You are currently viewing खरोखर आपले जीवन दु:खी झाले आहे काय ?

खरोखर आपले जीवन दु:खी झाले आहे काय ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*खरोखर आपले जीवन दु:खी झाले आहे काय?*

 

खूप विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. माझ्या लहानपणातील काही गोष्टी सांगते.मी

लहान असतांना आईला कामात ज्या बायका

कामात मदत करत असत त्यांना आईने काहीना काही दिलेले पोहोचवायला मी जात

असे. मग त्यांच्या घरात थोडे रेंगाळत गप्पा मारत असे. एकदा गेले तर त्या आजी तळहातांवर भाकरी घडवत होत्या व ती पीठ

पातळ झाल्यामुळे कोलमडत होती. मी गंमत

पहात होते. चूल पेटलेली, मातीची एकवटी ठेवलेली व आजी भाकरी घडवते आहे.

मी म्हणाले,”जरासं पीठ टाकनां आजी”. आजी म्हणाली “ पीठ सरी गे व बैन, इतलंज व्हतं”.

पीठ शिल्लक नव्हते. लहान असल्यामुळे तेव्हा काही कळले नाही पण आता विचार करते की, दु:खी होती का ती

आजी? मला तर तेव्हा तसे दिसले नाही? ती मला दु:खी दिसली नव्हती.कारण मला

वाटते, आज आपल्या नशिबात एकच भाकरी

आहे, ती सुद्धा खूप आहे, ती नसती तर.. पाणी

पिऊन झोपावे लागले असते हे तिला माहित होते. म्हणजे आहे ती परिस्थिती तिने स्वीकारलेली होती. कदाचित घरात धान्य असेल पण कामावर गेल्यामुळे गिरणीत जायला वेळ मिळाला नसेल काय सांगावे?

म्हणजे तिने परिस्थितीशी जमवून घेतले होते,

म्हणून ती दु:खी नव्हती. तिच्या फार अपेक्षाच

नव्हत्या. आज एवढी भाकरी आहे ना? उद्याचे

उद्या पाहू..

 

म्हणजे मग माणसाने अपेक्षा ठेवू नये काय?

अवश्य ठेवाव्या? का ठेवू नये? फक्त आपल्या

आवाक्यातील ठेवाव्या.अवाच्यासवा स्वप्ने पाहिली व आपल्या पंखात बळ नसेल तर?

आपण कोसळणारंच ना? त्यामुळेच मी म्हणते

दु:खी व्हायचे की सुखी हे आपल्या हातात आहे. आपण आपली सुखदु:खे ठरवू शकतो.

सत्ता, हव्यास, स्पर्धा, इगो, इर्षा, द्वेष, असूया,

दुस्वास, हेवादावा, कपट ही सारी दु:ख देणारी सामुग्री आहे.

 

उलट प्रेम सौहार्द दया करूणा सहानुभूती भक्ती नीती सदाचार सद् गुण या सगळ्या सुखाकडे

नेणाऱ्या गोष्टी आहेत. यातल्या कोणत्या निवडायच्या याचे स्वातंत्र्यही आपल्याला आहे.

प्रश्न आहे तो आपण कोणता रस्ता निवडतो याचा.अती हव्यास आपल्याला सर्वनाशाकडे नेतो, तसेच द्वेषही सर्वनाशाकडेच नेतो. कौरव

पांडव व महाभारताचे खूप मोठे उदा.आपल्या

समोर आहे. पाच गावे जरी दिली असती तरी

शंभर कौरव व लाखो जनता मेली नसती. पण

माणसाचा स्वत:च्या सामर्थ्यावर अनाठायी

विश्वास असतो व माणूस इथेच फसतो.रामायण महाभारत ही आपली महाकाव्ये जीवनाचे यथार्थ दर्शन घडवतात.

पण” इतिहासातून आम्ही काही शिकत नाही हेच आम्ही शिकतो.” प्रत्येक मागची गोष्ट, मागचा

इतिहास, युद्धे आम्हाला खूप काही शिकवतात

पण आम्ही काही धडा घेतच नाही हेच आमचे

वैशिष्ट्य आहे.इतिहासातील परकीय आक्रमणे ही सत्तापिपासूपणाची उदा. आहेत

तशीच एकमेकांचे बांध कोरून आपली नसलेली शेती आपण लाटणे ही सुद्धा साम्राज्य वाढवण्याचीच नीती आहे. कृती सारखीच आहे लोभीपणाची. भांडणे होऊन

दु:ख पदरी येणार नाही तर काय होणार?

 

विनोबाजी म्हणतात, माणूस दु:खाच्याच

शोधात असतो कारण प्रत्येकाचा आनंदही

वेगळाच असतो ना? कुणाला जिलबी खाण्यात तर कुणाला दारू पिण्यात आनंद

असतो. आता दारू पिऊन कुणाचे कल्याण

झाले सांगा. मग आपण स्वत:च दु:ख विकत

घेत असू तर जबाबदार कोण?

 

म्हणजे आपण सुखीच राहू शकतो पण आपणच दु:ख शोधूनच आणतो तर …!

त्याला कोण काय करणार? मुळात माणूस

हाच आनंद आहे. आपणच आनंदाचे झाड

आहोत. पण म्हणतात ना..”तुझे आहे तुजपाशी

परी जागा विसरलासी” अशी आपली गत आहे. रोज कष्ट करावे, भाकरी कुठे पळून जात

नाही. अहो, किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो. रोज सकाळी सूर्य न चुकता तुमच्यासाठी येतो. त्याची ठरली वेळ कधी चुकली नाही. तो येताच तुमच्यासाठी कळ्या

फुले उमलतात, हसतात, वारा लगेच सुगंध

तुमच्यापर्यंत आणतो. सुखच सुख आहे हो.

फुले फळे पिके धान्य झाडे पक्षी ऊन सावली

पाऊस थंडी निळे आकाश ढग हे सारे सुख

नाही तर काय आहे? यांच्या शिवाय तुम्ही एक

दिवस तरी राहू शकता का? नाही.. ते सतत

तुमच्या बरोबर आहेत म्हणून तुम्हाला त्यांची

किंमत नाही हेच खरे आहे. अहो, नुसता मोर पाहिला तरी व लांबून धबधबा पाहिला तरी

किती आनंद होतो.

 

आता कष्ट करून मिळते ते सुख वेगळेच असते. हे घर मी माझ्या कष्टाने बांधले हे सांगण्यात माणसाला किती सुख होते. आपण

कष्ट करून मुलांना शिकवतो वाढवतो यात

आपल्याला किती सुख मिळते.मी कष्ट करून

ही जमीन विकत घेतली हे किती अभिमानाने आपण सांगतो. अहो, आंधळ्याला विचारा..

डोळे नसण्याचे काय दु:ख असते व पांगळ्याला

विचारा पाय नसण्याचे काय दु:ख असते.

म्हणजे आपण हातीपायी धड असणे हे सुद्धा

किती सुखाचे आहे हो! रोज देवाचे आभार माना. देवा, तू मला एवढे सुंदर शरीर दिले. वाचा दिली, दृष्टी दिली. आता मी कष्ट करून

सुखी होईल.

 

पण आपल्याला दु:खाचीच स्वप्ने पडतात त्याला कोण काय करेल? मला मला मला नि

मलाच फक्त.. हेच माणसाच्या दु:खाचे कारण

आहे नि ते त्याने स्वत: निर्माण केले असेल तर

मग आपण खरोखर दु:खी आहोत का?

याचे उत्तर प्रत्येकाने शोधावे म्हणजे कळेल

कोण सुखी व कोण दु:खी आहे.

 

मुळात आपण दु:खी नाही, असण्याचे कारण नाही. देवाने सुखी माणूस निर्माण केला, आपल्या साऱ्या अनमोल देणग्या देऊन पण तो

त्यांचा दुरूपयोग करत असेल तर…

याला उत्तर नाही.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा