*विकास : महाराष्ट्र आणि गुजरात! का दिसतोय लक्षणीय फरक राजकारणात?*
एक छोटासा किस्सा, पण गोष्ट छोटी… डोंगराएवढी!!
काल सिंधुदुर्ग नगरी मधील वसंत स्मृती सभागृहात भाजपाच्या सोशल मीडिया प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. गुजरात राज्यातील डॉ.पंकज शुक्ला यांच्या प्रवास दौऱ्यातील हा कार्यक्रम होता. गुजरातची सोशल मीडिया ही देशातील प्रभावी सोशल मीडियातील प्रभावशाली कार्यप्रणाली असणारी एक मीडिया आहे. डॉ.पंकज शुक्ला यांच्या बैठकीतील मार्गदर्शनानंतर सर्वांनाच कळून चुकलं की ती तशी का आहे. नरेटीव्ह, कमांड असल्या अवघड शब्दाचाही वापरही कोणी करायची गरज नाही असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं. सोशल मीडिया म्हणजे अफाट तंत्रज्ञान हा मुद्दा खोडून काढत त्यांनी सोशल मीडिया किती प्रॅक्टिकली मॅन्युअल आहे हे पटवून दिलं. त्यांनी ज्या टिप्स दिल्या त्याचा वापर केला तर भाजपाच्या सोशल मीडियाच्या जवळपासही इतर पक्षांची मीडिया पोहोचू शकणार नाही. अगदी छोटे छोटे टास्क आणि एक सक्षम मीडिया त्यातून पुढच्या महिन्याभरातच आतच तयार होऊ शकते, फक्त ते टास्क पूर्ण व्हायला हवे आणि त्यासाठी कोणीतरी एका नेत्याने त्याकडे जबाबदारी म्हणून पाहायला हवे. मला या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचा मान दिला त्याबद्दल भाजप सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे मित्र श्रीकृष्ण उर्फ राजू परब यांचे मनापासून आभार मानतो.
कालच्या बैठकीनंतर डॉ. पंकज शुक्ला यांच्याशी काही अनौपचारिक चर्चा झाल्या, त्यात पंकजजी म्हणाले की मी पाहतोय की महाराष्ट्रात बहुतांशी व्यक्ती केंद्रित राजकारण चालते. आपल्या आपल्या नेत्यांभोवती केंद्रित होणारे कार्यकर्ते इथे दिसतात. गुजरात मध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही. तिथले कार्यकर्ते पक्ष म्हणून अतिशय शिस्तबद्ध आहेत आणि पक्षाच्या निर्णयाशी बांधील असतात. नेत्यांनभोवती फिरण्याऐवजी आपल्या कामावरती त्यांचे लक्ष केंद्रित असते. पक्षाचा निर्णय महत्त्वाचा. समजा पक्षाने एका रात्रीत सर्व मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांसह बदलायचे ठरवले, तसा निर्णय जाहीर झाला, तर एका रात्रीत तो शांतपणे अमलात आणला जाईल. अर्थातच अशा निर्णयाच्या पक्षावर काहीही फरक दिसणार नाही, कार्यकर्ते अशा परिस्थितीत आपले काम चालू ठेवतील.
यानंतर मी महाराष्ट्राचा तसेच महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणाचा विचार कितीतरी वेळा मनातच करत राहिलो. पक्षाची सोशल मीडिया असो किंवा संघटना असो, नेत्याच्या निर्णयाभोवती आपले अस्तित्व बांधणारी ही यंत्रणा आहे. आपल्या नेत्यांशी बांधील राहणे हीच इथली निष्ठा आहे, हेच वास्तव आहे.
गुजरातमधील पक्ष संघटनेचा विचार करता, तव एकीचा जरा स्पर्श दे, तव निष्ठेचा एक अंश दे एवढं मनात जरी आलं….
महाराष्ट्रात चाललेल्या, अपरिहार्य बनलेल्या राजकीय खिचडीतून राज्याचीही सुटका होईल आणि एका खऱ्या टप्प्यावर भारतीय जनता पार्टीलाही परिवर्तनानंतर खरा विकास साधता येईल.
बाकी… अशक्य ही शक्य करतील स्वामी! मन मे है विश्वास!!
*— अविनाश पराडकर, प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र प्रदेश*