You are currently viewing सावंतवाडीत महाआरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडीत महाआरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी :

 

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे केएल ई सोसायटी बेळगाव केएलई युनिव्हर्सिटी, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि एमआरसी बेळगाव, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव व श्री समर्थ साटम महाराज ट्रस्ट दानोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते.

या तपासणी शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट रदस्य युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ .श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत सौ.रमा सावंत, संस्था सदस्य डॉ. सतीश सावंत, श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, प्रा. एम.ए ठाकूर, प्रा. आर.बी शिंत्रे, केएलई हॉस्पिटल बेळगाव चे प्रशासकीय अधिकारी डॉ. आलम प्रभू नेत्रतज्ञ डॉ. शिवानंद बुबनाळे, श्वसन विकार तज्ञ डॉ. ज्योती हट्टीवल्ली, सामाजिक कार्यकर्ते श्री नकुल पार्सेकर, डॉ.जी.ए.बुवा, ॲड. संदीप निंबाळकर तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजचा प्राध्यापक वर्ग, प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापीका सौ अनुजा साळगांवकर, सर्व शिक्षक वर्ग, सावंतवाडी परिसरातील विविध गावांमधून आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेले रुग्ण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई यांनी केले त्यांनी संस्थानमध्ये पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या काळापासून आरोग्य विषयक अनेक योजना राबविल्या गेल्या. संस्थानची आजची पिढीही अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक कार्यासाठी प्रयत्नशील आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असे ते म्हणाले.

केइलई हॉस्पिटल बेळगाव चे नेत्रतज्ञ डॉ. शिवानंद बुबनाळे यांनी सांगितले की या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने कॅन्सर , न्यूरोलॉजी, आयुर्वेदा, टू डी इको ,इसीजी युरॉलॉजी,आयुर्वेदा ,टू डी इको,डोळ्यांचे विकार, ब्लड शुगर हिमोग्लोबिन,अशा विविध चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत व येथील रुग्णांना पिवळ्या रंगाचे कार्ड दिले जाणार आहे. हे कार्ड घेऊन केएलई रुग्णालय बेळगाव येथे आल्यास त्याचे मोतीबिंदू ऑपरेशन हे मोफत केले जाणार आहे व डोळ्यांमध्ये लेंसेस बसवल्या जाणार आहेत व हे सर्व मोफत असणार आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. शिबिराच्या माध्यमातून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

केएलई रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आलम प्रभू यांनी प्रभाकर कोरे ,केएलई हॉस्पिटलच्या माध्यमातून स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी कॅन्सर, न्यूरोलॉजी अशा विविध विभागांमध्ये रुग्णांची तपासणी केली जाईल. केएलई रुग्णालयाच्या माध्यमातून या सर्व चाचण्या मोफत असतील व पुढील औषधोपचार ही मोफत देण्याचा रुग्णालय प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले की केएलई हॉस्पिटलचे डॉ.प्रभाकर कोरे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली तेव्हा ते म्हणाले होते की सावंतवाडीमध्ये महाआरोग्य शिबीराचे आयोजन करु त्यानुसार आज १५० पेक्षा जास्त डाॅक्टर्स व तज्ञ या शिबीरामध्ये सहभागी होऊन रुग्णतपासणी करीत आहेत. यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झालेले आहेत त्यामुळे केएलई हॉस्पिटल बेळगाव संपूर्ण टीमला मी धन्यवाद देतो असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. श्रीशा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. एम ए ठाकूर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा