आज धुळे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री विशाल नरवाडे हे आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तसेच जनमानसांमध्ये एक चांगले क्रियाशील कर्तव्यदक्ष समाजाभिमुख अधिकारी म्हणून परिचित आहेत. बहूजन समाजातील हा माणूस खऱ्या अर्थाने युवकांच्या जागृतीसाठी झिजत आहे. विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धाड तालुक्यातील सावळी या लहानशा गावात राहणारे. वडील जिल्हा परिषदमध्ये कार्यरत. राहणे भाड्याच्या घरात. घरात नळपण नव्हता. सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागत होते. विशालचे शिक्षण गावात बुलढाण्यात लातूरला आणि जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे झाले. पुढे पदवी परीक्षा पास झाली आणि विशालने एका कंपनीमध्ये इंटरव्यू दिला. विशालचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्याची मुलाखत चांगलीच झाली. कंपनीने त्याचे सिलेक्शन केले आणि त्याच्या हातात ऑर्डर सोपवली. ती ऑर्डर घेऊन विशाल घरी आला .त्याच्या वडिलाला ती ऑर्डर दाखविली. पदवी झाल्याबरोबर नोकरी मिळाली हे पाहून सर्वांना आनंद होणे साहजिकच आहे. तो आनंद झालाही. पण विशालचे वडील विशालला म्हणाले विशाल तू अजून लहान आहेस.
ज्या अर्थी तुझे या कंपनीने सिलेक्शन केलेले आहे त्या अर्थी तू जीवनामध्ये इतरही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. आपण अजून प्रयत्न करायला काय हरकत आहे. मला वाटते तुझ्या वय कमी आहे. तू नोकरीवर रुजू झाल्यापेक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेची तयारी केली तर अजून चांगले होईल. असे म्हणून त्यांनी मी माझे मी आयएएस अधिकारी होणारच हे पुस्तक विशालच्या हाती दिले. आणि विशालला सांगितले हे काठोळे सरांचे पुस्तक वाच आणि आईच्या अभ्यासाला सुरुवात कर. विशाल सुरुवातीपासूनच आज्ञाधारक मुलगा आणि विद्यार्थी होता आणि आहेही .आपले वडील ग्रामीण भागात राहून आपल्यासाठी काय करीत आहेत याची त्याला जाणीव होतीच. वडिलांनी विशालला हे पण सांगितले की हा निर्णय आपला दोघांचा आहे. आपण यशस्वी झालो किंवा आपल्याला अपयश आले तर या दोन्ही गोष्टीला आपण दोघेच जबाबदार राहणार आहोत. पण विशालच्या वडिलांच्या मनामध्ये खात्री होती की आपला मुलगा तत्पर आहे तेजस्वी आहे तपस्वी आहे. तो ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात नाम कमावेल यांची त्यांना खात्री होती .म्हणून हाती आलेली नोकरी त्यांनी विशालला नाकारण्यास सांगितले. विशाल तयारीला लागला. मनापासून सातत्याने नियोजनबद्ध तयारी केली तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे विशाल नरवाडे हे आहेत. अभ्यासावर नितांत निष्ठा असली तर आपले स्वप्न कसे साकार होते त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विशाल नरवाडे. मनापासून अभ्यास केला आणि त्याचे फळ मिळाले.आयपीएस म्हणून सिलेक्शन झाले.अगोदर आयपीएस मिळाले म्हणजे देखील खूप झाले .पश्चिम बंगालमध्ये नेमणूक झाली .तो निवडणुकीचा कालखंड होता. अनेक जणांनी आयपीएस मिळाल्यानंतर त्यावर समाधान मानले असते पण विशाल महत्त्वाकांशी होता. मी जर आयपीएस होऊ शकतो तर आयएएस काही कठीण नाही हे त्याला कळून चुकले होते आणि म्हणून त्यांनी आयपीएस आणि कार्यालयीन काम सांभाळून आय.ए.एस.च्या तयारीला सुरुवात केली. निवडणुका असल्यामुळे आणि आयपीएस असल्यामुळे कामाचा बोजा खूपच होता .पण म्हणतात ना जितनेवाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंग से करते है या नात्याने त्यांनी प्रयत्न सुरू केले. आयपीएस पास झाल्यामुळे एक आत्मविश्वास जवळ होता आणि प्रयत्न केले तर वाळूतूनही तेल काढता येते हा मंत्र त्यांना माहीत होता. आय ए एस च्या परीक्षेला विशाल नरवाडे बसले आणि नुसते पासच झाले नाही तर त्यांना अखिल भारतीय स्तरावर आयए एस च्या परीक्षेमध्ये 81 वा क्रमांक मिळाला. आयपीएस आणि त्यातही पश्चिम बंगाल सारख्या अशांत राज्याच्या पोलिस विभागाचा अधिकारी म्हणून काम करून आणि निवडणकीच्या परिस्थितीत विशालने खेचून आणलेले यश निश्चितच गौरवास्पद आहे. आयएएस झाल्यानंतर जागोजागी सत्कार सुरू झाले. विशाल आमच्या अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्येही येऊन गेले. बडनेरा येथे आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या महाविद्यालयातही विशालने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचा हा मार्गदर्शन करण्याचा सपाटा आजही सुरू आहे. पहिली पोस्टिंग मिळाली ती सांगली जिल्ह्यामध्ये .सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून. त्यानंतर परत प्रशिक्षण झाले आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी व आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी असे दुहेरी कामाचे स्वरूप होते. चांगला अधिकारी मिळाला तर ते खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवनामध्ये शासकीय योजनांची समर्थपणे पेरणी करतात. आणि लोकांचे जीवन फुलवितात.आपण शासनाचे प्रतिनिधी आहोत. शासनाने आपल्याला लोकांची कामे करण्यासाठी पाठविले आहे याची त्यांना जाणीव होते आणि म्हणून सतत कामात राहणे लोकांना भेटणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे कर्तव्य सातत्याने सुरू होते आणि सुरू राहणारही आहे. आयएएस अधिकारी म्हणून रूजू झाल्यावर विशाल सर शांत बसले नाहीत. आपलल 24 तास ते लोकांसाठी खर्च करायला लागले. आपण आयएएस झालो म्हणजे संपले असं नाही .आपल्याबरोबर इतरांनाही या परिषदेबद्दल माहिती देणे .त्यांना मार्गदर्शन करणे. त्याला मदत करणे .ही कामे विशालने मनापासून स्वीकारले. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपला कार्यक्षेत्रामध्ये विशाल युवकांना जागे करीतच होते. पण काही मित्रांच्या लग्नाला जाणारा हा युवक त्या लग्नाच्या गावातील महाविद्यालयातही स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घ्यायला लागला. मला आठवते एक वेळ मला विशाल सरांचा फोन आला. ते म्हणाले काठोळे सर मी नांदेड येथे जात आहे.माझ्या मित्राचे लग्न आहे. तुमच्या परिचयाचे एखादे महाविद्यालय असेल तर लग्नापूर्वी किंवा लग्न झाल्यानंतर मला तिथे विद्यार्थ्यांना जागे करण्यासाठी जायचे आहे. माझे मित्र आणि मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कामाजी पवार यांचे नांदेडला मातोश्री प्रतिष्ठान आहे. त्या मातोश्री प्रतिष्ठानतर्फे अभियांत्रिकी महाविद्यालय पॉलिटेक्निक तसेच शाळा कॉलेजेस चालविण्यात येतात .मी त्यांना फोन केला. आयएएस अधिकारी आपल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार हे पाहून त्यांना पण खूप आनंद झाला. त्यांनी चांगले नियोजन केले. विशाल सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. आपल्या वेळेचा विशाल सरांनी लग्नाबरोबरच महाविद्यालयात येऊन आपला वेळ सत्कारणी लावला. आता ते धुळे येथे जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धुळे हा तसा आदिवासीबहुल भाग .पण या भागातही विशाल सर मनापासून आदिवासीच्या विकासासाठी स्वतःला झोकून देत आहेत. त्यांच्या वडिलांनी त्यांना जी शिकवण दिली जे प्रोत्साहन दिले आणि जीवनाचा खरा मार्ग दाखवला त्याच मार्गावरून विशाल सरांचे ही वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या काळात विशाल सर जेव्हा पश्चिम बंगालमध्ये कार्यरत होते आणि सांगलीला जेव्हा सहाय्यक जिल्हाधिकारी होते तेव्हा ते अमरावतीपासून खूप दूर होते .पण मिशन आयएएस वर त्यांचे खरे प्रेम होते. म्हणून इतक्या दूर असूनही ते ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करीत होते. असा हा आगळावेगळा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करणारा सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारा अधिकारी आज महाराष्ट्र राज्यात धुळे येथे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आहे. लवकरच ते जिल्हाधिकारी होतील. आणि त्यांच्या कामाला अजूनही वेग येईल याची खात्री आहे .असे अधिकारी आले की ते समाजाला जागे करण्याचे काम करतात .शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळे करीत असताना विनम्रपणे तन्मयतेने तत्परतेने काम करतात. विशाल सरांना हा मंत्र गवसला आहे. आणि म्हणून या अधिकाऱ्याला उज्वल भवितव्य आहे हे वेगळे सांगणे न लगे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003