You are currently viewing राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली, त्याच चिन्हावर लढण्याची संधी

राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली, त्याच चिन्हावर लढण्याची संधी

*राणे साहेबांच्या सावलीमध्ये जसे बोलतील तसे, प्रश्न न विचारता सोबत राहिलो*

*डॉ. निलेश राणे यांचा कुडाळ येथे भरगच्च पत्रकार परिषदेत संवाद*

 

कुडाळ ( विभावरी परब) : राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली, ज्या चिन्हावर झाली, आज मला त्याच चिन्हावर काम करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणार,याचा आनंद आणि समाधान आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जे काही संबंध आहेत, राहिले, ते पुढेही राहतील. कधीही बदल होणार नाही. असा संवाद माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात भरगच्च पत्रकार परिषदेत साधला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपा नेते डॉ. निलेश राणे बुधवारी २३ सप्टेंबरला कुडाळ येथे ४ वाजताा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, राकेश कांदे, आनंद शिरवलकर, पप्या तवटे, दीपक नारकर, उपस्थित होते.

डॉ. निलेश राणे म्हणाले, भारतीय जनता पक्षात खूप रिस्पेक्ट मिळाला. प्रेम दिलं, काम करण्याची शिस्त मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं, अडचणी आल्या तेव्हा त्यातून बाहेर काढलं, पक्षामध्ये स्थान दिलं. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही भावाप्रमाणे सांभाळलं. भाजपामध्ये असंख्य नेते आहेत, ते माझ्या जीवाभावाचे आहेत.

राणे साहेबांच्या सावलीमध्ये जसे बोलतील तसे, प्रश्न न विचारता मी त्यांच्या बरोबर राहिलो. असेही डॉ. निलेश राणे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा