“दाम करी काम, त्यावरच होईल मतदान”….
पूर्वी उमेदवाराचे चारित्र्य, त्याची विश्वासार्हता, पारदर्शीपणा, त्याचा मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास, लोकांशी सुसंवाद राखून प्रश्र्न समजून घेऊन ते विधानसभेत मांडणे, सरकारी योजना खरोखरच लाभार्थ्यांना मिळतात की नाही हे पहाणे अशा प्रकारे काम करणाऱ्या उमेदवारांना मतदार स्विकारत असत. अर्थात त्या काळातही सर्वच अलबेल होत अस नाही… पण आजच्या निवडणूका ज्या वातावरणात आणि ज्या पद्धतीने लढवल्या जातात ते पाहिलं की आमच्या सारख्या मतदारानी पवित्र मत देण्यासाठी का जाव? हा प्रश्न पडतो. मताचं पावित्र्यच संपलय.
ज्या पक्षाच्या विचारधारेवर आपण निवडणूक लढतो ती विचारधाराच फाट्यावर मारून स्वार्थासाठी चार चार पक्ष बदलणारे, सत्तेच्या जोरावर गडगंज संपत्ती करणारे. सत्तेतून पैसा आणि त्याच पैशातून पुन्हा सत्ता, याच पैशाच्या जोरावर बेरोजगार तरूणांच्या झुंडी पोसणारे , आपल्या पुढच्या शंभर पिढ्यांची तजवीज करणारे आणि निवडणूकीत लुटलेला सार्वजनिक पैसा पाण्यासारखा वापरुन निवडणूका जिंकणारेचं उमेदवार राजकीय पक्षांना हवे असतात. काळाच्या ओघात थाॅट लिडर लुप्त झाले आणि पैशाच्या जोरावर मास लिडर उदयाला आले.
मतदारही क्षणिक मोहापायी या अशा उमेदवारांनी मांडलेल्या बाजाराला बळी पडू लागले. विविध जातीचे, समुहाचे, धर्माचे नेते निवडणूकीच्या काळात जातीच्या व धर्माच्या नांवावर आपल्या तुंबड्या भरण्याचं काम करतात. शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत मांडलेला बाजार ही या प्रक्रियेतील अतिशय न्यूनतम पातळी होती.. त्यामुळे नेहमी प्रमाणे या निवडणूकीतही पैशाचा महापूर येणार आणि आपली तथाकथित जनकल्याणासाठी निर्माण केलेली लोकशाही त्यात वाहून जाणार…
दाम करी काम हेच नागडं सत्य आहे ते नाकारून चालणार नाही.
… अॅड. नकुल पार्सेकर..