You are currently viewing नवरात्र दुसरी माळ…

नवरात्र दुसरी माळ…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र दुसरी माळ…*

 

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”

 

आजची दुसरी माळ/ दुसरे पुष्प…

देवी सीता मातेला समर्पित..🙏

 

“या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”

 

सीता

 

सीता मिथिला नगरीच्या राजा जनकाची मुलगी.असे सांगितले जाते, की राजा जनकाला शेत नांगरत असताना ही बाळ अवस्थेत सापडली.भूमिकन्या म्हणून राजा जनकाने हिला पोटच्या पोरी प्रमाणे सांभाळली वाढवली.

 

 

ब्रम्हवैवर्त पुराण नुसार असे सांगितले आहे, की सीता ही रावण आणि मंदोदरी ची पुत्री होती.जिला रावणाने ती लहान असताना समुद्रात फेकून दिली होती. समुद्रदेवी वरुणीने तिला वाचवून धरती मातेकडे सोपवली होती. आणि मग ती मिथिला नरेश राजा जनकास नांगरत असताना सापडली. हे सारे विधिलिखित होते. असो.सीतेला माता लक्ष्मीचा अवतार ही मानले जाते.

 

सीता ही अतिशय तेजस्वी, बुद्धिमान व सुंदर देखणी अशी कन्या होती. पहाता क्षणी कुणी ही प्रेमात पडेल, असे दैवी सौंदर्य तिला लाभले होते.

 

पुढे योग्य समयी राजा जनकाने तिला ऊत्तम साजेसा व वीर पती मिळावा म्हणून तिचे स्वयंवर मांडले होते. त्या समयी अयोध्या निवासी राम यांनी हे स्वयंवर जिंकून, सीता हिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.आणि ती आयोध्यावासी राजा दशरथ व माता कौसल्या यांची सून बनली. पुढे राज्याभिषेकानंतर ती राजा श्री प्रभू राम यांची एकमेव पत्नी आणि अयोध्या नगरीची सम्राज्ञी बनली.

 

जिच्या नशिबी जन्मा पासून भोग लिहिलेले असतात, अशांना अनेक संकटांना सामोरे जायची विधाता एक शक्ती देत असावा.

 

रामाची पत्नी म्हणून तिने सासरी सर्वांना प्रेमाने जिंकले होते. ती एक आदर्श पतिव्रता पत्नी, आदर्श सून, आदर्श भावजय आणि आदर्श बहीण होती.तिच्या लहान तिघी बहिणी देखील सख्या जावा म्हणून या घरात एकाचा वेळी प्रवेश करून आल्या होत्या…

राणी कैकयीची ही आवडती सून होती.

वनवासाला जाण्यापूर्वी तिला वल्कले अजिबात नेसता येत नव्हती , म्हणून ती रडत होती, तेंव्हा रामाने तिला वल्कले नेसावयाला घेतली…तेंव्हा राजा दशरथ आणि इतर ऋषीमुनींनी आणि बाकी स्त्रियांनी हरकत घेतली,की वनवास तर फक्त रामाला आहे….मग फक्त त्याने वल्कले नेसावित, सितेला हे बंधन कारक नाही…म्हणून सीतेला आवश्यक दागिन्यांसह वस्त्रे नेसून वनवासाला जाण्याची अनुमती मिळाली…पुढे हेच दागिने सिताहरण प्रसंगी ती आकशमार्गाने जातं असता ,एकेक करून खाली टाकत गेली.आणि त्यामुळेच तिचा नेमका मार्ग कळायला आणि तिला शोधायला सोपे गेले.

 

रामाला ज्या प्रकारे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखतात, त्या प्रमाणे सीतेला आज ही आदर्श पतिव्रता म्हणून ओळखले जाते .

पण या पतिव्रता स्त्रीला अनेक घोर परीक्षा द्यायला लागल्या. वनवास तर रामाला भोगायचा होता, पण या पतिव्रता स्त्री ने राजदरबार, सुख सुविधा, धन दौलत ..सुरक्षित कवच या साऱ्यांचा त्याग करत आपल्या पतिव्रता धर्मानुसार पती रामा बरोबर वनवासात गेली . आहे त्या परिस्थितीत राहायची तयारी दाखवली आणि निभावली ही. ती इतर सामान्य स्त्री प्रमाणे वनवासात राम लक्ष्मण सह कुटी बनवणे, आग तयार करण्यासाठी जंगलातून लाकडे तोडून आणायला ही मदत करत होती..कंदमुळे देखील तोडून आणायला मदत करत होती. म्हणजे गृहिणी म्हणून कार्य बजावत होती. शिवाय रामाची सेवा ही करत होती.

 

लंकेत अशोकवाटीका मध्ये असताना आपले शिलरक्षण, सहनशीलता, साहस आणि आपल्या धर्माचे ही पालन करत होती. रावणाने तिला हरप्रकारे म्हणजे साम, दाम,दंड, भेद नुसार आपलेसे करण्याचा प्रयत्न केला ,पण ती बधली नाही…दटून विरोध केला. रावणाला जवळ ही येऊ दिले नाही, कारण तिला रावणाच्या शक्ती आणि वैभावासमोर आपल्या पती रामाच्या प्रती त्यांच्या शक्तीवर जास्त विश्वास होता. तिला खात्री होती, की राम आपल्याला या संकटातून नक्की वाचवतील.

 

जेंव्हा हनुमान सीतेला भेटायला येतात,त्यावेळी ती त्यांना यायला एवढा विलंब का होतोय ,मला विसरले तर नाहीत न म्हणून विचारते…त्यावेळी हनुमान म्हणतात त्यांना समुद्र पार करायला विलंब होतोय..आपल्याला जर असे वाटत असेल, तर मी आपली तयारी असेल तर आज च प्रभू श्रीरामजी पर्यंत आपल्याला पोहचवतो. आपल्याला सुखरूप नेतो.आपली हरकत नसेल तर माझ्या बरोबर येता का..

परंतु सीता याला नकार देते ..कारण रामाशिवाय कोणत्याही पर पुरुषाचा स्पर्श तिला नको होता .आणि रामावर तिची खात्री होती .

 

पुढे युद्ध संपल्यावर विजयी होऊन आल्यावर आयोध्येत त्यांचे जंगी स्वागत होते . आणि काही दिवसात एका प्रसंगाने सीतेला परत वाल्मिकी ऋषींच्या आश्रयाला त्यांच्या आश्रमात जावे लागते,ज्यावेळी ती गरोदर असते…रामाने त्याग केला हे खूप उशिरा कळते तिला. या सर्व गोष्टींचा हिला त्रास नसेल का हो झाला?

 

एका पतिव्रता स्त्रीला अग्नीपरिक्षा द्यावी लागते. १४ वर्षे वनावास भोगावा लागतो…बलाढ्य शत्रूने अपहरण केल्याने त्याच्या तावडीत २वर्षे स्वतःला संभाळून, स्वत:चे शिल रक्षण करून रहावे लागते…ते ही एकटीने साता समुद्रापार…

 

आणि घरी परतल्यावर अग्नीपरिक्षा…अरे काय हे! किती ती विटंबना एका पतिव्रता स्त्री ची..! तरी तिला न सांगता आपल्या भावा समवेत वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राम तिला पाठवतो, ते ही गरोदर असताना, आणि कायमचे.

 

सीता हे जाणून होती, की गरोदर पत्नीचा परित्याग करणारे श्रीरामही अतिशय दुःखी झाले आहेत. विरह वेदनेने ते व्याकुळ आहेत, याची तिला जाणीव होती. आपल्या शीला विषयी रामांच्या अंतकरणात कलुषित भाव मुळीच नाही, हे ती जाणून होती. या वेळेला तिचे हृदय विशाल झाले होते. सिंहासनाच्या इभ्रतीची काळजी होती. त्याचा मान राखावा म्हणून ती रामांना दोष देत नाही. राजाला कठोर कर्तव्याला नेहमीच सामोरे जावे लागते, याची तिला जाणीव होती, म्हणून वनापर्यंत सोडायला आलेल्या लक्ष्मणाला ती म्हणते,

” भाऊजी माझे हे शरीर फक्त दुःख भोगण्यासाठीच परमेश्वराने निर्माण केले आहे. माझ्या इतकी दुःखी स्त्री जगात कोणी असेल काय?”

 

जेंव्हा अश्वमेध यज्ञ करताना लव कुश यांची रामाची गाठ पडते आणि दरबारात येतात.त्यावेळी परत एकदा ही मुले माझी असल्याचे सिद्ध कर म्हणून राम सांगतात…. म्हणजे पवित्र असल्याचे सिद्ध करायला सांगतात. त्यावेळी वशिष्ठ ऋषी आणि वाल्मिकी ऋषी ही सांगतात, की ही पवित्र आहे….पण राम लोकांनी परत काही बोल लावू नयेत, म्हणून मानत नाही.

त्यावेळी सीता हात जोडून बोलते,

 

” हे धरती माते ,जर मी पवित्र असेल, आणि श्रीरामा शिवाय दुसरा विचारही जर माझ्या मनात आला नसेल, तर हे देवी वसुंधरे! तू मला आपल्या उदरात घे. माते मला सामावून घे.”

 

आणि क्षणार्धात धरणीमाता दुभंगते आणि सीता त्यात अंतर्धान पावते.

 

काही मतांनुसार सीता माता ने उत्तराखंड मधील फलस्वाड़ीगावात भू — समाधी घेतली होती.

 

आपल्याला वाटते तितके या स्त्रियांचे जीवन सोपे नव्हते. अनेक तप करून त्यांना या पदाला पोहचावे लागलेले दिसते .

 

सीता भारतीय स्त्रीचा आदर्श आहे. त्याग, सहनशीलता, पातिव्रत्य यांचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे सीता होय. आपल्या दृष्टीने जे काही शुभ, जे काही शुद्ध, जे काही पुण्यमय, त्या सर्वांचा आम्हाला सीता या शब्दाने बोध होत असतो. त्यामुळे तिच्याविषयी वाटणारी श्रद्धा, आदर व्यक्त करण्यासाठी मी नवदुर्गा या शृंखलेत सीता मातेचा सन्मान केला आहे.

 

देवांमध्ये ज्याप्रमाणे अरुंधती त्याचप्रमाणे सीताही प्रशंसेला पात्र असून पतीव्रता स्त्रियांमध्ये गणना करण्याच्या योग्यतेची आहे. लक्ष्मी स्वरूप असल्याने आम्हाला प्रिय आहे. अशा या पातिव्रत्य सीतेला माझा मानाचा मुजरा.

 

“या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”

 

………………………………………..

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा