बांद्यातील “हिट अँड रन” प्रकरणातील संशयितचा शोध घ्या – ठाकरे शिवसेनेची मागणी
पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर…
बांदा
येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील संशयितचा लवकरात-लवकर शोध घेण्यात यावा तसेच सीमेवर गाळेल गावातून राजरोसपणे होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांच्या नेतृत्वाखाली बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक श्री. खंडागळे यांची भेट घेत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले कि, बांदा शहरात भरधाव वेगात वाहने चालवीण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे स्थानिकांच्या तसेच पादचाऱ्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील संशयित अद्यापही मोकाट असून पोलीसांनी त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा.
सिंधुदुर्ग गोवा सीमेवर गाळेल येथून मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू महाराष्ट्र राज्यात येते. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी. तसेच यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. बांदेश्वर मंदिर चौकातील सीसीटीव्ही बंद असून ते लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी साई काणेकर, ओंकार नाडकर्णी, बिपीन येडवे, अनिल नाटेकर, राजदीप पावसकर, धनेश नाटेकर, अजय महाजन, ज्ञानेश्वर येडवे, भाऊ वाळके आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.