*पैशांचे वाटप न करता जमलेली गर्दी केवळ प्रेमापोटीच*
सावंतवाडी:
सावंतवाडीतील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार गट जाहीर सभा आज सकाळी ११.०० वाजता सुरू झाली. या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सावंतवाडी उपस्थित झाले असताना सभेसाठी मात्र सुरुवातीला तुरळक गर्दी दिसत होती. परंतु जसजसा सभेत रंग चढत गेला तस तशी सौ.अर्चना घारे परब यांच्या प्रेमापोटी येणाऱ्या मतदारांची गर्दी वाढतच गेली. मतदारांना पैशाचे आमिष न दाखवता पैशाचे वाटप न करता सुद्धा केवळ प्रेमापोटी येणाऱ्या सुसंस्कृत मतदारांची आजही सावंतवाडी तालुक्यात कमी नसल्याची आजच्या जाहीर सभेसाठी झालेल्या गर्दीवरून दिसून येते. परंतु गावागावातून अर्चना घारे परब यांच्या सभेसाठी येणाऱ्या गाड्या विरोधकांनी रोखल्याची चर्चा सुद्धा होताना दिसून आली होती. परंतु सौ.अर्चना घारे परब यांच्याशी मनाने जोडले गेलेले मतदार काहीही झाले तरी सभास्थानी हजर झाले हेही नसे थोडके..
एकीकडे महिलांना देवीचा दर्जा दिला जातो तर दुसरीकडे नवरात्र उत्सव सुरू असताना आणि दुर्गा देवी, अंबा मातेची पूजा जिथे तिथे मांडली असताना एका महिलेला आपले विचार मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी रोखणे योग्य नव्हे. आपल्या पक्षाची ध्येयधोरणे, विचारधारा घेऊन येत्या विधानसभेची उमेदवार म्हणून मतदारांसमोर जाणाऱ्या सौ अर्चना घारे परब यांना मतदारांशी संवाद साधण्यासाठी रोखणे म्हणजे देवीची पूजा करणे हा दिखावाच असल्यासारखे आहे.
गेले काही महिने सौ.अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत लोकांच्या मनात आपल्याबद्दल प्रेमभावना निर्माण केली. यावेळी त्यांनी गावागावातील बचत गटाच्या महिलांना भेट देत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ताई बनून त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे गावागावातील महिला सौ. घारे परब यांच्याशी मनाने जोडल्या गेल्या. त्यामुळे मतदारांना पैशाचे आमिष न दाखवता, पैसे वाटप न करता देखील गावागावातून महिला पुरुषांनी सभेला उपस्थित होत विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळविले. त्यामुळे पैसे वाटप करून दहा हजारांची गर्दी जमविणाऱ्यांवर प्रेमापोटी येणाऱ्या हजार लोकांची गर्दी भारी पडल्याचे उपस्थितांमधून बोलले जात होते.
राजकीय सभा म्हणजे माणसी पाचशे रुपये आणि गाडी भाडे हे ठरलेलेच असते अन्यथा न पटणाऱ्या विचारधारेशी एकरूप होण्यासाठी कोणी येत नाही. परंतु जेव्हा पैसे न घेता उन्हातान्हात भात कापणीचा हंगाम सुरू असताना लोक मोठ्या संख्येने राजकीय नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी जमतात तेव्हा त्या लोकप्रतिनिधीला ती विजयाची सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. राजकीय रणांगणात सत्याने लढताना आणि देवीचा उत्सव सुरू असताना स्त्री म्हणजे देवीचे रुप असे म्हणणाऱ्या कोणीही राजकीय विरोधकांनी विचारधारेशी फारकत घेऊन स्त्रीला रोखण्याचे धाडस न केलेलेच बरे असे सभेतील गर्दी पाहून म्हणावे लागेल.