You are currently viewing मंत्री दीपक केसरकर यांचा पराभव करणारच..

मंत्री दीपक केसरकर यांचा पराभव करणारच..

*काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यावर कुणाच्या धमक्यांना घाबरलो नाही..*

 

*होय मी जेलमध्ये होतो, केसरकरांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश सावंतवाडीतील गांधी चौकात करणार*

 

*विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार; माजी आमदार राजन तेली*

 

सावंतवाडी :

 

पक्षाने कारवाई केली तरी चालेल, मी दीपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही. फसव्या घोषणा, जनतेची दिशाभूल, स्वतःच्या सोयीचे राजकारण, दीपक केसरकर यांच्या भूलथापा मी जनतेसमोर समोर आणणार आहे. सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक गांधी चौकात पुराव्यानिशी उघड करणार, असा इशारा भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी सोमवारी भाजपा पदाधिकारी यांच्या भरगच्च मेळाव्यात दिला. काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर धमक्यांना घाबरलो नाही, मी कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार असेही तेली म्हणाले.

राजन तेली यांनी सोमवारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. विशेष म्हणजे या मेळाव्यास मूळ भाजपवासी आवर्जून उपस्थित होते. सर्वांची भावना हीच होती, भाजपाच्या कमळ निशाणीवर सावंतवाडी विधानसभा लढवावी जावी, उमेदवारी कोणालाही मिळो पण आम्हाला कमळ निशाणी दाबूनच मतदान करायच आहे. या मतदारसंघात शतप्रतिशत भाजपा असताना, भाजपाच्या सरपंचांवरच मित्रपक्षाच्या मंत्र्यांकडून कारवाई होत असेल तर आम्ही यांचा प्रचार का करू? असा सवालही उपस्थित करण्यात आला.

राजन तेली यांनाच उमेदवारी मिळायला हवी, अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल.
सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि सुरुवातीपासून भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या पदाधिकाऱ्यांची भावना राजन तेली हेच आमचे उमेदवार असावेत अशी होती.

माजी आमदार राजन तेली यांनी मेळाव्याला संबोधित करताना, मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात विकासाच्या मुद्द्यावर केसरकर यांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या, अन्यथा मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत दीपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही. केसरकर यांचा पराभव करणारच, असा इशाराही राजन तेली यांनी दिला. तुम्ही माझ्यासोबत रहा, अखेरच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत असेन असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा