You are currently viewing गढूळलेली लोकगंगा

गढूळलेली लोकगंगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*गढूळलेली लोकगंगा*

 

*गढूळली ही लोकगंगा*

*माजला भ्रष्टाचार*

*वणव्यात जन होरपळले*

*सर्वत्र हाहाःकार*

१३४ कोटी लोकांच्या या भारत देशाला भ्रष्टाचार नावाचा फार मोठा कलंक लागलेला आहे. ज्या भारतात पवित्र गंगामाई अविरत वाहत आहे, ज्या देशाची जमीन अत्यंत सुपीक असून या आपल्या मायभूमीत निसर्गाचा समृद्ध खजिना भरलेला आहे, जेथे रामराज्य झाले, शिवरायांचे स्वराज्य झाले, ज्या राज्यातील प्रजाजन, रयत अत्यंत सुखी होती, किंबहुना रयतेचे सुख तेच राज्याचे सुख अशीच भावना होती, जी संतांची भूमी म्हणून वंदनीय आहे, त्याच भूमीत आज मीतीला या कलियुगात काय चालू आहे?

आज आपण लोकशाहीत वावरतो आहोत. लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही! ही झाली लोकशाहीची नुसती व्याख्या! खरंच आहे का हो ही अशी लोकशाही? जनतेने उमेदवार निवडून दिला की झाले का सारे? निवडून आलेल्या उमेदवाराने त्याची जबाबदारी नको का सांभाळायला?

समाजात गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग पडलेले स्पष्ट दिसत आहेत. गरीब हा अधिकाधिक गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत. *गरीबी हटाव* असे नुसते नारे दिल्याने काय होणार?

कुटुंब नियोजनाला महत्त्व आहेच, पण आजची परिस्थिती पाहता मध्यमवर्गीय माणसाला एकापेक्षा अधिक मुलांना जन्म देणे आर्थिक दृष्ट्या परवडेनासे झाले आहे. एकाच मुलाचे शिक्षण करणे, त्याला उत्तम प्रकारे वाढविणे हे त्यांचे स्वप्न पूर्ण करताना कित्येकांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे. काय करणार काय? मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश द्यायचा झाला तर डोनेशनच्या नावाखाली लाखो रुपये या संस्था लुबाडतात. त्यातही पूर्ण रकमेची पावती मिळणार नाही. रोख रकमेची गणतीच नाही.

अंडर द टेबल ठेवल्याशिवाय सामान्य जनतेची कामे होत नाहीत. मी सुद्धा हा अनुभव घेतला आहे. माझ्या मुलाला पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यावेळी आमच्याकडे चक्क दहा हजार रुपयाची मागणी केली होती. इसवी सन १९७४ चा तो काळ. त्यावेळी दहा हजार रुपयाची किंमत बरीच जास्त होती.

माझ्या वडिलांच्या जागेत एका पक्षश्रेष्ठीच्या मदतीने त्यांच्याच भाडेकरूने घुसखोरी केली होती. वडील तक्रार घेऊन पोलिसात गेले, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी चक्क नकार दिला. कोर्टात एकही वकील त्यांची केस घेण्यास तयार नव्हता. पहाडा सारखे माझे वडील शेवटपर्यंत लढले, पण मनाने मात्र पार खचून गेले होते. भ्रष्टाचाराच्या या राक्षसाने त्यांचा असा घात केला होता.

या देशात एकही असे क्षेत्र नाही की जेथे भ्रष्टाचार नाही. एखादा मध्यम वर्गातील मुलगा किंवा मुलगी उत्तम गुणांनी उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवण्यासाठी बाहेर पडली तर तिला सुद्धा याच परिस्थितीला सामोरे जावे लागते. कितीतरी मुलांनी कर्ज काढून शिक्षण घेतलेले असते. कुठून द्यावा त्यांनी यांना पैसा? लाच घेणे हा जसा गुन्हा आहे, तसाच लाच देणे हाही गुन्हा आहे, पण परिस्थिती हे जाणत नाही आणि मिळणारी नोकरी जाऊ नये म्हणून कष्टाने मिळवलेला पहिला पगार या अधिकाऱ्यांच्या घशात जातो.

स्वतःचा व्यवसाय करताना तर पावलोपावली या भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते. परवाना पत्र काढायचे झाले, तर दहा खेटे घातल्याशिवाय ते सहजासहजी मिळणारच नाही. तुमची फाईल ती जड करून दिल्याशिवाय पुढे सरकतच नाही. घर बांधायला घ्या, घराचा प्लॅन पास करताना तीच तऱ्हा. बँकेतून कर्ज घेण्यासाठी जा, इलेक्ट्रिकचे मीटर बसवणे असो, गॅसचे कनेक्शन जोडणे असो, नाहीतर टेलिफोन बंद पडलेला असो, (आता टेलिफोन राहिले नाहीत, मोबाईल वरच सर्व कामे होतात, परंतु आपण सर्वांनीच हा अनुभव घेतलेला आहे.) सहजगत्या, रीतसर कुठलेच काम होत नाही.

वैद्यकीय क्षेत्रही यातून सुटलेले नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. साध्या सर्दी, खोकला, तापासाठी डॉक्टर कडे गेले तर रक्त तपासा, लघवी तपासा, छातीचा एक्स-रे काढा वगैरे लांबलचक यादी डॉक्टरांकडून आपल्याला मिळते. पुन्हा या तपासण्या डॉक्टरांनी सांगितलेल्या लॅबमधूनच आपल्याला कराव्या लागतात. ही गोष्ट सत्य आहे की सिटीस्कॅन, एम आर आय वगैरे चाचण्यांमुळे रोगाचे निदान पटकन होते आणि वेळेवर औषधोपचार मिळाल्याने संभाव्य धोका टळतो.

परंतु प्रश्न असा आहे की प्रत्येकच वेळी या अशा चाचण्यांची गरज असते का?

इथे अमेरिकेत तर सर्दी, खोकल्यासाठी, अगदी ताप आल्यावरही कोणी डॉक्टरांकडे जात नाही. ताप आटोक्यात आणणारी टायलेनाॅल, मोटरीन सारखी औषधे घेतली की झाले. इथले डॉक्टरच सांगतात की व्हायरल इन्फेक्शन ला काही इलाज नाही. फक्त ताप जास्त चढू नये एवढी काळजी घ्यायची. तीन-चार दिवसानंतर उतार पडलाच नाही तर मात्र डॉक्टरांकडे जायचे, कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन असण्याची शक्यता असते. आणि ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही मेडिकल्स दुकानात मिळू शकत नाहीत.

तर अशी ही भारतीय लोक गंगा सतत बरबटलेल्या वाटेवरून प्रवास करत आहे, या भ्रष्टाचाराच्या वणव्यात अडकून पडली आहे,

हा चिखल साफ करण्यासाठी आजच्या पिढीने खंबीर राहिले पाहिजे. काय वाट्टेल ते झाले तरी मी कधीच कोणाला लाच देऊन माझे काम करवून घेणार नाही असा दृढनिश्चय प्रत्येकाने केला तर परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, नाहीतर यातून बाहेर पडण्याची वाट शोधतच आपण भस्मसात तर होणार नाही ना?

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा