You are currently viewing दत्ता सामंत यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

दत्ता सामंत यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

मालवण :

शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलेले दत्ता सामंत यांची कुडाळ – मालवण – कणकवली या विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्ता सामंत यांना प्रदान केले. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना निरीक्षक आ. रवींद्र फाटक, संजय आंग्रे आदी उपस्थित होते. काल रात्रीच मुंबई येथे दत्ता सामंत यांनी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे शिवसेनेत दत्ता सामंत यांना मोठे पद मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी दत्ता सामंत यांची नियुक्ती करण्यात आली असून सामंत यांना कुडाळ मालवण व कणकवली विधानसभा कार्यक्षेत्र देण्यात आले आहे.

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी श्री सामंत यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या कुडाळ व कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्राचे व्यक्त करण्यात आला आहे. हे नियुती पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्ता सामंत यांना सुपूर्द केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा