You are currently viewing शुद्धलेखन…चर्चा सत्र

शुद्धलेखन…चर्चा सत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सम्माननीय सदस्य लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*शुद्धलेखन…चर्चा सत्र*

शुद्धलेखन हा भाषेचा असा दागिना आहे की जो तिला घातला गेलाच पाहिजे. खानदानी महिला जशी साजेशा अलंकारांनी नटून सुंदर दिसते तद्वत भाषाही तिच्या मूळ अलंकारांनी सुशोभित होते. अलंकरण नसलेली स्त्री जशी उघडीबोडकी दिसते त्याप्रमाणे विरामचिन्हे नसतील तर भाषाही उघडीबोडकी दिसेल. कुठे
थांबायचे, किती वेळ? कुणाशी बोलतो आहोत का? काना मात्रा वेलांटी पहिला दुसरा उकार हे सारे भाषेवर झालेले संस्कार आहेत. त्या संस्कारांसह ती आली तरच तिचे बोलणे, उदा. आरोह अवरोह, संवाद, प्रश्नांकीत, उपरोध,खोचक हे सारे भाव तिच्या विरामचिन्हातून कळून तिची नजाकत, रूसवा, प्रेमभाव, राग ह्या भावनांचा परिपोष होऊन ती कानाला व हृदयालाही गोड वाटते.

हे सारे अलंकार नसतील तर.. ती अगदी नीरस सपक बेचव होऊन जाईल व तिला लिहिण्याचा, वाचण्याचा, ऐकण्याचा जो अपरंपार असा आनंद आहे तो पूर्ण निघून जाईल व बरोबरीने आयुष्याचा अर्धा आनंद कमी होईल. भाषा आमच्या जगण्याचं मोठं साधन व अनमोल संपत्ती आहे. ज्याला बोलता येत नाही त्याला भाषेचं दु:ख विचारा.कोणतीही भाषा उत्तमप्रकारे बोलता येणे हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा अनमोल पैलू आहे. आणि ती तिच्या अलंकारांसह उच्चारता येणे हा तुमचा व तिचाही स्वाभिमान जपणे आहे.भाषा वापरतांना ती शद्धस्वरूपात वापरली जाणे हा तिचा अधिकार आहे, तसे नसेल तर तो तिचा अवमान आहे. आणि कुणालाही तिचा अपमान करण्याचा अधिकार नाही, तो करण्याचा कुणी प्रयत्न करू नये अशी तिची मनोमन इच्छा आहे. तिच्या या इच्छेचा सन्मान करणे साहित्यिक म्हणवणाऱ्यांची मोठीच जबाबदारी आहे. एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणे म्हणजे शिव धनुष्य पेलणे होय. म्हणून मराठीच्या व्याकरणाचे शिवधनुष्य मोठ्या जबाबदारीनेच
आपण पेलले पाहिजे तिथे कुठलीही तडजोड
क्षम्य नाही.

आपण माणूस आहोत. कुणीही सर्वगुणसंपन्न नाही हे मान्य करूनही तसे बनणे आपले कर्तव्य आहे. किमान एकवचन अनेकवचन मुळाक्षरे त्यांचे स्पष्ट उच्चार इतके तर आपले
कर्तव्य आहेच ना? प्रमाण मराठी भाषेबरोबरच प्रादेशिक बोली भाषा लिहितांनाही तिचे व्याकरण सांभाळले जात नाही हा अक्षम्य गुन्हा आहे. बोलीभाषेच्या नावाखाली काहीही खपवणे योग्य नाही. तिथेही वचन काना मात्रा आहेतच की! बोली भाषेचे वापरातले शब्द तसेच नीट लिहीले गेले पाहिजेत हा माझा नेहमीच आग्रह आहे. बहिणाबाईंच्या कवितेत कुठेही लिंगवचनाच्या चुका नाहीत. म्हणूनच ती खड्यासारखी मध्येच टोचत नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. नाही तर .. ? अत्र्यांसारख्या महान लेखकाने हे सोने प्रकाशात आणले असते काय? अत्रे भाषेबाबत कुणालाही क्षमा करणारे साहित्यिक नव्हते. भाषेचा महान जाणकार असा तो अष्टपैलू साहित्यिक होता हे आपण लक्षात ठेवा.

आम्ही खेड्यात शिकलो.कुणीही नीट व्याकरण शिकवल्याचे माझ्या स्मरणात नाही. चाचपडत तिचे बोट पकडत वाटचाल करण्याचा माझा प्रयत्न आजही संपलेला नाही.तिच्या वाटेवर चालणारी मी एक वाटसरू तिला विचारत विचारत पुढे जात आहे. आपण असेच वागत राहिलो तर…चुकांच्या दलदलीत आपली भाषा बरबटल्या शिवाय राहणार नाही व तिला भवितव्यही
उरणार नाही हे नक्की.. ती चूक आपण करायला नकोच..

धन्यवाद मंडळी…

आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा