सावरकर सदन, प्राधिकरण :
दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे श्री सूक्त पठण व महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व प्रार्थनेने झाली.
“राष्ट्र् सेविका समिती, पौरोहित्य ग्रुप”, निगडी शाखेच्या सौ प्रतिभा पेंडसे यांनी श्री सूक्त चा अर्थ, त्याच्या पठणाने होणारे लाभ, तसेच श्री सूक्त च्या सर्व १५ ऋचांचा अर्थ व सोळावा श्लोक फलश्रुतीचा अर्थ अतिशय माफक शब्दात समजावून सांगितला व त्यानंतर १६ वेळा श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित सर्व महिला श्रोत्रृवर्गाने त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व त्या पाठोपाठ महाभोंडल्याचाही कार्यक्रम संपन्न झाला.
सौ संपदा पटवर्धन यांनी भोंडल्याची गाणी सादर केली. सर्वजणी नटून छान परिवेशात आल्या होत्या. महाभोंडला झाल्यावर मग गरबा व दांडिया खेळण्याचा आनंद सर्व सख्यांनी घेतला. सर्व सहभागी सख्यांना प्रोत्साहन पर पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वात शेवटी इडली सांबर चटणी व चिरोटे अशी खिरापत देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ हर्षदा पोरे व सौ संपदा पटवर्धन यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार सहकार्याध्यक्ष सौ. वैदेही पटवर्धन व महिला विभाग अध्यक्ष सौ शितल गोखले यांनी केला. आभार व निवेदने सौ. संपदा पटवर्धन यांनी केली. कार्यक्रमात एकूण १२५ सख्यांनी सहभाग घेतला.