You are currently viewing राष्ट्रसंतांना समर्पित व्यक्तिमत्व : श्री जनार्दनपंत बोथे

राष्ट्रसंतांना समर्पित व्यक्तिमत्व : श्री जनार्दनपंत बोथे

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जयंती उत्सव दिनांक 15 ऑक्टोबर पासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे सुरू झालेला आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस व राष्ट्रसंतांचे स्वीय सहाय्यक श्री जनार्दन पंत बोथे यांचा हा परिचय.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या समकालीन त्यांच्याबरोबर काम करणारे श्री जनार्दनपंत बोथेदादा आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव मंडळाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. महाराजांचे पीए म्हणून फोटोग्राफर म्हणून व केअर टेकर म्हणून त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. राष्ट्रसंतांचे कार्य हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे. आज त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या हजारो शाखा संपूर्ण भारतात कार्यरत आहेत. महाराजांचे पीए म्हणून आणि महाराजांचे फोटोग्राफर म्हणून तसेच केअर टेकर म्हणून श्री जनार्दनपंत बोथे दादा यांनी केलेले काम खरोखरच नोंदणीय आहे. त्यांनी राष्ट्रसंतांचे अनेक फोटो काढले. ती आज फारच जमेची बाजू आहे .कारण महाराजांचा जो कालखंड होता त्यामध्ये फोटो व्हिडिओ हा प्रकार फार कमी प्रमाणात प्रचलित होता. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फोटो काढण्याची जबाबदारी बोथेदादांवर दिली आणि त्यांनी ती अतिशय समर्थपणे पार पाडली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे त्यांनी अनेक फोटो काढले. त्यामुळे तो एक ऐतिहासिक ठेवा आज फोटोच्या रूपाने गुरुकुंज मोझरी येथे उपलब्ध आहे. बोथेदादांनी काढलेल्या फोटोसाठी आर्ट गॅलरी तयार होत आहे .त्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी संस्थेला प्रदान केला आहे.

गुरुकुंज मोझरी हे तीर्थक्षेत्र अमरावती नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आहे. रस्त्याच्या कडेला श्री संत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. त्यामुळे येथे पर्यटक नागरिक विद्यार्थी शाळा मोठ्या संख्येने पर्यटनासाठी दर्शनासाठी येत असतात .या सर्वांची काळजी घेणे त्यांना गुरुकुंज मोझरीचा परिचय करून देणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल माहिती सांगणे हे काम बोथेदादा मोठ्याआवडीने करतात. हे सर्व करण्यासाठी त्यांच्याजवळ कार्यकर्ते आहेत .पण बोथे दादांच्या वाणीतून राष्ट्रसंत ऐकणे ही आगळीवेगळी गोष्ट आहे. गुरुकुंज मोझरीचा परिसर भव्य आहे. या भव्य परिसरामध्ये समाधी स्थळ प्रार्थना सभागृह भक्तनिवास स्मृती भवन हे सभागृह मानव सेवा छात्रालय रसशाळा भोजनालय अनाथालय प्रिंटिंग प्रेस वृद्धाश्रम शाळा कॉलेजेस असे विविध उपक्रम चालतात. संचालक मंडळाचे अध्यक्ष श्रीमती पुष्पाताई विजयराव बोंडे ह्या असून सरचिटणीस म्हणून श्री जनार्दनपंत बोथे हे आश्रमाचा व अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य पाहतात. रोज येणारे शेकडो पर्यटक आजीवन प्रचारक गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य यांची सतत मोझरी येथे ये जा सुरू असते .त्या सगळ्यांना भेटणे .चर्चा करणे. त्यांच्या अडी अडचणी असल्या तर चर्चा करून समजून सांगणे हे सगळे काम बोथेदादा याही वयात करतात. त्यांनी आता वयाची 82 वर्षे केव्हाच पूर्ण केलेली आहेत. पण तब्येत अजूनही ठणठणीत आहे.
गुरुकुंज मोझरी हे महाराष्ट्र शासनाच्या चांगल्या प्रशिक्षण स्थळाच्या यादीत आहे. त्यामुळे येथे वेळोवेळी शिबिरे प्रशिक्षण कार्यक्रम मेळावे होतात. संस्थेजवळ सभागृह आहे .निवासी व्यवस्था आहे. भोजनालय आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या शिबिरांची प्रशिक्षण कार्यक्रमाची संख्या ही मोठी असते .
पण बोथेदादा स्वतःहून पुढाकार घेऊन आयोजकांना सर्वतोपरी मदत करतात . आश्रमाचा जो परिसर आहे तो अतिशय रम्य आहे. अतिशय स्वच्छ आहे. शिस्तबद्ध आहे .त्यामुळे या परिसरामध्ये होणाऱ्या शिबिरामध्ये प्रशिक्षणामध्ये जे लोक येतात ते येथून बरेच काही संस्कार घेऊन जातात. सगळ्यात महत्त्वाचे येथे होणारी सकाळची व सायंकाळची प्रार्थना.

ही प्रार्थना त्यांना जीवनामध्ये प्रेरणा देऊन जाते.
आमचे बरेचसे कार्यक्रम आम्ही गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात परिसरात घेतो. याला कारणही तसेच आहे. हॉल देताना भक्तनिवास देताना दादा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत नाहीत. तुम्हाला जे जमेल ते द्या .असा त्यांचा दृष्टिकोन असतो. मी येथे अंकुर साहित्य संमेलन. विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आणि ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा शिबिरे घेतलेली आहेत. आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था करणे त्यांचे चहापान करणे त्यांना सभागृहाकडे घेऊन येणे ही जबाबदारी दादा स्वीकारतात .तुमच्यामुळे आमच्या आश्रमात मोठे मोठे आयएएस अधिकारी मोठे मोठे लेखक येतात असे त्यांचे म्हणणे आहे .पण हे सर्व राष्ट्रसंतांमुळे येतात असेच मला म्हणावेसे वाटते. राष्ट्रसंतांनी ज्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली .त्याचा व्याप पूर्ण भारतभर आहे. दादांना वेळोवेळी दौरे करावे लागतात .शाखांना भेटी द्यावी लागते .कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. याही वयात ते तत्परतेने ही सगळी कामे न चुकता करतात. ते स्वतः ठिकठिकाणी गेल्यामुळे कार्यकर्त्यांना चांगले वाटते. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीला समाजाभिमुख कारणांमध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे. दरवर्षी भव्य दिव्य होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सव या गोष्टीची साक्ष आहे. या पुण्यतिथी महोत्सवाला संपूर्ण जगातून लोक येतात. त्यांचे आदरतिथ्य करणे त्यांचे भोजन निवास व्यवसाय करणे त्यांना नेण्या आणण्याची व्यवस्था करणे हे काम दादा स्वतः जातीने पाहतात .अशा या राष्ट्रसंतांना समर्पित असलेल्या व्यक्तिमत्त्वाला पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मानाचा मुजरा.

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा