You are currently viewing गुलाबी रंग 

गुलाबी रंग 

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

८) गुलाबी रंग 

 

मंद मंद सुवासाचा

गुलाब फुलांचा राजा

गुलकंदाचा आस्वाद

देशी गुलाबाची मजा

 

थंडगार गुलाबजल

नेत्रांना देई थंडावा

मन करीतसे प्रसन्न

होता तयाचा शिडकावा

 

गुलाबी पक्षी फ्लेमिंगो

भुरळ घालती मनाला

थवा उडतो जेधवा

दिसे जणू अग्नीज्वाला

 

थंडीलाही म्हणती गुलाबी

रंग पाहिला का कोणी

परी आवडते सकलांना

कवी कल्पना जाणोनी

 

ऐतिहासिक इमारती

गुलाबी संगमरवरी

पर्यटनस्थळ प्रसिद्ध

‘पिंक सिटी’ जयपुर नगरी

 

युवती असो वा प्रमदा

सौंदर्याची करता स्तुती

गुलाब फुलती गुलाबी

सलज्ज कपोलावरती

 

कागदी पातळ पाकळ्या

गुलाबी बोगनवेलीच्या

शोभुन दिसती भिंतीवर

घर आणिक कुंपणाच्या

 

बालपणी पुस्तकातील

जयाने घातली मनावर भूल

गुलाबी रंगाचे का होते

गुलबकावलीचे ते फुल

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

१०-१०-२४

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा