You are currently viewing अमरावती जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम 

अमरावती जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम 

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

दर महिन्याला दोन स्पर्धा परीक्षा कार्यशाळा

अमरावती :

 

अमरावती जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी जर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद कार्यालयाने केली तर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होऊ शकते. अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारी अमरावती जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्र आय ए एस यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. संजीता महापात्र मॅडम ह्या मूळच्या ओरिसाच्या. ओरिसा तसा हा भाग मागासलेला भाग .विकसनील असलेले हे राज्य. पण त्यांनी तेथील परिस्थितीवर मात करून आयएएसच्या परीक्षेमध्ये अखिल भारतीय स्तरावर दहावा क्रमांक प्राप्त केला आहे .आपण आयएएस अधिकारी झालो म्हणजे संपले हा दृष्टिकोन मनात न ठेवता मी ज्या अधिकार क्षेत्रात काम करते त्या अधिकार क्षेत्रातील विद्यार्थी कसा सक्षम होईल स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे जाईल या उदात्त हेतूने त्यांनी अमरावती जिल्हा परिषदेतर्फे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमामध्ये आयएएस अधिकारी आयपीएस अधिकारी तसेच राजपत्रित अधिकारी येऊन विद्यार्थ्यांना वेळोवेळी स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाची रितसर सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात संपन्न झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री अमर राऊत सातारा हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्याचा कार्यक्रम तब्बल तीन तास चालला. सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि नंतर उत्तरार्धामध्ये त्यांनी मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. योगायोगाने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला आला. मुलांमध्ये प्रचंड उत्साह होता .तसेच अमर राऊत यांच्यातही होता. सतत तीन तास बोलून ते थकले नाहीत. उलट त्यांनी विद्यार्थ्यांना तुमच्या मनातील पूर्ण शंका काढून टाका .अगदी लहान प्रश्न असेल तरी तो विचारा असे त्यांना सुचवले. दुसरा कार्यक्रम शनिवार दिनांक 19 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता अमरावती जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमपीएससीच्या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पहिले आलेले चाळीसगावचे सुपुत्र व सध्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे तिवसा पंचायत समितीमध्ये खंडविकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री अभिषेक कासोदे यांना निमंत्रित केले आहे. श्री अभिषेक कासोदे हे आमच्या चाळीसगावच्या मिशन आयएएस परिवारातील आहेत. यापूर्वी ते आमच्या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये तसेच आमच्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरामध्ये आलेले आहेत. त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला नेहमीच आवडते .आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात .शनिवार दिनांक 19 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता ते अमरावती जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देणार आहेत. खरं म्हणजे अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवणे गरजेचे आहे .आज अमरावती शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. पण या विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणे प्रोत्साहन देणे .त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे फारच गरजेचे आहे .अनेक ठिकाणी खाजगी अकादमी आहेत .पण त्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागतात. प्रत्येकच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती एवढी सक्षम नसते. पण अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्र यांनी पुढाकार घेऊन हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो निश्चितच अभिनंदनीय आहे .मी त्यानिमित्त संगीता महापात्र मॅडम यांचे मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महापात्र मॅडमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपापल्या जिल्ह्यात मिशन आयएएस सुरू करावे अशी अपेक्षाही करतो.

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आय ए एस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा