आजच्या तरुणाईला मानसिक स्वास्थ्याची गरज- श्री. विजय रावराणे
वैभववाडी
आजचा तरुण वर्ग वेगवेगळ्या तणावातून जात आहे. त्याला ख-या अर्थाने मानसिक स्वास्थ्याची गरज आहे असे प्रतिपादन जागतिक मानसिक आरोग्य दिन कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.विजय रावराणे यांनी केले.
दि.१० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मानसशास्त्र व सामाजिक शास्त्रे विभागाच्यावतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्र.प्राचार्य डॉ.एन. व्ही. गवळी, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे व मानसशास्त्र विभागाचे डॉ.रमेश गुलदे उपस्थित होते. आजच्या तरुणाईला मानसिक स्वास्थ्य जपण्याची गरज आहे. शैक्षणिक प्रगती बरोबरच नोकरीच्या मुलाखती करीता देखील चांगल्या मानसिक स्वास्थ्याची गरज असते. तरच मुलाखत यशस्वीपणे देता येते. अध्ययना बरोबरच तरुणांनी मानसिक संतुलन, भावनिक स्थैर्य या बाबींचा देखील विचार करावा. जीवनात सुख, शांती निर्माण करण्याकरिता ध्यानधारणा /विपश्यना केली पाहिजे, असे रावराणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.आर.एम. गुलदे यांनी केले तर तर प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रथम व व्दितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.