ना.हसन मुश्रीफ यांची सतीश सावंत यांनी घेतली भेट
ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेत निवेदन देताना सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत..
कणकवली :
कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये दौरा करत असताना रस्ते, पायवाटा यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे 25-15 व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन व विकासमधून निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. या मतदारसंघातील रस्ते व इतर विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना. हसन मुश्रीफ यांनी दिली.
कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरूस्ती, देखभाली विषयीच्या कामांसाठी सतीश सावंत यांनी मुंबईत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. विधानसभा मतदारसंघात दौरा करत असताना अनेक गावांमधील रस्ते व पायवाटांची अत्यंत खराब झालेली अवस्था दिसून येते. नागरीकांमधूनही या रस्ते व पायवाटांच्या दुरूस्ती देखभालीची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे या कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा यासाठी सतीश सावंत यांनी ना. मुश्रीफ यांचे लक्ष वेधले. शासनाच्या 25-15 योजनेंतर्गत विशेषत: पायवाटांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.
त्याचबरोबर कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील गावागावातील महत्वाच्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे सतीश सावंत यांनी सांगितले. कणकवली विधानसभा मतदारसंघातील कामांसाठी दोन्ही योजनांमधून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देत तशा सूचना संबंधित अधिकार्यांना ना. मुश्रीफ यांनी दिल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.