You are currently viewing समुद्राची गाज ऐकतांना….

समुद्राची गाज ऐकतांना….

*मनस्पर्शी साहित्य परिवारच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*समुद्राची गाज ऐकतांना….*

 

समुद्राची गाज ऐकतांना

मनात उठते काहूर

आठवणी घालतात पिंगा

ऐकून दूरवरचा सूर

 

सायंकाळी शांत समयी

सूर्य मावळतीला जाई

अशावेळी समुद्र त्याला

हलकेच आपल्या कवेत घेई

 

उसळणाऱ्या लाटा त्या

आदळती किनाऱ्यावर

वाळू शंख शिंपले तेव्हा

पसरवून टाकतात दूरवर

 

गाज समुद्राची ऐकतांना

तांडव करतात आठवणी

वाटे दडलेल्या आठवणी

उघड कराव्या त्याच क्षणी

 

शांत समयी आवाज तो

धडकी भरवतो उरात

आठवणींचा सारा पसारा

गिळून टाकतो क्षणात

 

तेव्हा होतं आपलं मन

समुद्रासारखं अगदी शांत

माघारी फिरतो जेव्हा आपण

होतो ताजेतवाने अन् निवांत

 

नाही आवाज गाजेचा

गर्दी उसळणाऱ्या लाटांची

समुद्राला असे फक्त आस

सूर्योदय उद्याचा पाहण्याची

 

@ अरुणा गर्जे

नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा