*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*घटस्थापना देवीचा जागर*
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना होते आणि त्या घटाची मनोभावे पूजा,आरती केली जाते. काही ठिकाणी घटात धान्य पेरून जे तृण उगवतात त्याची पूजा होते, तीच घटस्थापना!
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हे नऊ दिवस आणि नऊ रात्री म्हणजे शक्तीपीठाचा उत्सव,आदिमायेचा जागर!
हे सिंदूर वदना देवी, तुझ्या चरणकमलांचे आम्हाला स्मरण व्हावे. तुझा जयजयकार असो.सूर्याप्रमाणे तुझे तेज असून तू आमच्या मनातील अंधःकार नाहीसा करून अखिल विघ्नांपासून आमचे रक्षण करतेस.शूभ्र वस्त्र परिधान करून,हातात वीणा घेऊन तू शुभ्र कमलावर विराजमान झाली आहेस. आम्ही तुला वंदन करतो.
अशा या मनोहर देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत.
१)महालक्ष्मी,कोल्हापूर~१ पीठ
२)श्री तुळजाभवानी~तुळजापूर~१पीठ
३)रेणुकादेवी~माहुरगड~१ पीठ
४)सप्तश्रृंग निवासिनी~नाशिकजवळ नांदुरी येथे असलेल्या सप्तश्रृंग गडावर. चांदवड नामक डोंगराला सात शिखरे आहेत,म्हणून सप्तश्रृंग~१/२ (अर्ध पीठ)
महालक्ष्मी,महाकाली,महासरस्वती ही देवीची तीन मुख्य रूपे. ब्रम्हा,विष्णू,महेश या तीन देवी पुत्रांना असुरांनी फार त्रास दिला, त्यांना घोर संकटात टाकले. चंड~मुंड, मधु~कैटभ, शुंभ~निशुंभ, महिषासुर, वगैरे राक्षसांनी उच्छाद मांडून देवांचे राज्य हरण केले तेव्हा ह्या देवींनी विविध अवतार घेऊन दुष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या विजयाचा हा जागर!
मधु~कैटभांना मारले म्हणून मधुकैटभारी,चंड~मुंडांचा वध केला म्हणून चामुंडा, महिषासूरमर्दिनी, काली, दुर्गा अशी अनेक नामाभिधाने ह्या देवींना प्राप्त झाली. ह्या नवरात्रात जो चालतो तो स्त्रीशक्तीचा जागर!
स्त्री कधीच अबला नव्हती आणि नसणार हेच या देवी कथांवरून सिद्ध होते. इतिहासातील जिजामातापासून ते अगदी इंदिरा गांधीपर्यंत ज्या स्त्रिया होऊन गेल्या त्या ह्या देवीचे अवतारच म्हणावयास हवे. त्यांनी शत्रूचा निःपात केला.
सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळसारख्या महिला म्हणजे समाजभूषणच!
प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्री असते असे म्हणतात. खरेच आहे ते. स्त्रीच्या सहकार्यावाचून पुरूष घडणे अशक्यच आहे. गर्भात असल्यापासून स्त्रीच बालकाला आणि पुढे पतीलाही ती घडवतच असते. संसारात येणार्या प्रत्येक संकटाला ती धीराने सामोरी जाऊन खंबीरपणे हा डोलारा सांभाळत असते.
तेव्हा ह्या नवरात्रात आपण प्रतीज्ञा करूयात की प्रत्येक स्त्रीला आदर, मान~सन्मान मिळवून देणारच. तिच्यावर होणारा कोणताही अन्याय सहन करणार नाही. केवळ उपास~तापास, पूजा, आरती ह्यांनी स्त्रीशक्तीचा जागर होणार नाही, तर जन्माला येणार्या प्रत्येक मुलीला, स्त्रीला देवीचे महात्म्य कसे मिळेल यासाठी अथक प्रयत्न केले पाहीजेत, तोच असेल देवीचा जागर!
*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*