You are currently viewing पहिले पुष्प

पहिले पुष्प

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

पहिले पुष्प🙏

*नवरात्…पहिली माळ….*

 

*”सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”*

 

 

आज पासून नवरात्र सुरू होतेय.

गेले दोन वर्ष मी या दिवसात अनेक स्त्रियांवर लेख लिहिले आहेत.आज असाच एक नवीन उपक्रम मी घेऊन येत आहे.

या वर्षी आयोध्येत श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली…या निमित्ताने मी रामायण हा विषय निवडायचे ठरवले..

आज पासून मी रामायण मधील प्रमुख स्त्रियांवर लिहायचं ठरवलं आहे.

आज आपण रामायणातील प्रमुख स्त्रियांवर थोडा प्रकाश टाकणार आहोत..

 

*”या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।*

*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”*

 

कौसल्या माता

 

माता कौसल्या ही कोसल देशाची (आताचे छत्तीसगढ) राजकुमारी होती , म्हणून तिचे नाव कौसल्या. तिचा जन्म छत्तीसगढ मधील रायपूर जिल्ह्यातील चंदखुरी या छोट्या गावात झाला होता.आज ही तिथे माता कौसल्याचे मंदिर बघायला मिळते. तिथे बाळ श्रीराम यांना मांडीवर घेतल्याची मूर्ती आपल्याला बघायला मिळते.हे कौसल्या मातेचे एकमेव मंदिर आहे

आयोध्या निवासी सूर्य वंशाचे राजा दशरथ यांची प्रथम पत्नी आणि रामायण या हिंदू महाकाव्याचा नायक प्रभू श्री राम याची माता कौसल्या, जिने कोसलावर तिची राजधानी अयोध्येतून राज्य केले.

अयोध्येची राणी होती. ती कोसल देशाच्या भानुमत् राजाची कन्या होती. दशरथापासून तिला राम नावाचा पुत्र झाला.

 

माता कौसल्या आपल्या पूर्वजन्मी स्वयंभू मनु ची पत्नी शतरुपा देवी होती असा पुरावा पुराणात आहे.

राजा दशरथ याला एक ही मूलबाळ नव्हते.राजा आणि तिन्ही राण्या त्यामुळे दुःखी होत्या. माता कौसल्या आणि राजा दशरथ यांनी भगवान विष्णूलाच पुत्र रुपात येण्यासाठी मोठी घोर तपश्चर्या केली होती.

ऋषिमुनिंच्या सांगण्यावरून राजा दशरथ यांनी पुत्रकामेष्टि यज्ञ, जो हिंदू धर्मात संतान प्राप्ति साठी करण्यात येणारा एक विशेष यज्ञ आहे.याचा अर्थ आहे पुत्र प्राप्तीच्या इच्छेने केलेली यज्ञ आहुती.

हा यज्ञ ऋषि ऋष्यशृंग व श्रृंगी ऋषि ने संपन्न केला होता.

यज्ञ समाप्त झाल्यावर त्यातून एक अग्नीदेवता प्रकट झाली.त्याच्या हातात एक सुवर्ण पात्र होते.त्यात पायसम म्हणजे खीर होती. ती खीर सर्व देवांनी मिळून बनवली होती. ती खीर तिन्ही राण्यांनी वाटून खायची होती.मग पुत्र प्राप्ती होईल हा आशीर्वाद दिला.सर्व राण्यांनी खाल्ली.

राजा दशरथ ने पुत्रकामेष्टि यज्ञ केल्याने या मुळेच राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुध्न यांचा जन्म झाला होता.

माता कौसल्या यांना रामाची माता होण्याचा मान मिळाला. हाच राम पुढे श्रीराम म्हणून ओळखले जाऊ लागले.

श्रीराम हे विष्णूचे सातवे अवतार म्हणून मानले जातात.एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, एक आदर्श पती, एक पत्नीव्रत, आयोध्येचा आदर्श राजा…म्हणून लौकिक मिळवला होता..अशा आदर्श रामाची ही आदर्श माता कौसल्या ही आपल्या सर्वांना वंदनीय आहे.

रामायणातील प्रमुख नायक व्यक्तिरेखेची आई ही तितकीच महत्वपूर्ण आहे म्हणून तिला मानाचा मुजरा….

 

प्रभू श्रीराम वनवासाला निघण्यापूर्वी आपल्या पिता दशरथ व कौसल्या मातेस नम्रपणे वाकून नमस्कार करतात . आपल्या पिताश्री दशरथ राजास म्हणाले,

” पिताजी, ही माझी माता कौसल्या आता वृद्ध झाली आहे. ती उदार , प्रेमळ असून कधी ही कुणाची ही तिने निंदा केलेली नाही. तिच्यावर आता पुत्रशोकाचा प्रसंग आलेला आहे. तिचा योग्य तो सन्मान करून सांभाळ करावा. पती कडून सन्माननीय वागणूक मिळाल्यावर तिला पुत्र वियोगाचे फारसे दुःख होणार नाही. ह्या माझ्या तपस्विनी मातेला सांभाळा, नाहीतर ती प्राणत्याग करेल.”

धन्य तो पुत्र आणि धन्य ती माता…आपल्या मुलाला कसे संस्कार दिले कौसल्याने ते या एका छोट्या प्रसंगातून दिसून येते.

 

आज आपली मुले अशीच रामासारखी आदर्शवत असावी ,असे प्रत्येक आईचे स्वप्न असते…अशा अनेक कौसल्या माता आज समाजात आहेत, ज्यांनी आपल्या मुलांवर लहानपणापासून खूप छान संस्कार केले आहेत आणि अजून ही करत आहेत.

देवीच्या या उत्सवात आज पहिली माळ समाजातील अशा सर्व कौसल्या समान मातांना समर्पित करते.

………………………………………………..

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा