अवजड वाहने १४ पासून बुर्डी पूल मार्गे वळविणार
सावंतवाडी
सावंतवाडी बसस्थानक येथे इलेक्ट्रिक बससाठी सर्व्हिस स्टेशन उभारण्याचे काम १४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या कामाला कोलगाव येथील विद्युत सबस्टेशन येथून वीजपुरवठा करण्यासाठी कोलगाव ते बसस्थानक मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने गटार खोदाई केली जाणार आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी एसटी बस, ट्रक, खासगी बसेस व अवजड वाहने बुर्डी पूल मार्गे वळविण्यात यावीत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. याची वाहन चालकांनी नोंद घ्यावी. सावंतवाडी आगारातून जाणाऱ्या व येणाऱ्या कुडाळ, माणगाव, आंबेगाव व मठ मार्गे वेंगुर्ले एसटी बसेस १४ ऑक्टोबरपासून बुर्डी पूल मार्गे वळविण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आगारप्रमुख नीलेश गावित यांनी केले आहे.