You are currently viewing भारतमातेचा ‘सच्चा सुपुत्र’ गमावला

भारतमातेचा ‘सच्चा सुपुत्र’ गमावला

भारतमातेचा ‘सच्चा सुपुत्र’ गमावला; रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा; सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

देशातील प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला.

रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला, अशीच भावना प्रत्येक भारतीय व्यक्त करत आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आज राज्यभरात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

राज्यात एक दिवसाचा दुखवटा..

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १०) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच आज मुंबईमध्ये होणारे सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राज्य शासनाचे हे सर्व कार्यक्रम परवा घेण्यात येणार आहेत, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा