*मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण* …राजेंद्र घावटे
माय मराठी ला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा मुकुट ल्यालेली , तुकोबांच्या गाथेचा मळवट भाळी भरलेली, एकनाथांच्या भागवताची पैठणी नेसलेली अशी ही माय मराठी ! सकल संतांच्या पंक्तीने अलंकृत आहे. राष्ट्रपुरुष व समाजधुरीण यांच्या कार्याचा वारसा जोपासणारी आणि शिवरायांच्या स्वराज्याची पताका खांद्यावर घेऊन ती डौललदारपणे वर्षानुवर्ष भारत वर्षामध्ये वावरते आहे. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा मुळात अभिजात आहेच. या गोष्टीला उशीर झालेला असला तरी सरकारचे मनःपूर्वक आभार मी व्यक्त करतो. आज ज्या भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे त्यामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा म्हणजे मराठी आणि बंगाली….. भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आणि जगामध्ये दहाव्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा…. दहा कोटी लोकांची भाषा खऱ्या अर्थाने मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. आणि या भाषेचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा ही सर्व मराठी जनांचीवअपेक्षा आहे. आता अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेचा प्रसार आणि प्रचार जास्त जोमाने होईल. भाषेचं साहित्य इतर भाषांमध्ये जाईल आणि संपूर्ण जगामध्ये मराठी भाषेच्या वैभवाची ओळख नव्याने निर्माण होईल. आपण सर्वांनी ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा म्हणून आग्रहाने मराठीचा वापर वाढवणे गरजेचे आहे. आपली भाषा जोपासत ती वृद्धिंगत होण्याचा संकल्प या निमित्ताने करू या !
– राजेंद्र घावटे
– अध्यक्ष : पिंपरी चिंचवड साहित्य मंच
– 8888434331