ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे नागरिकांना आवाहन.
वैभववाडी
समाजातील काही लोक सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा आणि ओळखीचा गैरफायदा घेऊन आर्थिक फसवणूक करतात. कमी कष्टात आणि कमी वेळात झटपट श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट शोधला जातो. काबाडकष्ट करून मिळवलेला पैसा सुरक्षित राहावा यासाठी विचारपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे. परंतु जास्त फायद्याच्या आमिषाला बळी पडून अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे आहेत.
पाच वर्षात पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून गुंतवणूक करून घेऊन फोंडाघाट बावीचे भाटले येथील रहिवासी दाम्पत्यांने फसवणूक केल्याची बातमी दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तसेच आॕनलाईन आर्थिक फसवणूक व आॕनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.अशा आर्थिक भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.
जिल्ह्यात संचयनी, ग्रिन फाॕरेस्ट, पल्स, कल्पवृक्ष, पॕनकार्ड अशा अनेक वित्तीय व फायनांन्स कंपन्यांमध्ये अनेकांची फसवणूक झालेली आहे. रक्कम दाम दुप्पट आणि पैशाचा पाऊस यातून घडलेला नांदोसचा हत्याकांड सर्वांना माहीत आहेच. आपली फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी सजग बनवून दामदुप्पट असो किंवा साखळी पद्धतीला बळी न पडता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपली गुंतवणूक केल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. तसेच काही बँकांमध्ये कर्ज मिळवून देतो असे सांगून अनेक एजंट लोक सर्वसामान्यांची फसवणूक करीत असतात. गुंतवणूक करीत असताना किंवा कर्ज घेत असताना नागरिकांनी बँक किंवा संस्थेमधील जबाबदार व्यक्तीला भेटून खात्री करुन विचारपूर्वक आर्थिक व्यवहार करावेत. तरीही आपली आर्थिक फसवणूक झाल्यास संबंधित बॕक/संस्था, पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधून रितसर तक्रार देऊन त्याचा पाठपूरावा केला पाहिजे.आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे.आर्थिक व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. अधिक माहितीसाठी ग्राहक पंचावत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेशी (9834984411) संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस. एन.पाटील, संघटक श्री.एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष श्री. संदेश तुळसणकर यांनी केले आहे.