आई होणे आता सोपे आहे, पण आईपण निभावणे कठीण आहे. ज्यांना नैसर्गिकरित्या अपत्य प्राप्ती होते त्यांना आपल्या पालकत्वाची जबाबदारी व भूमिका निभावणे फार कठीण असत आणि आताच्या बदल्यात सामाजिक परिस्थितीत पालकासमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.
आपल्या पाल्याचे पालन पोषण, संगोपन, शिक्षण आणि करीअर हा प्रवास करताना पालक मेटाकुटीला येतात पण ज्यांना अपत्य होत नाही त्यांच्या समस्या आणखीन वेगळ्या असतात. आपण कितीही सुधारणावादी बुरखे पांघरले तरी रूढार्थाने चालत आलेल्या सामाजिक समस्या पूर्णपणे संपल्या असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
वंध्यत्व ही अशी एक सामाजिक समस्या आहे की ज्यातून कौटुंबिक कलहाचा जन्म होतो. विवाहित स्त्रीला मुलं झाल नाही तर कुटुंबातील सदस्यांच्या जाचाला सामोरे जावे लागतेच पण समाजाच्या टोमण्यांचा आणि तोडून बोलण्याचा ञास सहन करावा लागतो. ज्या स्ञीला गर्भधारणा होत नाही यात काही शारीरिक न्युनता असू शकते तो तीचा बिचारीचा दोष नाही. यावरून काही वर्षापूर्वी एका गावात घडलेल्या घटनेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. एका गावात एका महिला मंडळाच्या कार्यक्रमासाठी अनेक महिला एकञ जमल्या होत्या. त्यापैकी एका महिलेचा सहा वर्षाचा मुलगा तिच्या बरोबर होता. मुलाच्या हातात बाॅल होता, त्याच्या बरोबर खेळत असताना त्या मुलाने तो बाॅल दुसऱ्या एका महिलेच्या चष्म्यावर मारला आणि तिचा चष्मा फुटला. रागाच्या भरात त्या महिलेने त्या मुलाला जोरात एक थप्पड मारली, मुलगा ओक्साबोक्सी रडू लागला. हे पाहून त्या मुलाची आई त्या महिलेबरोबर जोरात भांडू लागली.. भांडताना ती त्या महिलेला म्हणाली, “वांझोट्या बाईला मुलाची किमंत व प्रेम काय कळणार? अर्थात त्या महिलेला लग्न होऊन आठ वर्षे झाली तरी मुल होत नव्हत. त्यामुळे चारचौघात तीचा अपमान झाला होता. ते शब्द तिच्या जिव्हारी लागले आणि ओक्साबोक्सी रडत ती घरी गेली. आपल्या नवऱ्याला हा सगळा प्रकार सांगितला. त्याचवेळी तिच्या नवऱ्याचा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेला मिञ आला होता. त्याने त्या महिलेचं समुपदेशन केल आणि सरळ या दांपत्याला घेऊन मुंबई गाठली. उपचार सुरू झाले आणि वर्षभरातचं त्या बाईला अपत्य प्राप्ती झाली.. ही किमया होती टेस्ट ट्यूब बेबीची, आधुनिक तंत्रज्ञानाची…
सावंतवाडी शहरात यशराज मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या माध्यमातून डॉ. राजेश नवांगुळ आणि संचालिका सौ. मनिषा नवांगुळ यांनी गेल्या पाच वर्षांच्या अथक परिश्रमातून आपल्या मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये सर्व सोयीने युक्त व अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची सुविधा निर्माण केली असून येत्या १२ ऑक्टोंबरला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्याचे उदघाटन होत असून उदघाटन डॉ. नवांगुळ यांच्या आईच्या शुभहस्ते होणार असून वंध्यत्व या विषयातील गोव्यातील जेष्ठ व तज्ञ्ज डॉ. केदार पडते यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे.
मातृत्व काय असते? मुलं होत नाही म्हणून वात्सल्याची भावना दाबून ठेवणाऱ्या विवाहित स्त्रिया आता निश्चितपणे या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला जावून डॉ. नंवागुळ याना मोठ्या अपेक्षेने सांगतील “डॉक्टर, मला आई व्हायचयं”… आणि मला विश्वास आहे की, डॉक्टर नवांगुळ अशा विवाहित महिला की ज्याना अपत्य प्राप्ती होत नाही त्याचं दुःख दुर करतील..
*ॲड.नकुल पार्सेकर*
*सामाजिक कार्यकर्ता*