You are currently viewing महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीमध्ये नोकरी..

महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीमध्ये नोकरी..

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*नाम. दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारचा उपक्रम…युवाईला सुवर्णसंधी*

 

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात बेरोजगारी हा जटील प्रश्न बनला आहे. कोकण भूमी देखील याला अपवाद राहीलेली नाही. कोकणचा प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेला, आंबा, काजू, फणस, कोकम अशा फळाफुलांनी नटलेला आहे. भातशेती विपुल प्रमाणात असली तरी शेती व्यवसायावर येथील जनता अवलंबून नाही, म्हणून कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत. सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने शिक्षण पूर्ण होताच नोकरी व्यवसायासाठी येथील तरुण वर्ग मुंबई, पुणे, गोवा आदी शहरांकडे स्थलांतरित होतो. त्यामुळे कोकणातील घरे मोठ्या प्रमाणावर बंद अथवा वयस्कर आई वडील आदी कोकणात राहिलेत. याचं एक कारण म्हणजे कोकण म्हटल्यावर विकास प्रकल्पांना होणारा लोकांचा विरोध..!

कोकणी जनतेच्या विरोधामुळे कोकणात औद्योगीकरण होत नाही पण, विरोध का होतो..? कारण, कोकणात येणारे औष्णिक, पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी सारखे उद्योगधंदे, कारखाने प्रदूषण निर्माण करणारे असतात. त्यामुळे कोकणातील जैवविविधता, शेती बागायती धोक्यात येण्याची शक्यता असल्याने पर्यावरणाचा होणारा ह्रास पाहता कोकणी जनता विरोध करते ही वस्तुस्थिती आहे. पण दुसरी बाजू अभ्यासली तर कोकणातील लोकप्रतिनिधी पर्यावरणास पूरक असे उद्योग व्यवसाय कोकणात आणत नाहीत तर ज्या उद्योगातून लोकप्रतिनिधींना आर्थिक फायदा होईल असे प्रकल्प कोकणी जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला जातो अन्यथा एखाद्या प्रकल्पासाठी लागणारी मर्यादित जमीन संपादित न करता अवास्तव जमीन संपादन करून शेतकऱ्यांच्या पोटावर उठण्याचा प्रयत्न होतो. परिणामी कोकणात कारखाने, उद्योगधंदे येत नाही आणि शिकलेल्या तरुणाईची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर येते. कोकणातील ख्रिस्ती समाजातील अनेक युवक, युवती आखाती देशांमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी जातात. काही वर्षे तिथे नोकरी करून मिळालेल्या पैशातून आपल्या मायदेशी येऊन नव्याने उद्योग व्यवसाय करतात तर काही आयुष्यभर तिथेच नोकरी करून आपले घर कुटुंब चालवतात हे वास्तव आहे. आता तर अनेक युवक नोकरी साठी परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याचदा दलालांच्या माध्यमातून स्थानिक युवक युवती आखाती देशातील विझा प्राप्त करून नोकरीसाठी जातात. यामध्ये बराच पैसा खर्च होतो. कित्येकदा दलालांकडून फसवणूक होते आणि दागदागिने विकून परदेशातील नोकरीसाठी केलेला प्रयत्न देखील फसतो.

महाराष्ट्राच्या महायुती सरकारकडून नाम.दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून या बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला. जर्मनी या देशात नोकऱ्या उपलब्ध असून तिथे तंत्र कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. ही कमी भरून काढण्यासाठी जर्मनी सारखा देश मोठ्या पगारावर मनुष्यबळ भरती करत आहे. याचा फायदा घेऊन ज्यांना विदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांना जर्मनी भाषा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शिकवून महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीत नोकरीची संधी देण्याची योजना पुढे आली. नाम.दीपक केसरकरांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आल्याने केसरकरांनी जर्मनीचा दौरा करून तेथील परिस्थितीचा अभ्यास केला, जर्मनी सरकारशी बोलणी आदी सोपस्कार केले. परिणामी महाराष्ट्रातील ९० पेक्षाही जास्त तर कोकणातील ५६ युवा युवतींना जर्मनी सारख्या प्रगत देशात कोणाही दलाल अथवा मध्यस्थांच्या फसव्या मध्यस्थी शिवाय नोकरी मिळाली ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. आतापर्यंत २७ हजार अर्ज जर्मनीमध्ये नोकरीसाठी प्राप्त झालेत. म्हणजे नोकरीसाठी परदेशात जाण्याकरिता इच्छुक कितीतरी लोक असल्याने नाम.केसरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारने साकारलेल्या या उपक्रमाचे खरोखर स्वागत केले पाहिजे. कारण यात सरकार मध्यस्थ असल्याने युवाईला कोणताही धोका होण्याची शक्यता नाही, सुरक्षिततेची व नोकरीची हमी आहे. त्यामुळे अपप्रचार करून “आपणही काही करायचे नाही आणि दुसरा करतो त्याच्या नावाने बोंब मारायची” ही वृत्ती सोडून विद्यार्थ्यांचे कल्याण होत असेल तर “जर्मनीमध्ये नोकरी हा विकास का..?” असे बालिश प्रश्न उपस्थित करून राजकारण न करता कुपमंडुप वृत्ती सोडून विरोधकांनी अपप्रचार करणे थांबविले पाहिजे.

भारतातून परदेशात नोकरी, शिक्षण याकरिता आजच विद्यार्थी जात नाहीत तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून जात आहेत. भारतापेक्षा प्रगत राष्ट्रे असल्याने तिथे भविष्य उज्वल आहे या भावनेपोटी कितीतरी लोक परदेशात नोकरी करतात. ते सुद्धा आई बापाच्या काळजाचे तुकडे असतात पण प्रत्येकाच्या आवडी आणि गरजेनुसार निर्णय घेतले जातात. पूर्वी मुंबईत पोचायला २४ तासांहून अधिक काळ लागायचा आता त्याहीपेक्षा कमी वेळात परदेशात जाता येते. त्यामुळे उगाच कुठल्याही गोष्टींचा बाऊ न करता युवाईच्या भविष्याच्या दृष्टीने परदेशात नोकरी ही सुवर्णसंधी असेल तर महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले पाहिजे. दुसऱ्यांचे पाय ओढून आपण पुढे जात नसतो तर त्याच्याही पेक्षा मागेच सरकत असतो ही गोष्ट ध्यानात ठेऊन विरोधासाठी विरोधाचे राजकारण न करता ज्यांची जर्मनी येथे नोकरीसाठी निवड झाली आहे त्यांच्या मनातील विचार ऐकावेत, चेहऱ्यावरील आनंद पहावा आणि नंतरच आपली मते बनवावीत.. फुकट संधी विरोध करणारे सुद्धा देणार नाहीत उलट आपल्या जवळच्या माणसांना हीच संधी मिळवून देतील आणि जे संधीच्या प्रतीक्षेत असतील त्यांची दिशाभूल करतील..

प्रतिक्रिया व्यक्त करा