You are currently viewing नवरात्र सहावी माळ…

नवरात्र सहावी माळ…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र सहावी माळ….*

 

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”

 

*आजची सहावी माळ/ सहावे पुष्प…*

*दासी मंथरास समर्पित..*

 

“या देवी सर्वभूतेषु तुष्टी-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”

 

*मंथरा*

 

मंथरा हे रामायणातील महत्वाचे स्त्री पात्र आहे. ही राजा दशरथ यांच्या तिसऱ्या पत्नीची म्हणजेच राणी कैकयीची दासी होती. तिला कैकयीच्या पित्याने आपल्या मुलीच्या मदतीसाठी तिची नेमणूक केलेली होती.

खरं तर ती अतिशय चतुर, हुशार, चाणाक्ष आणि आपल्या स्वामिनीची हित चिंतणारी होती. मंथरा ही दिसायला जरी चांगली असली, तरी तिच्या पाठीवर कुबड होते. त्यामुळे ती वाईट दिसत होती. तिला कुबडे, कुब्जा हि म्हणले जायचे. देहाच्या या विकृतीच्या कारणाने लोक नेहमीच तिचा उपहास करीत होते, चेष्टा करीत होते आणि इतर दासी सुद्धा तिची चेष्टा करीत. आणि यामुळेच तिच्यामध्ये सूड भावना जागी झाली होती आणि आपण काहीतरी करून दाखवायचेच असं तिने ठरवलं होतं.

तिची नजर सूक्ष्म आणि कान तिखट होते. आणि बुद्धी चौकस होती. ती आपल्या कामात तत्पर होती. विशेषतः तिने आयुष्यभर आपली राणी सुखी कशी होईल हे प्रथम पाहिले.

राणी कैकयी आपल्या सवतीच्या मुलावर म्हणजे रामावर खूप प्रेम करीत होती. भरता पेक्षाही जास्त. रामांना युवराज्याभिषेक होतो आहे, याची गंधवार्ताही तिला नव्हती. पण जेव्हा तिला ही बातमी मंथरे कडून कळाली, तेव्हा कैकयी खूप आनंदी झाली. आनंदाच्या भरात ती रामाकडे पळत निघाली, पण त्याच वेळेला मंथरेनी तिला अडवले आणि तिथे तिचे कान भरायला सुरुवात केली. आणि आपले जे कर्तव्य होते ते प्रामाणिकपणे पार पाडले. ज्यामुळे रघुकुलात एक वादळ निर्माण झाले आणि होत्याचं नव्हतं झालं, त्याचं खापर मंथरेच्या डोक्यावर फोडण्यात आलं.

 

प्रौढवयीन दशरथाने कैकयीच्या पित्याला एक वचन दिलं होतं, की कैकयीच्या मुलालाच गादीवर बसवलं जाईल. परंतु जेव्हा रामाचा राज्याभिषेक करायचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळेला कैकयीला सांगितले गेले नाही आणि हीच बातमी मंथरेनी तिला वेगळ्या पद्धतीने सांगितली. रामाला जर राज्याभिषेक झाला, तर तुझ्या सवतीचे म्हणजे कौसल्याचे, की जी आजपर्यंत काही बोलत नव्हती, तिला किंमत कमी होती,…तिचं वर्चस्व वाढेल आणि ती राजमाता होईल. तुझा भरत राजा नाही होणार. त्यासाठी काहीतरी कर.

 

मंथरेनी ज्या पद्धतीने कान भरले , त्याने काही गोष्टी ती विसरली होती ते तिलाआठवले….. तिला पूर्वी राजाने दिलेले वर आठवले. एका युद्धाच्या प्रसंगी राजाने वर दिला होता, की तू मागशील ते मी तुला देईन.हा माझा शब्द आहे .ते वर तिने राखून ठेवले होते. आणि योग्य वेळ आल्यावर मला तो वर देताना नाही म्हणायचे नाही, असे वचन तिने राजाकडून घेतले होते.

 

कैकयी ने राजा दशरथाला त्या वचनाची आठवण करून दिली आणि रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवावे आणि भरताला युवराज्याभिषेक करावा अशी अट घातली. राजाच्या पायाखालची जमीन हादरली. हे वचन मोठं वादळ घेऊन आलं.म्हणजेच

रामाला वनवासाला पाठवण्यासाठी मंथरा कारणीभूत ठरली.

 

शत्रुघ्न आणि भरत जेव्हा भारताच्या आजोळहून परत आले, तेव्हा शत्रुघ्नने रागाच्या भरात कुबड्या मंथरेचे केस धरून तिला अंगणातून फरपटत ओढत नेले . त्यामुळे ती बेशुद्ध पडली. पण भरताने तिला सोडवले . या क्रूर पापी कुबडीचे कारस्थान शत्रुघ्नला अजिबात मान्य नव्हते, जिने रामाला वनवासात पाठवले.

 

वास्तविक परिस्थिती अशी होती, की कैकयीशी विवाह करताना प्रौढवयीन दशरथाने तिच्या पित्याला दिलेले वचन मोडले होते, आणि घाईघाईत लाडक्या पुत्राला युवराज्याभिषेक करून टाकण्याचा घाट घातला होता. मंथरेचे कान आणि डोळे सतत उघडे असायचे. बुद्धी चौकस होती . आणि त्यामुळेच कैकयी च्या हितासाठीच नेमलेल्या मंथरेने आपले काम चोखपणे केले. तेव्हा पुढे घडलेल्या रामायणाला ही सामान्य दासी जबाबदार धरली गेली. पण कामाच्या बाबतीत ती चोख होती. खरंतर कैकयीला यात काही वाईट दिसलंच नव्हतं . कारण ती रामावर खूप प्रेम करत होती . अनुभवी मंथरेला मालकिणीचे हे भोळेपण अयोग्य वाटते व ती तिला सावध करते. सवत राजमाता झाल्यानंतर होणारे तोटे विशद करते. तिने कैकयीचे कान भरल्याने कैकयी बिथरते आणि राजाला आपल्या वचनाची आठवण करून देते. पुढे जे घडले ते आपल्याला माहीतच आहे .

 

रामायणामध्ये मंथरा एक प्रमुख पात्र आहे तिच्याबाबतीत असं म्हटलं जातं, की रामायण मध्ये षडयंत्र आणि स्वार्थाचं प्रतिक म्हणजे ही मंथरा. जिच्यामुळे रामायण घडलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिच्यामुळेच रामाला 14 वर्षाचा वनवास घडला कारण तिने आपल्या राणीला उकसवले होते. आणि आयोध्येच्या राज्यावर संकट आले राजा दशरथाचा मृत्यू देखील घडला तो याचमुळे.

 

मंथरा बद्दल आणि काही गोष्टी आपल्याला माहित नाही त्या अशा, की मंथरा ही मागच्या जन्मीची दुन्दुभि नावाची गंधर्व कन्या होती.

मंथरा प्रल्हादाची नात आणि विरोचन राजाची पुत्री होती.

असं म्हणलं जातं की मंथरानी भगवान विष्णूचा बदला घेण्यासाठी पुन्हा पुनर्जन्म घेतला होता. भगवान विष्णूचा हा सातवा अवतार म्हणजे राम त्याला त्रास देणे हे विधीलिखित होतं. लोमस ऋषींच्या म्हणण्यानुसार द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाच्या वेळेला हीच मंथरा कुब्जा नावाने ओळखली जात होती.

 

मंथरा चे चरित्र अशा महिलेचे होतं , की रामाला वनवासास पाठवणे, या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी तिला जबाबदार धरलं गेलं. परंतु मी असं म्हणते, की मंथरामुळे पृथ्वीवरील राक्षसांचा संहार करण्यासाठी तिचा जन्म झाला होता. राम वनवासाला गेले. 14 वर्ष वनवास भोगला,पण त्या काळात अनेक राक्षसांचा आणि रावणासारख्या बलाढ्य शत्रूचा पराभव रामाच्या हातून घडला. म्हणजेच हे पवित्र कार्य मंथरानीच केले नाही का? तीच कारणीभूत ठरली ना या पवित्र कार्यात! असे ही आपण म्हणू शकतो. नक्की विचार करा जिला आपण व्हीलन म्हणतो, तीच खरी नायिका नाही का बरं ? म्हणून नवरात्राच्या या मालिकेमध्ये मी रामायणातील प्रमुख स्त्रीपात्र म्हणून तिची निवड केली.

 

आजही समाजात अशा एकमेकींचे कान भरणाऱ्या/फुंकणाऱ्या स्त्रिया आढळतात. पण ज्याने कुणाचेही भले झालेले दिसले नाही. अशा आगलाव्या कान भरणाऱ्या स्त्रियांपासून थोडे दूर राहणे चांगले, कारण या समाजाला त्या त्रासदायक ठरू शकतात.

रामायणामध्ये मंथरेचा मृत्यू हा इंद्राच्या व्रज प्रहाराने झाला असा उल्लेख आहे.

शत्रूचा संहार करणे हे पवित्र कार्य जिच्यामुळे घडू शकले, त्या स्त्रीला माझा मानाचा मुजरा

………………………………….

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

8/10/2024

प्रतिक्रिया व्यक्त करा