आयुष्याच्या द्वितीय पर्वात पाऊल ठेवताना, ज्याला [Second Inning] असे म्हटले जाते त्याचा शुभारंभ इतका सुरेख होईल याची कधीच कल्पना केलेली नव्हती. कोल्हापूरांत श्रीमहालक्ष्मी आणि जोतिबांचा आशिर्वाद लाभतोच ते सामर्थ्य बळ वेगळेच असते. समाजांतील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती, संस्था यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करता करता जन्मदिवस कसा सरला समजलेच नाही.‘ज्ञानमुद्रा’ च्या विद्यार्थिनी विनिता, आदिती, अक्षरा, आरोही, आराध्या यांनी उत्तम नियोजन करत मला हा अनपेक्षित आनंद दिला. त्यांचे कौतुक करायला शब्द कमी पडत होते. या सर्वांसोबत सुखाचे क्षण अनुभवताना मला भाची अनुश्री-माहेश्री यांची उणीव भासली. दूर अंतरामुळे नाहीतर या चिवचिवाटांत त्यांचाही समावेश झाला असता. फोन संपर्क, संदेश यांवर समाधान मानत असताना त्यांनी पाठवलेल्या केकने या दिवसाचा गोडवा वाढवला. सध्या कधी ऊन, पाऊस, तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण आहे. या कौटुंबिक सोहळ्याला बाहेरच्या निसर्गानेही साथ दिली. मुलींनी केलेल्या हौसेला घनांनी गर्जत गर्जत संगीत दिले. मनांला गारवा देणाऱ्या सरीवर सरी बरसल्या. थोड्या वेळानंतर वातावरणांत पुन्हा बदल झाला. पश्चिमेकडे ढगाआडून दर्शन देणारा भास्कर तर पूर्वेकडे साकारली इंद्रधनुष्याची पूर्ण कमान. सप्तरंगांची विलोभनीय उधळण, त्याक्षणी मन मोहरले, “पुढील जीवनाला जणू प्रतिकात्मक संदेश लाभला आहे.”
© मेघनुश्री – लेखिका,पत्रकार
मोबाईल : ७३८७७८७५१२