष्मीपूजन धनधान्य सफलता देते…घर दीप धुपाच्या सुगंधाने भरून जाते.. पाडवा..भाऊबीज..म्हणजे नात्यांची रेशमी विण अधिक कणखर, घट्ट करणारे भावनिक सण..! पाडव्याला पत्नीसाठी प्रेमाची साडी घेताना आईसाठी तेवढ्याच तोलामोलाची साडी आणायची हे गणित मुळीच विसरुन चालणार नाही.. अन्यथा…
काही बोलण्याची सोय नसतेच मग वेळ निघून गेल्यावर..
वेळेवरच सावध झालेलं बरं असतं म्हणा..!
लाडाची बहीण मात्र समजदार असते.. भावाने प्रेमाने दिलेली साडी पाहून भावावरच्या मायेनेच डोळे भरते.. भाऊ पण बहिणीसाठी साडी घेताना मागचा पुढचा विचार कधीच करत नाही.. आपल्या बहिणीच्या आवडीची साडी मिळावी म्हणून दिवाळीच्या आठ दहा दिवस आधीच दुकानातून लाडक्या बहिणीच्या अंगावर शोभेल अशी सुंदर साडी आणून कपाटात ठेवतो..अन् भाऊबीजेला तिला द्यायच्या ओवाळणीची तयारी आधीच करून मोकळा होतो..
मुलांसाठी कपड्यांपेक्षा आवडीचे असतात ते फटाके… फुलबाज्या, पाऊस, चक्र, हवेत उंच उडणारे बाण. चार दिवस आधीच फटाके आणून त्यांना सूर्यनारायणाचा मुखडा दाखवावा लागतो…नाहीतर पावसाळ्याच्या दमट हवेत नरम पडलेले फटाके असतील तर फुसका बार ठरतील.. बाण तर हवेत उंच जाण्या ऐवजी कुणाच्या तरी घरात.. पडवीत घुसतील…त्यासाठी मीच असतो मुलांसोबत काळजी वाहू..संकटी धावणारा..संकटमोचक!
म्हणून म्हणतो.. वेळ दवडू नका, तयारीला लागा..
कारण..,
दिवाळीची तयारी; मुळीच नसते साधी..
जवळ येता दिवाळी; करावी सर्वात आधी..
दिवे, पणत्या, निरांजने; करून ठेवा स्वच्छ..
तयारी पाहून खुलतील चेहरे; जसे पुष्पगुच्छ..
🖋️© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६