You are currently viewing तुला शिकवीन चांगलाच धडा

तुला शिकवीन चांगलाच धडा

*जागतिक साहित्यकाला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

 

*तुला शिकवीन चांगलाच धडा*

—————————————

” काय करताय तुम्ही . पेपर काय वाचनासाठी घेतला . मी बसलेय इथे एकटी . सोडा तो पेपर आधी . चला गप्पा करूयात आपण ” ” घे बाई नीता , ठेवला पेपर . या क्लिअरींग हाऊसमध्ये विशेषतः दुपारच्या वेळी फार कंटाळा येतो . पेनड्राइव्ह आणि शीट मिळेपर्यंतचा वेटिंग पीरेड फारच कंटाळवाणा होतो . टाईमपास म्हणून वर्तमान पेपर आणलं होतं .सकाळी कामाच्या घाईगर्दीत संपादकीय किंवा इतर महत्वाच्या बातम्या बारकाईने वाचल्या जात नाहीत .म्हटलं चला तेवढा वेळ सत्कारणी लागेल . बोल काय म्हणतेस ” ” काही नाही ” इतक्यात नीताच्या Face book वर मेसेज आला .” बघा मॅडम फेसबुक वर किती छान चित्र अपलोड केलंय .एक गाय तोंडाने बोअरवेलचा दांडा उंच करीत होती ., त्यातून जी पाण्याची धार मिळत होती , लगेच ग्रहण करीत होती .. पुन्हा दांडा वर करणे , नळातून पाणी येणे आणि तिने ते प्राशन करणे , हा तिचा संघर्ष व्यवस्थित चित्रीत केलेला होता .” होय गं बाई , मुक्या जनावरांनाही पाण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो आणि ते ही कसे यातून मार्ग काढतात . सिंपली मार्व्हलस ” मी प्रतिक्रिया दिली .आणखी बघा किती नवीन नवीन , सामान्य ज्ञानावर आधारीत माहिती ही मिळते .या माध्यमातून अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतची माहिती तर मिळतेच पण या तंत्र ज्ञानाने जग जवळ करण्याची किमया ही साधलीय . आमच्या व्हाॅटस् अँप अँप्लिकेशनवर आम्हां मैत्रीणींचा बराच मोठा ग्रुप आहे .माझ्या वहिनी , मामे वहिनी , इतर नातेवाईक , फुरसतीच्या वेळी आमच्या मग गप्पा रंगतात या माध्यमातून . भाच्यांचे फोटो  पाहाणे, लहान मुलांच्याही गप्पा सुरू होतात आणि एकमेकांना भेटल्याचा आनंद होतो .” ” होय नीता , मोबाईल , फेसबुक , व्हाॅटस् अप मुळे जग खरंच जवळ आलंय .एकमेकांशी संपर्क वाढलाय .जनजागृती , विचारजागृती वाढलीय . आता बघ ना 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकांचंच उदाहरण घेऊ या .पाचही चरणातील मतदानात प्रत्येक राज्याची टक्केवारी वाढलेली दिसतेय .लोकांना मतदानाचं महत्व पटू लागलेलं दिसतंय .मतदान केल्यास आपल्याला पाहिजे ते सरकार निवडून देऊ शकतो याची जाणीव लोकांमध्ये झाली आहे .लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या या माध्यमांनी हे काम चोखपणे केलं आहे .” ” होय मॅडम , बरोबर बोलताय तुम्ही ” इतक्यात नीताच्या मोबाईलचा रिंगटोन वाजला . “होय आई , तू चहा ठेवून दे . मी येतेय दहा मिनिटात . चहा घेतला कि लगेच आँफिसात जाईन ” एव्हढ्यात प्रकाशने पेनड्राइव्ह व शीटचे वाटप केले .नीता व मी बोलत बोलत क्लिअरींग हाऊसच्या बाहेर पडलो ” चला ना तुम्हीही माझ्या घरी .चहा घेऊ आणि लगेच या तुम्ही ” ” अगं नीता मला स्टेट बँकेत टी. टी. घेऊन जायचीय . वेळ थोडासाच शिल्लक आहे .अगदी डाॅट साडेचार वाजता RTGS स्विकारणं बंद करतात ती माणसे .ओ के . बाय , भेटू पुन्हा ” मी माझ्या आँफीसकडे वळले .

 

नीता गौरवर्णी , मध्यम बांधा , भावपूर्ण बोलके डोळे , काळ्याभोर केसांचा पोनीटेल वळलेला , मॅचिंग ड्रेसवर तशीच टिकली , बांगडी , केसांचा बो सुद्धा त्याच कलरचा ,परफेक्ट मॅचिंग सांभाळणारी , हसरी , बोलकी , कोणालाही आपलंस करून घेणारी , वयाची पस्तीशी ओलांडून चाळिशीकडे झुकलेली एक मध्यमवयीन यौवना होती .तिने समाशोधन गृहात ( क्लिअरींग हाऊस ) पाऊल ठेवलं कि चैतन्याला उधाण यायचं .क्लिअरींग हाऊसमध्ये इतर बँकांचे प्रतिनिधीही गप्पांमध्ये सामील होतं .त्यांच्या छेडछाडीला नीताही तेवढ्याच खेळकरपणे उत्तरे द्यायची .हास्याचे फवारे उडायचे .आणि बेरीज वजाबाकीच्या , आकडेमोडीच्या आमच्या कामातही एक चैतन्य , एक उभारी जाणवायची .”

 

” काय गं नीता, आज थकल्यासारखी दिसतेस . बरं नाही का तुला ?” ” नाही मॅडम , बरं आहे मला . प्रियंकाची परीक्षा सुरू आहे .रात्री थोडावेळ तिचा अभ्यास घेते . माझ्या मोलकरणीचा हात मोडलाय म्हणून सुटी घेतली आहे तिने . घरातील सगळी कामे करतांना दमछाक होते माझी त्यामुळे शारीरिक थकवा जाणवतोय . आई नासिकला भावाकडे गेली आहे , वहिनीचा पाय मोडलाय म्हणून . घरी मी आणि प्रियंकाच आहोत .परवा बाबा येतील आमच्या मदतीला .तोपर्यंत ओढाताण आहे ” ” अगं मग रजा टाकायची ना दोन दिवस . कशाला ताण करून घेतेस .” मॅडम , वर्षभरात लग्न , सण , समारंभ  , दुखणी खुपणी यातही बर्‍याच रजा जातात म्हणून या कामासाठी मी काही रजा घेतली नाही ” ” ओ .के. काळजी घे स्वतःची .नेहमी हसरी बोलकी तू आज एकदम गप्प वाटलीस म्हणून बोलले मी .खरच जीवनातील एवढे कटु अनुभव , कठीण समरप्रसंग झेलून तू हसत खेळत राहातेस ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे . आपले दुःख कुरवाळत न बसता त्याला सामोरं जाणं हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे . खरंच सर्व महिलांसाठी तू एक उत्तम उदाहरण आहेस. अभिमान वाटतो तुझा मला .

 

” काय करता मॅडम , जीवन मोठं क्षणभंगूर असतं आला क्षण आपला म्हणायचा आणि साजरा करायचा , हे तत्वज्ञान शिकवलंय आईने मला  तिची सोबत नसती तर केव्हाच कोलमडून पडले असते मी ” ” खरंय , खरंय तुझं म्हणणं ” बोलत बोलत मी ही माझ्या आँफीसकडे वळले .

 

.नीता इंडियन ओव्हरसीज बँकेची कर्मचारी तर मी पंजाब नॅशनल बंकेची कर्मचारी . शहरातील समाशोधन गृहात कामाच्या निमित्ताने आमच्या भेटी होत . या भेटीतूनच मैत्रीचे दृढ नाते निर्माण होत गेले .

 

नीताच्या घरी आई आणि तिची मुलगी प्रियंका .ः भाऊ व वहिनी नासिकला . त्यांना दोन मुले ,.मुले सांभाळण्यासाठी तिचे बाबा नासिकला राहात . बाबा भावाकडे तर आई नीताकडे अशी वाटणी झालेली.

 

वयाच्या अठरा/एकोणीसाव्या वर्षीचं नीताचं लग्न झालेलं .मुलगा चांगला शिकलेला उच्चपदस्थ अधिकारी . सांगून स्थळ आलेलं . नीताचंही बि.काँम च शिक्षण चालू होतं . मुलाच्या घरी आईवडिल एक लहान बहीण . कुठे कमतरता भासावी असे स्थळ नव्हतेच मुळी .लग्नाची बोलणी झाली आणि एका शुभमुहूर्तावर  नीताने अशोकच्या जीवनात प्रवेश केला .एकुलती एक कन्या असल्याने नीताच्या वडिलांनीही सढळ हस्ते खर्च केला होता .

 

नव्या नवलाईचे नऊ दिवस . नवीन सुनेचे कोडकौतुक धार्मिक सण , समारंभ , देवी देवतांना नवपरिणीत जोडप्याची हजेरी , यात महिना केव्हा गेला कळलेही नाही .नव जीवनाची सोनेरी स्वप्ने सजविण्यात रममाण नीतावर मात्र कुटुंबातून बरीच बंधने येऊ लागली .सुनेने घरातील सर्व कामे लवकर उठून करावीत , नवर्‍याला हवं नको ते पहावं , सासू सासर्‍यांची सेवा, जेवणासाठी नवर्‍याची वाट पाहात थांबणं , याबरोबरच तिने शेजारी पाजारी कोणाशी बोलू नये . घरी कोणी नवीन सुनेसाठी आले तर तेवढ्यापुरते बोलून तिने तेथून निघून जावे . असे दंडक तिला घालून देण्यात आले .

 

नवीन घर , नवीन माणसे , आता आपण माहेरी नव्हे तर सासरी आहोत . माहेरपणाचे स्वातंत्र्य इथे कसे मिळणार ?अशी मनाची समजूत घालून नीता जीवन व्यतित करीत राहिली .

 

नीताचे फायनल इयर होते .परीक्षा होती म्हणून ती माहेरपणाला आलेली ” काय गं नीता , अशी मलूल का दिसतेस ? तुझ्या सासरी सगळं व्यवस्थित आहे ना ?” आईच्या प्रेमळ शब्दांनी नीताच्या संयमाचा बांध फुटला होता .

 

” उगी उगी बाळ , रडू नकोस . काय झालंय ते मला व्यवस्थित सांग ” नीताने सगळी हकीकत सांगितली.

” बेटा , जीवन हे असेच असते .घर , कुटुंब आम्हां स्त्रियांनाचं सांभाळावं लागतं प्रसंगी नवर्‍याची नवरेशाही ही खपवून घ्यावी लागते . आपल्या घरासाठी , कुटुंबासाठी , माहेरच्या घराण्याचंही नाव उज्वल करण्यासाठी स्त्रियांना हे हलाहल प्राशन करावंच लागतं बाई . पण तू घाबरू नकोस . एखादं मूलबाळ होऊ दे . तुझा त्रास बराच कमी होईल कारण मूल हे आईवडिलांना जोडणारा एक भक्कम दुवा असतो . पोरी सर्व ठीक होईल . अशोक तर चांगला वागतो ना तुझ्याशी ”

” नाही आई ,खरं दुखणं तिथेच आहे .अशोकला दारूचं व्यसन आहे आई .कामानिमित्त मित्रांसोबत घ्यावं लागत हे त्याचं सांगणं , ” इट इज अ सोशल ड्रिंक , मी जर मित्रांसोबत प्यायलो नाही तर माझा त्यांच्याशी संपर्क तुटेल व पर्यायाने माझ्या कामावर , माझ्या बिझनेसवर परिणाम होईल. आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी मला हे करावंच लागणार हे तो ठासून सांगतो “. ” असेलही बाई तसं .पण तुला तर तो त्रास देत नाही ना ? ” आई कसं सांगू तुला . रात्री अपरात्री त्याचं येणं. दारूचा तो उग्र दर्प आणि अशा अवस्थेत त्याची पत्नीसुखाची अपेक्षा . किळस येते मला या सर्व गोष्टींची .

 

नीताची आईसुद्धा मुळापासून हादरली .नीताच्या वडिलांच्या कानावर तिने ही गोष्ट घातली . ” अहो फसवणूक झालीय आपली . आपण चौकशीही नीट केली नाही . मुलाचं शिक्षण , नोकरी , कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली आपण , पण ही चौकशी नाही केली .फुलासारखी कोमल माझी नीता . कसं होणार हो तिचं ? ” शांत हो मीनाक्षी . जे घडतंय ते विपरीतच आहे . पण हा प्रसंग संयमानं हाताळायला हवा आम्हांला .नीताला मजबूत बनवा तुम्ही . सबुरीनं घेण्याचा सल्लाही द्या , आणि होय एखादं मूल झालं कि कमी होईल निश्चितपणे तिचा त्रास .”

 

नीताच्या बि. काॅम फायनल इयरचा निकाल लागला . नीता विद्यापीठात प्रथम आली होती .तिला सुवर्णपदक ही मिळाले  आणि या आनंदात आणखी एक आनंदाची बातमीही तिच्या जीवनात आली . नीताला कडक डोहाळे लागले . पाणीही पचेनासे झाले .

 

” मीनाक्षी मी सांगितलं होतं ना सगळं चांगलं होईल. नीता अशोकमधला दुरावा आता नक्कीच कमी होईल . कुटुंबाची जवाबदारी वाढल्यानं त्याचंही व्यसन कमी होईल . घराची ओढ वाढेल . येणारं हे मूल त्यांच्यातील हा सेतुबंध नक्कीच घट्ट करील . आता तुम्ही आजीबाई होणार . सगळी तयारी आतापासून करायला हवी .” ” होय आजोबा , मी तर करीनच सगळी तयारी , तुम्हीही हातभार लावा ” ” नक्कीच लावणार . प्रमोशन होणार आहे माझं . मी आजोबा होणार . इवलं इवलं नातवंडं घरात येणार . त्याच्या बोबड्या बोलांनी घरात मधुर वातावरण निर्माण होणार , त्यासाठी मी मदत केलीच पाहिजे . काय पाहिजे तुला , सगळी यादीच करून दे मला . आणून देतो सगळं .

” आतापासून नको काही आणायला . अपशकून असतो तो . बाळ जन्मल्यावरच करा तुम्ही सगळी धावपळ ” म्हणत मीनाक्षी खळखळून हसली .

 

नव्या जीवाच्या चाहुलीनं नीता मनोमन खूष  झाली होती.अंगोपांगी बहरली होती . आपल्या शरीरात एक अंश जोपासत होती.” खरंच सगळं चांगलं होईल , माझे दिवस बदलतील ” नीताचा आत्मविश्वास वाढला होता .पण स्वप्नरंजन आणि वास्तवस्थितीत फरक असतोच .अशोकची सुधारण्याची चिन्हे दिसेनात .आता तर तो नीताचा मानसिक छळ तर करीत होताच पण शारीरिक हिंसाचारावरही तो उतरला होता .” काय चुकलं हो माझं ? कां म्हणून तुम्ही असे वागता माझ्याशी ? तुमची सेवा करते . तुमच्या आईवडिलांची सेवा करते ” ” मग उपकार करतेस कि काय आमच्यावर . सुनेचं कर्तव्यच असतं ते .” ” मी तर माझं कर्तव्य करतेच हो .पण तुम्ही मात्र तुमचं कर्तव्य विसरत आहात . घरात नवीन पाहुणा येणार आहे . मला खूप शारीरिक थकवा वाटतो . काही खावसं वाटत नाही .अन्न पचत नाही . पण तुम्ही डाॅक्टरांकडे नेणं तर सोडाच साधी माझी मनधरणीही करीत नाहीत ” ” आम्ही तुझी काळजी घेत नाही हे कसं काय म्हणू शकते तू ?” ” कसं काय म्हणजे ? खरं तेच तर सांगितलंय .” ” थोबाडं फोडून टाकीन पुन्हा वर तोंड करून बोलशील तर ” म्हणत अशोकने एक सणसणीत तिच्या गालावर ठेवूनच दिली .नीता कोलमडली . बाजूच्या सोफासेटचा तिनं आधार घेतला म्हणून बचावली , नाहीतर खालीच कोसळली असती . अशोक तडक खोलीतून निघून गेला . नीता मुसमुसत राहिली .

 

अशोकचं नीताचा छळ करणं चालूच होतं .त्याचे आईवडिलही त्याचीच री ओढायचे .अशा स्थितीत नीतानं करावं तरी काय ? आईवडिलांना किती टेन्शन देणार . याचा व्हायचा तोच परिणाम झालाच .शारीरिक आणि मानसिक छळापायी एक दिवस नीताच्या पोटात तीव्र वेदना उठल्या . नीता धाय मोकलून रडू लागली तेव्हा तिच्या सासूबाईनं तिला दवाखान्यात नेलं .नीताचा रक्तस्त्राव सुरू झाला होता आणि रक्ताच्या या प्रवाहात तो मांसल गोळाही केव्हाच निसटला होता .

 

” किती उशीर केलात तुम्ही ? आणि मुलगी गरोदर असतांना डाॅक्टरांचा सल्ला घेणं , नियमित गर्भाची तपासणी करणं ,त्याची वाढ योग्य दिशेनं होतेय कि नाही हे पाहाणं , आईच्या शरीरात काही कमतरता असेल तर त्याची भरपाई करणं आणि जोडीला औषधांची मदत घेणं , हे तुम्हांला माहित नाही काय ?तुम्ही तर मोठ्या आहात ना घरातील , दोन मुलांच्या आई . मग सुनेकडे लक्ष देऊ नये ? आता नुकसान कोणाचं झालं ? तुमच्याच वंशाचा अंश होता ना तिच्या पोटात. जन्माला येणारा जीव जन्माआधीच गेला की निघून “.

 

नर्स पेशंटला आँपरेशन थिएटरमध्ये घ्या .अँनेस्थेशियासाठी डाॅ. विमलला फोन करा .गर्भाचं सॅक काढावं लागेल .पोटातील सफाई व्यवस्थित करावी लागेल . जा लवकर कर सगळं “.म्हणत डाॅ. शुभाने नर्स मीराला पाठविले .

 

नीताच्या दुःखाला पारावार नव्हता .जन्माआधीच तिच्या पोटातील नवांकुर निघून गेला होता . रिते पोट , रिते शरीर , रिते मन घेऊन नीता घरी परतली ती जणू दुखणं घेऊनच. तिला जेवण आवडत नव्हते .पोटात अन्न नसल्याने सारखे चक्कर येत असत .

 

” मी नीताला माहेरपणासाठी घेऊन जाते.तिथे करीन मी तिची ट्रीटमेंट ” नीताची आई मीनाक्षी बोलत होती .नीताच्या सासूला तर ते हवंच होतं . आजारी सुनेची सेवा करणं तिला त्रासदायक वाटत होतं .” घेऊन जा तिला आणि चांगली बरी झाल्यावरच पाठवा

 

नीता आईबाबांकडे आली सगळी स्वप्ने , सगळी आकांक्षा गमावून . ती शून्यात दृष्टी लावून बसायची . ” नीता , चहा घेतला नाहीस तू अजून . बघ गार झालाय .नवीन चहा करून आणू तुझ्यासाठी ” नीताकडून प्रतिसाद मिळाला नाही तशी आईने तिला हलविले . ” हं , काय , काय झालं आई ” ” बेटा तू चहा प्यायली नाहीस ” ” कशी पिणार ? मला काही आवडतच नाही “. ” असं म्हणून कसं चालेल बेटा . जीवन का कोणासाठी थांबलंय , आणि होय , खेळातला पहिला डावही आपण देवाला अर्पण करतो . मग आयुष्यातला का नाही ? झाडावर अनेक फळे येतात ,पण ती सगळी काय खाण्यासाठीच उपयोगी येतात ? काहींचं वार्‍या वादळात , ऊन पावसात नुकसान होतंच ना ? परमेश्वर इतका निष्ठुर नाही, पुन्हा तुझी ओटी भरली जाईल . पुन्हा आनंदाची पावले घरात उमटतील .पण त्यासाठी तू हिंमत धरली पाहिजेस बेटा .असं रडत बसू नकोस , तर तनाने व मनानेही खंबीर हो . मग यश तुझंच आहे “आईच्या शब्दांनी नीतावर जणू जादूच केली .तापल्याने सुवर्ण उजळते तशी नीता या दुःखातून तावून सुलाखून निघाली ती नव्या उमेदीने , नव्या आशेने ”

 

नीता घरी परतली .आता तिचा आत्मविश्वास बराच वाढला होता .अशोकशी तिचे खटके उडत होते , पण ती ही धैर्याने सामोरी जात होती .नीताच्या संसारवेलीवर पुन्हा फुलं उमलण्याची चिन्हे दिसू लागली . नीता स्वतः सुविद्य होती .स्वतःची काळजी घेण्याइतपत आत्मनिर्भर होती . ती स्वतःच सुरूवातीपारून डाॅक्टरांच्या देखरेखीखाली इलाज करवून घेऊ लागली .सातव्या महिन्यात नीता रीतिप्रमाणे माहेरी बाळंतपणासाठी आली .एका सुंदर गोंडस कन्येला तिने जन्म दिला .आई बाबांच्या चेहर्‍यावर हास्य उमललं .नीताच्या सासरी ही बातमी कळविण्यात आली .ती सगळी मंडळी येऊन गेली .मुलगीच असल्याने फारसं कोडकौतुक कोणी केलं नाही .

 

दोन महिन्यांनी सोनालीला घेऊन नीता घरी परतली . सासूनं तेवढ्यापुरतं स्वागत केलं .नीताला सगळीच घरकामं लगेच सोपविण्यात आली . नीता काम करीत असतांना सासूबाई तेवढा वेळ सोनालीला सांभाळायच्या . आपल्या सोनुलीच्या हास्यात बाललीलांमध्ये नीता रमायची , नव्हे तिच्यासाठी तर ते स्वर्गसुखचं होतं पण अशोक मात्र या स्वर्ग सुखात फारसा सामील कधी झालाच नाही .दिवसेंदिवस त्याची नवरेशाही , हक्क गाजवणं , त्याची क्रूरता वाढतच होती .भरीतभर त्याच्याच आँफिसातील शीतलशी त्याचे सूत हळूहळू जुळू लागले.नीताच्या कानावरही ही बातमी पोहोचलीच . ” कोण आहे ही शीतल ? काय संबंध तिचा तुमच्याशी ? माझ्या संसाराला आग लावणारी ही बया कोण ? ” ” मैत्रीण आहे ती माझी .मी तिच्याशी बोलतो . आम्ही एकत्र काम करतो .एकमेकांची सुखदुःख वाटून घेतो . कधी कधी मी तिला काही भेटवस्तूही देतो . एवढंच .”

” एवढंच ? ही गोष्ट एवढीशी आहे ?तोंड वर करून सांगतात पुन्हा ” ” तूच तर विचारलं म्हणून सांगितलं .मी कुठे तुला सांगणार होतो . आणि कां म्हणून सांगाव ? माझी मर्जी .”

” माझी मर्जी ? देवा ब्राम्हणांच्या साक्षीनं लग्न झालंय आमचं . पत्नी आहे मी , अर्धांगिनी तुमची . सुखदुःखात सोबत करण्याची वचने दिलीत आम्ही एकमेकांना.माझ्या अधिकारावर हक्क सांगणार्‍या , माझ्या जीवनात वादळ उठविणार्‍या या घटनेचा मी विचारही करू नये ?

” मग करीत बस ना विचार . तुला रोखलंय कोणी ? ”

” ही गुर्मी ? ही मस्ती ? आतापर्यंत मी मुकाट्याने सगळं सहन केलं .आता नाही सहन करणार .तुम्हांला धडा शिकविल्याशिवाय मी गप्प राहणार नाही

 

” तुझ्या पापाचा भरलाय घडा

तुला शिकवीन मी चांगलाच धडा ”

 

जा .जा . तुला कोणी रोखणार नाही . जे .जे .करता येईल ते कर .गो नाऊ . गुडबाय .” अशोकचे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे नीताच्या कानात शिरत होते .

 

नीता माहेरी परतली एखाद्या जखमी हरिणीप्रमाणे . आईवडिलही एकुलत्या एक मुलीची वेदना पाहून तळमळत होते .

 

नीताच्या बाबांनी शहरातील नामांकित वकीलाचा सल्ला घेतला .मानसिक व शारीरिक छळासाठी अशोकवर भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 498A खाली गुन्हा नोंदविण्यात आला .त्याचे आईवडिलही त्यात सामील होते .तसेच कौटुंबिक हिंसाचार अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला .या तिघांची वरात पोलीस स्टेशनात पोहोचली . नाही म्हटलं तरी अशोकची बदनामी बरीच झाली .वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यानं स्वतःची सुटका करवून घेतली .

कोर्टात केस उभी राहिली , पण नीताकडे पुरेसे पुरावे नव्हते .आईवडिलांना तिने सगळ्या गोष्टी फोनवरूनच सांगितल्या होत्या.लेखी पुरावा कोणता नव्हता .शेजारी साक्ष देण्यास तयार नव्हते .अशोक निर्दोष सुटला .युद्धाला आता तोंड फुटले होते .नीताने पोटगीसाठी कोर्टात दावा दाखल केला .आणि अशोकने सहा महिने विभक्त राहिल्याने घटस्फोटासाठीचा दावा दाखल केला .

 

नीता अशोकची क्रूरता सिद्ध करू शकली नाही .त्याने तिचा भरपूर मानसिक व शारीरिक छळ केला होता , पण पुराव्याअभावी नीता काहीही सिद्ध करू शकली नाही .” मला मारहाण होत होती .दरवाजे उघडे ठेवून किंवा शेजार्‍यांना बोलावून तर कोणी मारणार नाही ना ?”

” ठीक आहे मॅडम , ग्राह्य धरु तुमचं म्हणणं . घरात नोकर/चाकर तर होते .त्यांनी तर काही तुमच्या बाजूने साक्ष दिली नाही .” ” ती माणसे अशोकची आहेत सर .त्यांच्या विरोधात ते साक्ष देतीलच कसे ?” ” साॅरी मॅडम , न्यायदेवता आंधळी आहे . पुरावे हवेत .आणि स्वतःचं म्हणणं केवळ तुम्हीच पटवून देणं कितपत योग्य ? वास्तविकतेसाठी , डोळसपणे विचार करण्यासाठी कायद्याला हवेत पुरावे .तुम्ही तुमची कैफियत मांडलीत पण सिद्ध करू शकल्या नाहीत म्हणून हे कोर्ट अशोकचा डिव्होर्सचा अर्ज मान्य करीत आहे .सोनालीवर हक्क नीताचाच राहिल . अशोकला मात्र पिता म्हणून भेटण्याची परवानगी हे कोर्ट देत आहे .

 

नीतावर तर हा वज्राघातच होता .पण यातूनही तिला सावरायचे होते ते सोनालीसाठी. कोर्ट कचेरी , भांडणतंटा यातच बारा वर्षाचा कालावधी निघून गेला होता . नीताने आता नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले .डिव्होर्सी असल्याकारणाने तिला वयोमर्यादेत जवळजवळ नऊ वर्षाची सूट मिळणार होती .नीताला याचा फायदा झाला व तिचे इंडियन ओवरसीज बँकेत सिलेक्शन झाले .नीता स्वतःच्या घट्ट पोलादी पायांवर भक्कमपणे उभी राहिली .

 

सोनालीचे हे दहावीचे वर्ष होते .आता ती सोळा वर्षाची होती . पित्याला भेटण्यास ती अनुत्सुक असायची . ” मम्मी मी अठरा वर्षांची पूर्ण झाल्यावर मी स्वतःच माझ्या जीवाची मालकीण होणार ना ? कसा काय सांगणार माझा बाप माझ्यावर हक्क् ? मी नाकारेन त्याला.” नीताने सोनालीला ह्रदयाशी घट्ट कवटाळले . ” खूप मोठी झालीय माझी सोनू “.

 

लग्नाघरची वर्दळ वाढली होती . वरातीचा घोडा , सुगंधी द्रव्ये , अक्षता , नवीन कपड्यांची सळसळ वाढली होती .आज सोनाली लग्नाच्या बोहल्यावर चढली होती .लग्नघटिका भरली तशी वाजंत्रीने जोरदार दणक्यात वादन सुरू केले . फटाक्यांची आतिषबाजी सूरू झाली . देवा ब्राम्हणांच्या साक्षीनं सोनालीनं प्रकाशला वरमाला घातली .कन्यादानासाठी मुलीच्या आईवडिलांनी यावे . ” थांबा गुरूजी , कन्यादान करीन माझी माता . आयुष्यभर तिनंच तर केलं सगळं माझं . मला वाढविलं , संस्कार दिले आणि आज लग्नही . माझी आईच माझा पिता आणि माता आहे .माझ्या पित्याचा काय यात सहभाग ? काय अधिकार त्यांना माझ्या कन्यादानाचा . नकोय मला त्यांचा सहभाग .” पुढे सरसावलेला अशोक आपोआपच माघारी वळला . जीवनात काय गमावलं याची जाणीव आता त्याला झाली होती पण उशीर झाला होता .वेळ निघून गेली होती .प्रायश्चिप्त करायलाही वेळ नव्हता . आज सोनालीने त्याला चांगलाच धडा शिकविला होता .डोळ्यातील आसवे पापण्यांच्या गजाआड रोखत अशोक लग्नमंडपातून बाहेर पडला होता.

—————————————————

डाॅ.शैलजा करोडे ©®

नेरुळ नवी मुंबई

मो.9764808391

प्रतिक्रिया व्यक्त करा