*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*तयारी…घटस्थापनेची…*
कधी कधी मला वाटते, आपल्याला लहानपणी जास्त समज असायला हवी होती. कारण असे की, लहानपणचे काही मनावर ठसलेले प्रसंग आठवतात, आई वडिलांचे कष्ट आठवतात व वाटते की, त्यावेळी आपण त्यांना हातभार लावला नाही व आपण लहान असल्यामुळे त्यांनी ही आपल्याला फारसे कामाला लावले नाही.सर्व बालपण आठवत नसले तरी काही प्रसंग अगदी डोळ्यांसमोर दिसतात.
उदा. आमच्या घरी कापडण्याला बसणारे” घट”.आता मला आठवते, आईची किती जीवाची घालमेल चालू असे, सारे
काही यथासांग पार पडावे म्हणून. आपण मुळातच पापभिरू असतो. त्यातून काही श्रद्धा अंधश्रद्धांचा पगडा मनावर असतोच व तो अतिशय घट्ट असतो.माझ्या लहानपणी म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी तर आजच्या पेक्षा खेडोपाडी परिस्थिती फारच वेगळी होती. सुधारणेचे वारे खेड्यातून येऊ पहात होते, पण
पगडा रूढी परंपरांचाच होता हे ही खरे आहे.
भाद्रपद संपला रे संपला की गावात बायकांची साफसफाईची लगबग सुरू होत असे. चैतन्य चैतन्य
काय असते ते आताही मला डोळ्यांसमोर
दिसते आहे. त्या वेळी पाऊस इतका लहरी नव्हता असे वाटते.श्रावणात बांधाबांधावर पिके फुलोऱ्याला आलेली असत. मूग बाजरी ज्वारी दाणेदार दिसू लागत.अहो, भुईमुगाच्या बुडख्याला शेंगाचे घुंगरू लगडलेले असत.मुगाच्या शेंगाही टंच दिसत.पक्षी भराऱ्या मारत असत.मोठे सुंदर दृश्य असे बांधाबांधावर. मी आताही मनाने आमच्या मळ्यात पोहोचली आहे. खऱ्या अर्थाने सुगीचे
दिवस येतील अशी आशा मनात पालवलेली असे.ती फुलारलेली पिके पाहून घराघरात चैतन्य ओसांडत असे.
कामाला असा काही उत्साह आलेला असे की, भाद्रपदात खळखळून दुथडी वाहणाऱ्या नदीत धुण्यासाठी घरोघरीचे गोधड्यांचे गाठोडे नदीकाठच्या वाळूवर जाऊन पडत.दररोज सासुरवाशिणी डोक्यावर पदर सावरत झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यात नऊवारीचा काष्टा पाठीमागे खोचून काठावरच्या दगडावर एकेक गोधडी भिजवून आपटायला( हो, साबण नसे, धुणे म्हणजे दगडावर आपटणेच)सुरूवात करत. अशा सर्व
गोधड्या धुवून झाल्या की मधल्या मोठ्या धारेत खळखळ वाहणाऱ्या पाण्यात त्या घट्ट पिळायच्या नि मग नदीच्या स्वच्छ वाळूत दोघी दोघींनी चार टोके पकडत त्या वाळत घालायच्या. तो पर्यंत आम्ही मैत्रीणी बाजूच्या नदीच्या बारक्या धारेत खडकाजवळ डुंबत खडकाखालून आलेले ते वाकडे खेकडे बघायचो नि दिसतील तेवढे शिरगोळे( पांढरे शुभ्र स्फटीक रांगोळी साठी) जमा करायचो. घरी आलो की थोडे भाजायचे नि आईचा ओरडा खात मोठ्या खलबत्यात घालून घरात
पसारा करायचा असा दररोज कार्यक्रम चाले.
त्या गोधड्या खडखडीत वाळेपर्यंत हातपाय दगडाने घासायचे.भिजलेले हातपाय दगडाने घासले की, ते ही पांढरे दिसायला लागत. बारके कपडे, रोजचे ते धुवायचे, वाळत टाकायचे. असा दोन तासाचा कार्यक्रम चाले. मग गोधड्या वाळल्या की,मस्त घड्या घालून मोठ्या तगारीत(पाटी, घमेले)भरून घरचा रस्ता पकडायचा.(किती कॅलरीज खर्ची पडत असतील विचार करा)मग आल्यावर भाजी भाकरी चापायची मस्त.
घरे सारवणे, पोतारणे, देवडीला रंग देणे, जाळी काढणे, घरात असतील नसतील सारी तांब्यापितळीची भांडी चिंच लोणचे लावून लख्ख करणे, अबबबबबबब! मोठ्ठी कामांची यादी असे. नदीवर तर जिकडे तिकडे पसारा दिसे.एवढी सारी अफाट कामे करून पुन्हा बायका रोजगारासाठी शेतावर कामाला जात.
मला आठवते, बायकांना एक रूपया पुरूषांना दोन रूपये रोज मिळत असे. मी हौसेने कधीतरी एखादा वख्खर लावत असे. मंडळी त्या रूपयावरही खूप खुश असत.बघा किती कष्टांचे जीवन होते तरी तक्रार अशी नव्हतीच .अंगवळणीच पडले होते म्हणाना!
आमची परिस्थिती चांगली असली तरी आईच घरातली सारी कामे पहाटे उठून करीत असे. रोज घरी दळण दळावे लागे.तिला मदतीला एक काकू यायची गरीबाघरची. गिरण्या नव्हत्या.आई म्हणायची दळायचा एवढा धाक असे की कधी कधी दळण दळून झाल्यावर पुन्हा झोप होई मग पहाट होत असे.म्हणून मघाशी मी म्हटले की, हे तेव्हा कळले असते तर कामात थोडी फार मदत केली असती ना? कसली डोंबल्याची मदत? कधी कधी आई केरसुणीने घर झाडायला सांगायची. मग काय मी हातात केरसुणी घेतली की,एक झाडू
इकडे की एक झाडू तिकडे! झाऽऽऽऽऽले माझे घर झाडून.आई म्हणायची झाले झाडून.. हो…झाले…बिच्चारी न रागवता पुन्हा हातात झाडू घेत झाडून काढायची. “कळत नव्हते ना हो…, म्हणून बरं .. असो.
माझी आई गोधड्या धुवायला आमच्या मळ्यातल्या विहिरीवर बैलगाडीत गोधड्या लादून घेऊन जात असे. ती शेतात पडद्याच्या गाडीतून (छकडे, गादी टाकून) जात असे. सालदाराच्या मदतीने ती हे काम करे. मग आमची मज्जा. आमच्या विहिरीवर तळघरात किर्लोस्कर ॲाईल इंजिन बसवलेले होते.कॅांक्रिटचे तळघर होते छान. उतरायला पायऱ्या होत्या. आम्ही तळघरात जाऊन विहिरीचे पाणी पहात असू. ती तुडुंब व झुडुपांनी वेढलेली विहीर पाहून खूप भीती वाटायची. माझे वडील काळाच्या खूप पुढे होते. शेतीसाठी त्यांचा खूप आटापिटा चाले. खर्चही फार करत असत. ते पट्टीचे पोहणारे होते. भीती हा शब्दच त्यांच्या कोशात
नव्हता. मुलांना पाठीशी बांधून विहीरीत उतरत
असत.
मशिन चालू होऊन धो धो असे
पंपाने विहिरीचे पाणी थाळण्यात पडले की आम्ही त्यात उड्या मारायच्या! थाळणे खूप मोठे होते. आमच्या उड्या व आईच्या गोधड्या बरोबरच चालत. सालदार त्या पिळू लागे. शेतात बांधावर गोधड्या वाळत घातल्या की विहिरीजवळच्या भल्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली आई सालदाराच्या मदतीने तीन दगडांची चूल पेटवायची. मग आई चुलीवर
वरण, बट्ट्या, हादग्याच्या फुलांची भाजी बनवत असे. मग सालदारासह सारे जेवायला बसत असू. काय दिवस होते हो! त्या चुलीत भाजलेल्या खरपूस बट्ट्या… अहो काय सांगू
तुम्हाला, आमची ती उघड्यावर पंगत, जोडीला
डोलणारी पिके नि वृक्ष, ते दाट घरच्या डाळीचे
वरण, त्यावर साजुक तुपाची धार.. अहाहा..
आताही तोंडात पाणी येते आहे हो…ते तुपाचे बुटले मला वरणावर धार पडतांना अजून दिसते.जेवणावर
यथेच्छ ताव मारून थकलेली मंडळी मग झाडा
खाली विसावत. लाबवर होल्याची हूऽऽऽ हूऽऽ
ची साद कानावर येत असे. नि आम्ही मस्त
लिंबाला बांधलेल्या झुल्यावर झुलत असू.
गोधड्या वाळल्या की मग पुन्हा घड्या घालणे, शेतात गवार, चवळी असे ती तोडून घेणे, असे करत बैलगाड्या पुन्हा घरी परतत असत.
पहिल्या दिवशी “घट” बसे पर्यंत घरोघर अशी जय्यत तयारी झालेली असे.मग कुंभारा कडून घट आणणे, आमच्या घरी कुंभारीण पाटी(हारा) भरून दारातच “घट” घेऊन येत असे.आई दारातच तिला धान्य देऊन घट घेत असे.मग ते घट धुणे, ज्या कोपऱ्यात ते बसवायचे ती जागा सजवणे, एक मोठा
दगडाचा खोल दिवा, ज्यात भरपूर तेल बसेल असा घासून पुसून साफ करणे, त्यात मोठ्ठी वात बनवून ठेवणे अशी तयारी
व्हायची.मग देव्हाऱ्या समोर जमिनीवर गव्हाचे आळे करून त्यावर घटात पाणी भरून तो घट ठेवायचा. त्याच्यावर एक छोटा घट ठेवायचा.घटांच्या भोवती माळा लावायच्या वर भिंतीवरून माळा सोडायच्या.घटाला रूईची माळ वरून बांधतात.छोट्या घटावर नारळ ठेवायचा. दिवा लावायचा तो अखंड १० दिवस तेवता राहिला पाहिजे. बाप रे, आई त्या
दिव्यासाठी एवढी धास्तावलेली असायची की, ते दहा दिवस ती दिव्या जवळच एक सतरंजी टाकून झोपायची.रात्रीतून २/३ वेळा वात बघायला उठायची. हे आत्ता खूप उशिरा माझ्या
लक्षात येते नि पश्चाताप होतो. तिची घालमेल दिसते व आपण काही उपयोगी पडलो नाही याचे वाईट वाटते.हळूहळू घटा खालचे गहू कोंब येऊन वाढू लागायचे व घटा भोवती हिरवागार मळा तयार व्हायचा.कोंब दहा दिवसात चांगलेच
वाढीस लागून सुंदर दिसायचे.१० दिवस पूजा, ताजी फुले, रूईच्या फुलांच्या माळा व प्रसन्नता, खूप सुंदर वातावरण असे.रात्रंदिवस
तेवणारा तो नंदादीप घरात जणू शांततेचा दूत
असे. गावात खूप घरातून घट बसविले जात.
एकूणच मोठे भरभराटीचे, प्रसन्नतेचे वातावरण
असे. त्यात आणखी संध्याकाळी गायी गुरे घरी
आली की गल्लीत हीऽऽऽऽ गडबड उडत असे.
मग ११ व्या दिवशी घट उठण्याची तयारी. किती प्रकारचा फराळ व गोल मोठ्या कडक पुऱ्या आई बनवायची. त्याचा प्रसाद चढवायची व तो वर एका जाळीवर टांगून ठेवायची.
तो टांगलेला फराळ मला दिसतो. त्या कडक पुऱ्या फक्त मला आवडायच्या.मग पुरणाचा दसऱ्याचा स्वयंपाक व घटाची सांगता होत असे.११ दिवस नुसती प्रसन्नता भरून रहात असे. घरात कसे हवेहवेसे वातावरण,आनंद ओसांडून वहात असे. दसऱ्याला तर घरोघर पुरण पोळी, खीर, भात आमटी(कटाची)
कुरड्या पापड भजी असा घमघमीत स्वयंपाक घराघरातून दरवळत असे.संध्याकाळी सिमोलंघन , सोने वाटणे कार्यक्रम,
आम्ही घरोघर सोने वाटायला जात असू.असा आनंद सोहळा दसऱ्याला समाप्त होऊन मग दिवाळीचे वेध लागत असत व आम्ही पिटीक पिटीक टिकल्या फोडायला मोकळे होत असू.
बरंय् मंडळी.. राम राम ..
आणि धन्यवाद.
प्रा.सौ.सुमती पवार
(9763605642)