*भारताचे जगद्विख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाची घटना ही प्रत्येक भारतीयाचे मन दुःखाने व्याकुळ करणारी! माझ्या उद्योजकीय वाटचालीतील हा महान मार्गदर्शक हरपला!*
*आपला यावर्षीचा वाढदिवस रतन टाटांच्या स्मृतीला अर्पण, जनहिताचे कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे, मात्र कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे सोहळे साजरे न करण्यासाठी विशाल परब यांचे भावनिक आवाहन*
माझ्यासारख्या असंख्य उद्योजकांचे आदर्श असे प्रेरणास्थान असणारे रतन टाटा नुकतेच पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने या देशाची कधीही न भरून निघणारी अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण देशावर दुःखाची अवकळा पसरली असून देशभरात आठ दिवस दुखवटा पाळला जात आहे. रतन टाटा यांच्या मार्गदर्शक प्रेरणेतून आपण उद्योग क्षेत्रामध्ये झेप घेतली आणि त्यांच्याच आदर्शाप्रमाणे वाटचाल करण्याचा मी निर्धार केला आहे. रतन टाटा यांनी कधीही स्वतःची किंवा आपल्या उद्योग समूहाची श्रीमंती वाढावी यासाठी व्यवसाय केला नाही. त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जीवनशैली उंचावली पाहिजे यासाठी ६० टक्के रक्कम व्यवसाय वाढीसाठी तर ४० टक्के समाजासाठी संपत्ती खर्च केली. त्यांच्या सेवाभावी समाजकार्याचा मापदंड हा त्यांच्या औद्योगिक साम्राज्यालाही अभिमान वाटावा असा आहे. कोरोना काळात त्यांनी सरकारच्या पीएम फंडात थेट पंधराशे कोटी रुपये जमा केले, परंतु त्याचा गाजावाजाही केला नाही. माझ्याही आयुष्यात मी जे काही कमावेन, त्यातील काही हिस्सा मी समाजासाठी आणि गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी खर्च करत आलो आहे, यामागे रतन टाटांच्या प्रेरणेचा आदर्श आहे. ते या देशाचे एक अद्वितीय असे रत्न होते, आणि त्या रत्नाच्या तेजोप्रकाशात मी यापुढेही असाच माझ्या आयुष्याची वाटचाल करणार आहे, रतन टाटा पंचत्वात विलीन झाले असले तरी माझ्या हृदयात ते अंशरूपाने का होईना, पण सदोदित जिवंत राहतील, असे भावनात्मक प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी केले आहे.
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब आपल्या समाजकार्यातून प्रसिद्ध आहेत. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षात त्यांनी प्रथीतयश उद्योजक म्हणून मिळवलेले यश आणि समाजकार्यातून जनतेच्या मनात मिळवलेले स्थान हे अचंबित करणारे आहे. २०१२ सालापासून टाटा उद्योग समूहाची ते संलग्नित आहे याची बऱ्याच जणांना माहिती नसावी. रतन टाटांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे व्यक्तिगत भावविश्वही अस्वस्थ झाले आहे.
प्रत्येक वर्षी कार्यकर्त्यांकडून भव्य दिव्य कार्यक्रमांनी साजरा केला जाणारा त्यांच्या वाढदिवसानिमित्त चा सप्ताह नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेणारा असतो .आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य दिव्य कार्यक्रम ही जनतेसाठी यानिमित्ताने पर्वणी असते. यावर्षी त्यांचा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा होणार याची उत्सुकता जनतेमध्ये असताना रतन टाटा यांच्या निधनामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
श्री विशाल परब पुढे म्हणाले की रतन टाटांप्रती माझी हृदयापासूनची आदरांजली म्हणून माझा १५ ऑक्टोबर रोजी येत असलेला वाढदिवस मी कोणत्याही परिस्थितीत साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसे आवाहन मी माझ्या कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, आणि मित्रपरिवाराला केले आहे. वाढदिवसाचा सोहळा साजरा करू नये आरोग्याच्या वस्तूंचे वाटप, गोशाळा उदघाटन आदी समाजसेवेचे आणि जनहिताचे कार्यक्रम पूर्वनियोजनाप्रमाणे होतील. रतन टाटांच्या निधनानिमित्त जाहीर केलेला आठ दिवसाचा दुखवटा सर्वांनीच पाळावा. या कालावधीत येत असलेल्या माझ्या वाढदिवसाला मला बॅनरमधुन किंवा जाहिरातीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नये, वाढदिवस सोहळा म्हणून साजरा करू नये, कोणीही त्यासाठी केक कापू नये असे आवाहन श्री विशाल परब यांनी केले आहे.