*स्वतः व्यसनापासून दूर रहा*- सुनिल अवसरमोल
वैभववाडी
आज समाजातील बहुसंख्य व्यक्ती वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या आहेत.
पारंपरिक व्यसनांबरोबरच नवीन व्यसनांमध्ये मोबाईलचा वापर हा एक व्यसनाचाच प्रकार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः व्यसनापासून दूर राहून व्यसन संस्कृतीला विरोध केला पाहिजे असे मत वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुनील अवसरमोल यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि दि.२ ते ८ ऑक्टोबर व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त वैभववाडी तालुका स्तरीय आयोजित पोस्टर व रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. स्पंदन विभागाच्या भित्तिपत्रकाचे सज्जन काका रावराणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन सुनील अवसरमोल यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भजन संध्या हा कार्यक्रम सादर केला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे, वाभवे- वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रतिक थोरात, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्जुन नरोटे, पोलीस उपनिरीक्षक फर्नांडिस, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा समन्वयक अर्पिता मुंबरकर, अध्यक्ष श्रावणी मदभावे, उपप्राचार्य डॉ.एम.आय.कुंभार उपस्थित होते.
यावेळी श्री.सुनिल अवसरमोल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांनी व्ससनासारख्या वाईट गोष्टींपासून दूर राहून अभ्यास,वाचन व खेळ यासारख्या गोष्टींकडे लक्ष देऊन जीवनात यशस्वी झाले पाहिजे.
नशाबंदी मंडळाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि व्यसनमुक्ती सप्ताह २ आक्टोबर ते ८ आक्टोबर २०२४ या सप्ताहाच्या निमित्ताने वैभववाडी तालुकास्तरीय समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग, पोलीस ठाणे वैभववाडी आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी यांच्या सहकार्याने नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत इयत्ता ८ वी ते १० वी साठी व्यसनमुक्तीवर चित्रकला स्पर्धा आणि ज्युनिअर व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात होते.
तालुक्यातील सात माध्यमिक विद्यालयातून ७३ पोस्टर आणि दोन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी २१ रांगोळी काढल्या होत्या.
*चित्रकला स्पर्धा*
*निकाल पुढील प्रमाणे*
१)प्रथम कु. वैष्णवी गणेश हवळ
अ.रा. विद्यालय वैभववाडी.
२)कु. ओंकार शिवदास कदम.
अभिनव विद्यामंदिर सोनाळी.
३) कु. आराध्य कमलेश इस्वलकर.
सरदार सावंत माध्यमिक विद्यालय नाधवडे.
या विजयी स्पर्धकांना अनुक्रमे रु.३०१/-, २०१/- व १०१/- सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
*रांगोळी स्पर्धा*
*निकाल पुढील प्रमाणे*
१) कु. वैष्णवी गोपाळ पाटील
आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी.
२)कु. श्रावणी महेश सुतार.
३)कु. पायल प्रदीप लिंगायत.
हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी.
या विजया स्पर्धकांना अनुक्रमे रु.५०१/-, ३०१/- व २०१/- सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी डॉ.अर्जुन नरोटे यांनी व्यसन व त्यांचे विविध परिणाम याबाबत माहिती दिली. सज्जनकाका रावराणे यांनी या विधायक कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन असे प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत असे सांगितले.
व्यसन हा एक आजार असून त्याची वेगवेगळी रुपे आहेत. या पासून दूर राहणे हाच एकमेव उपाय आहे असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.संजीवनी पाटील, श्री.मंदार चोरगे व श्री.सतीश मदभावे यांनी काम पाहिले.
पोस्टर स्पर्धेचे पारितोषिक प्रा.एस.एन. पाटील यांनी तर रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक श्री. गजानन पाटील यांनी पुरस्कृत केले होते. पोलीस ठाणे वैभववाडी यांच्यावतीने सन्मानचिन्ह देण्यात आली.
या कार्यक्रमाला पोस्टर व रांगोळी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी, शाळांचे शिक्षक, पालक, पोलीस कर्मचारी, नगरपंचायतचे कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अर्पिता मुंबरकर यांनी केले तर या तालुकास्तरीय स्पर्धेचा उद्देश अध्यक्ष श्रावणी मदभावे यांनी विशद केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीवनी पाटील यांनी केले व प्रा.एस.एन. पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. शेवटी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.