You are currently viewing माझे गाव कापडणे…

माझे गाव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*३९) माझे गाव कापडणे…*

 

मंडळी, तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करीत

आहात हे तुमच्या येणाऱ्या दूरध्वनी वरून मला

कळते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून

तुमचे फोन मला येतातच पण तुम्हाला माहित

आहे का,What’s App च्या अनेक समुहातून

माझ्यावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव होतो आहे व त्या मुळे मी सुखावले तर आहेच पण

मी बरं लिहिते असं वाटून माझा आत्मविश्वास

प्रचंड वाढला आहे.अभिप्राय आला नाही असे

कघीच होत नाही. मी खूप खूप आनंदात आहे

सुहृदांनो.. असेच प्रेम कायम राहिल अशी अपेक्षा करते.

 

आता कापडणे गाव, रूढी, परंपरा, नातलग,

लग्न अशा बऱ्याच विषयांवरचे लेखन तुम्ही

वाचले, आनंद घेतला. माझ्या वडीलांची तर

तुम्हाला चांगलीच ओळख होऊन भाऊ किंवा

अप्पा म्हणून तुम्ही त्यांना ओळखू लागला आहात. खरेच, फार कमालीचे गृहस्थ होते माझे वडील. फक्त सातवी शिकले होते तरी

प्रचंड हुशार होते ते. आणि धडाडी व धाडसही

कमालीचे होते. कधीच कुणाला घाबरले व दबले नाहीत कारण कामच चोख होते ना!

 

असो, आता आपण जरा त्यांच्या स्वातंत्र्य

लढ्याकडे वळणार आहोत बरं. हो.. ते तर

त्यांचे फार महत्वाचे काम आहे ना? खऱ्या

अर्थाने त्यांनी देशाचाच संसार केला व स्वातंत्र्य

मिळाल्या नंतरच ते कापडण्यात स्थिरावले.आणि मग समाजसेवेत स्वत:ला त्यांनी झोकून दिले.

 

आता आपण वाचणार आहोत त्यांचा स्वातंत्र्याचा लढा. त्यांची मूळ कागदपत्रे व

काही फोटो ही माझ्याकडे आहेत. त्यावरून

मी हा लढा तुमच्या समोर जीवंत करणार आहे.

चला तर मग.. वाचू या त्यांनी देशासाठी केलेला स्वातंत्र्य संग्राम व त्याग..

 

.स्वातंत्र्य लढ्यातील माझे वडील….

 

देशप्रेमाने झपाटलेली अशी ही माझ्या वडिलांची विष्णुभाऊ पाटील यांची पिढी होती.

सर्वांनीच घरादारावर निखारा ठेवला होता .

एकच ध्येय होते … स्वातंत्र्य … बस …

भूमीगत असतांना माझ्या आई वडीलांना व

इतर साऱ्या क्रांतिकारकांना कोणते दिव्य

करावे लागत होते हे मी लहान असतांना

आईच्या तोंडून वेळोवेळी ऐकले आहे. पण

तेंव्हा कुठे एवढी समज होती की, हे फार

महत्वाचे आहे ?चिमठाणा खजिना लूट

प्रकरण ऐकण्यापूर्वी आपण हे क्रांतिवीर

किती झपाटलेले होते व कसे दिवस काढत

होते हे समजून घेणे फार आवश्यक आहे.सुरूवाती पासूनच माझी आई अक्का

उर्फ सुंदरा बाई पाटील वडिलांच्या बरोबर होती.

माझा मोठा भाऊ यशवंत हा तेंव्हा खूप लहान

होता म्हणून त्याला हिरापूर ता . चाळीसगांव

येथे ठेवले होते. माझी आजी व आईची आत्या

गंगूमाय त्याचा सांभाळ करीत.( जो पुढे मुंबईला सिव्हील डिफेन्स मध्ये राजपात्रीत अधिकारी म्हणून निवृत्त झाला). विष्णू भाऊ पाटील व इतर सारे क्रांतिकारक लपत छपत, पोलिसांचा डोळा चुकवत, सारखा वेष बदलत आपले कार्य करत होते. या सर्व क्रांतिकार्यात

 

माझे काका ,(आजोबांसह आमचे सारे कुटुंब,

आत्या सुद्धा),सामिल होते.

दौलत सीताराम पाटील..व ..

माझे सासरे,रामदास रामचंद्र पाटील, कमखेडे

शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडून सामिल

झालेले होते. तेंव्हा पासूनच त्यांची व माझ्या

वडीलांची ओळख होती . असे ज्ञात अज्ञात

शेकडो वीर आहेत की त्यांची नावे काळाच्या

ओघात लुप्त झाली आहेत , त्यांना ही आपण

प्रणाम करू या. सर्वांचा नामोल्लेख करणे मला केवळ अशक्य आहे हे आपण समजून घ्यावे.

 

पकडले जाण्यापूर्वी किती तरी वेळा ही मंडळी

माझ्या मामाच्या शेतात हिरापूरला भूमिगत

राहून काम करत होती. मामा त्यांना गुपचूप

शेतात भाकऱ्या पोहोचवायचे. त्यांना सतत जागा बदलावी लागायची. कारण पोलिसांचे खबरे त्यांना माहिती पुरवायचे . त्यामुळे पोलिसांची धाड पडण्यापूर्वीच ही मंडळी पसार होत असत.किती तरी दिवस ही क्रांतिकारक मंडळी मी आज ज्या भागात राहते नाशिकच्या कॅालेजरोडला थत्ते नगर मध्ये भूमिगत होते. व तेथून काम करत होते.त्यांना कामानिमित्त सतत गांवे बदलावी लागत असत.

 

साताऱ्याला आटपाडी भागातही आई वडीलांच्या सोबतच होती . ती म्हणायची..

रातोरात घर बदलावे लागायचे. संसार असा

नव्हताच. कागदांवरच आम्ही जेवायचो. देशा

साठी केवढे झपाटलेपण होते..? ती वडीलां

बरोबर भारतभर फिरली थेट उत्तरप्रदेशा पर्यंत.

तेथिल हिंदी सुद्धा ती छान बोलायची. आम्हाला बोलून दाखवायची.(यू पी तली

एक/दोन भांडी आजही माझ्या संग्रही आहेत,

आईची आठवण म्हणून मी ती जपून ठेवली

आहेत .तर आजचे चंद्रपूर तेंव्हा त्याला चांदा

म्हणत .. चांद्या पासून बांद्यापर्यंत सतत ही

मंडळी पोलिसांचा ससेमिरा चुकवत धावत

असत .चांद्यालाही खूप दिवस त्यांचा मुक्काम

होता . कुठे चांदा.. कुठे कापडणे.. घरदार नाही,

संसार असा हातावर .. आणि आपण आज

सगळे स्थिरस्थावर असतांना जवळच्या गावाला बदली झाली तरी नाखुष असतो. कुठे ते…

कुठे आपण .. असो ..

 

देश स्वतंत्र व्हावा म्हणून जीवावर उदार होऊन

ही मंडळी लढत होती.चहार्डी येथे श्री. व्यंकटराव धोबी आणि शंकर पांडू माळी यांनी भरणा लुटीचा कार्यक्रम केला. पण त्यातून फारशी रक्कम मिळाली नाही.त्या मुळे खानदेश मधील क्रांतिकारक मोठा सरकारी खजिना लुटीच्या कार्यक्रमाचे बेत आखू लागले.याचे कारण म्हणजे,१९४२ च्या ‘चले जाव’आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते श्री.

विष्णू सीताराम पाटील,(माझे वडील) कापडणे हे १९४३ च्या

ॲागष्ट महिन्यात आटपाडी जिल्हा सातारा येथे आपल्या पत्नीसह जाऊन राहिले होते. तेथे श्री.

धुडकू भाऊ ठाकरे हे खादी भांडाराचे व्यवस्थापक, कापडणे गावाचेच होते.त्यांच्या

कडे राहिल्यामुळे श्री. विष्णूभाऊ यांची ओळख

कुंडल ग्रूपच्या भूमिगत कार्यकर्त्यांशी झाली .

श्री. जी डी लाड व नागनाथ नाईकवडी यांनी

श्री. विष्णूभाऊ पाटील यांना सांगितले की,

आपण जर प. खानदेश जिल्ह्यात सरकारी

खजिना लुटीचा कार्यक्रम आखला तर आम्ही

आपणास पाहिजे तेवढे पत्री सरकार मधील

कार्यकर्ते पुरवू. त्यामुळे विष्णूभाऊंना हुरूप

येऊन ते सरकारी खजिना लुटीच्या कार्यक्रमाची

आखणी करण्यात गुंतले ….

 

वडजई ता. धुळे येथिल श्री. फकिरा आप्पा

देवरे यांना त्यांनी आटपाडी गावी बोलवलें.

नंतर त्याच्या बरोबर श्री. जी. डी. लाड आणि

नागनाथ नाईकवडी हे दोघे वडजई येथे आले.

व श्री. फकिरा आप्पा देवरे यांच्याकडे सुमारे

एक आठवडा मुक्कामास राहिले.या अवधीत

त्यांना साक्री,शिरपूर, तळोदा,मालेगांव येथिल

मामलेदार कचेऱ्या दाखवल्या.प्रारंभी या मामलेदार कचेरी पैकी एखादी कचेरी लुटावी

असा क्रांतिकारकांचा विचार होता. त्यादृष्टीने

त्यांनी पहाणी केली.

 

याच वेळी श्री. फकिरा आप्पा देवरे यांचे मित्र

श्री. दयाराम पाटील, वडजई यांनी निरोप आणला की,आपण काही दिवस थांबू या.

कारण लवकरच धुळ्याहून धान्य खरेदीसाठी

नंदुरबार येथे सुमारे साडेपाच लाख रूपयांचा

खजिना जाणार आहे. श्री.दयाराम पाटील हे

धुळे येथे पोलिस कॅान्स्टेबल होते.अशीच माहिती धुळे सी.आय.डी.पोलिस खात्यातील श्री.भाऊराव पाटील यांनीही श्री. फकिरा आप्पा

देवरे यांना पुरवली.दोघेही फकिरा आप्पा देवरे

यांचे मित्र होते.क्रांतिकारकांनी मामलेदार कचेरी लुटण्याचा कार्यक्रम रहीत केला आणि नंदुरबार कडे जाणाऱ्या सरकारी खजिन्याची ते वाट पाहू लागले….

 

बरंय् मंडळी…बाकी पुढच्या रविवारी बोलू..

राम राम…

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा