You are currently viewing प्रवृत्ती आणि निवृत्ती

प्रवृत्ती आणि निवृत्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी श्री.पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*प्रवृत्ती आणि निवृत्ती*  

 

प्रवृत्ती म्हणजे प्रपंचासक्ती. प्रपंचाबद्दलची आसक्ती, ओढ, आकर्षण, मग्नता.

प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडल्याशिवाय मला आनंद मिळणार नाही. असा जर विचार मनात आला तर त्याला ज्ञानेश्वर माऊली *’निवृत्ती’* म्हणतात.

वास्तविक हा विचार फार महत्वाचा आहे. हा विचार आणि संन्यास यात तत्वता फरक नाही.

*या ठिकाणी प्रत्यक्ष विधीवत् संन्यास स्वीकारणे अपेक्षित नसून *संन्यस्त वृत्तीने प्रपंचात राहणे अपेक्षित आहे.

ज्यांना मोक्ष हवा आहे, अशांच्या बाबतीतच हे घडते. प्रवृत्ती-निवृत्तीचे द्वंद्व मुमुक्षुंनाच त्रास देते. मुमुक्षु म्हणजे मोक्ष मिळाविण्यास उत्सुक, प्रयत्नशील असणारा.

परमार्थशास्त्राप्रमाणे साधकाचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ही त्याला मोक्षाकडे नेणारी हवी. आपण मुमुक्षू आहोत ही पक्की खूणगाठ मनात हवी. हे विसरल्यास परमार्थ हा फक्त छंद होऊन राहतो आणि शास्त्राला हे अभिप्रेत नाही. हे असे बहूतांशी साधकांच्या बाबतीत व बऱ्याच प्रमाणात घडते. *परमार्थ हा छंद नसून मोक्षासाठीची वाटचाल आहे* हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

*धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या वर्णाश्रमाला धरून जे जीवन व्यतीत होते, त्याला प्रवृत्तीलक्षण धर्म आणि संन्यासाश्रम घेतल्यानंतरचे जे जीवन त्याला निवृत्तीलक्षण धर्म असे म्हणतात.*

*ब्रह्मचर्य व गृहस्थाश्रम मधे प्रवृती जास्त प्रमाणात प्रभावी असते. वानप्रस्थाश्रमात ती निवृत्ती कडे झुकते. तर सन्यास आश्रमात ती पूर्णपणे निवृत्तीत असणे आश्रम पद्धतीमध्ये अपेक्षित आहे.*

प्रपंचाचे ओझे वाटण्याचे पहिले कारण “मी कर्ता आहे’ ही भूमिका आहे. परमार्थाची वाटचाल करताना “मी कर्ता नाही’ हे वाक्य सर्वांनी पाठ केलेले असते परंतु ते खोलवर रुजले नसल्याने वारंवार सांगावे लागते. आठवण करून द्यावी लागते. हे वास्तव आहे. “आत्मरूप मी कर्ता नाही तर जीवरूप मी कर्ता आहे’ हा फरक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी जीव कशाला म्हणतात आणि आत्मा कशाला म्हणतात हेही जाणून घेणे गरजेचे आहे.

*शास्त्र असे सांगते की जीव हा जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांचा भोक्ता आहे व आत्मा हा तीनही अवस्थांचा साक्षी आहे*

*त्वं अवस्थात्रयातीतः संदर्भ : श्री गणपती अथर्वशीर्ष.*

आत्मा या तीनही अवस्थांच्या पलिकडचा आहे व मी आत्मा असल्याने मीही तिन्ही अवस्थांच्या पलिकडचा असणे आवश्यक आहे. हा विचार किंवा हे तत्व पक्के झाले पाहिजे. आपल्यामध्ये “मी कर्ता, मी भोक्ता’ ही भूमिका खोलवर रुजलेली असते व त्यामुळेच आपण सर्व दुःख व ओझी स्वतःवर लादून घेतो. याचे पृथ:करण करता आले पाहिजे. त्यासाठी *जीव आणि आत्मा* हा विषय समजून घेतला पाहिजे. तो समजून घेता आला पाहिजे. कर्ता, भोक्ता, साक्षी, द्रष्टा या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे.

शास्त्र असे सांगते, की साक्षी असणारा खरा मी कर्ताही नाही व भोक्ताही नाही. शास्त्र जे सांगते ते प्रमाण आहे ही श्रद्धा बाळगून त्यानुसार आचरण करणे याला ‘विवेक’ म्हणतात. ह्या विवेकाचा विचार सतत जपणे हा साधनेचा महत्वाचा भाग आहे. हा विचार सुटला तर साधना ठोकळेबाज होते. केवळ औपचारिकता होते. सकाळ संध्याकाळ माळ जपणे, पोथ्या वाचणे, तीर्थयात्रा करणे अशी साधना चालू राहते. अर्थात ही साधना नाही असे नाही. या सर्व गोष्टी जर *निष्कामपणे* केल्या तर चित्त शुद्ध होईल हे नक्कीच, पण वस्तूची म्हणजेच अंतिम उद्दीष्टाची प्राप्ती होणार नाही. ही सर्व साधने काही एका मर्यादेपुरतीच उपयोगी आहेत. विवेकचूडामणी या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की *”वस्तुसिद्धीर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।’*

*मी ब्रहम आहे हा अनुभव केवळ विचाराने येणारा आहे. कोटी कोटी कर्म करूनही तो कधी येणार नाही.* आणि या ठिकाणीच साधकांची फार अडचण होते. एखादे व्रत-वैकल्य, उपासना, जप असे काहीतरी करावयाची साधकांची तयारी असते. फक्त विचार करावयाची व तो जपण्याची तयारी नसते.*वस्तुतः विवेकाचा विचार सतत जपला तर प्रपंचाचे ओझे वाटणार नाही.*

*जीव कर्ता असल्याने कर्माचे कर्तृत्व जीवाचे आहे व मी आत्मा असल्याने ते माझे नाही, हे सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे.* अन्यथा वारंवार पाठांतर करूनही जर कर्माचे कर्तृत्व घेतले तर माझा प्रपंच चांगला झाला, बिघडला, वाईट झाला, इत्यादी यशापयशाचे ओझे तयार होते किंवा प्रपंच असाच करेन, असा करणार नाही इत्यादी प्रकारचा आग्रह तयार होतो. हे कर्तृत्व जीव स्वतःवर लादून घेतो. साक्षित्व राखले तर प्रपंचाचे ओझे वाटण्याचे कारण उरणार नाही.

*प्रवृत्ती म्हणजे आपण कोणत्या विषयात रस घ्यावा, त्याला प्रवृत्ती म्हणतात. आणि निवृत्ती म्हणजे कोणत्या विषयात आपण रस घेणार नाही, किंवा सोडून देण्याचा प्रयत्न करू.त्याला निवृत्ती म्हणतात.*

प्रवृत्ती आणि निवृत्ती. एका उदाहरणाने हे आपण समजून घेऊ यात. साखरेचा एक दाणा आहे आणि मुंगीला माहित आहे की तो साखरेचा दाणा आहे. ती त्यामागे धावतेय. ती म्हणजे प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे मी माझे आयुष्य अशा प्रकारे पार केले आहे, पण प्रत्यक्षात ती माझी जीवनातील प्रगती नाही. मी जीवनाचा हा मार्ग बंद केला पाहिजे. मी आध्यात्मिक अनुभूतीकडे जावे. तो निवृत्तिमार्ग आहे.

 

…… *पांडुरंग कुलकर्णी नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा