You are currently viewing सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादीच लढणार

सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादीच लढणार

*महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना घारे परब*

 

*शिवस्वराज्य यात्रा शनिवारी सावंतवाडीत*

 

सावंतवाडी :

 

संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण असून आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते व अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी आम्हाला आदेश केला आहे, ”कामाला लागा, कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ लढवायचा आहे.!”. त्यामुळे येत्या शनिवारी ‘शिवस्वराज्य यात्रा’ घेऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महाराष्ट्राचा बुलंद आवाज व खासदार डॉ. अमोल कोल्हे सावंतवाडीत येणार आहेत. सावंतवाडीच्या प्रसिद्ध गांधी चौकात त्यांची सभा होणार असून याच ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण  महिला अध्यक्ष अर्चना घारे – परब यांच्या ‘जाणीव जागर’ यात्रेचाही समारोप होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.

सावंतवाडी येथील पर्णकुटी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते व माजी मंत्री प्रवीण भोसले, कोकण महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे परब, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, युवती महिलाध्यक्षा सावली पाटकर, युवक अध्यक्ष ऋत्विक परब यांसह अन्य उपस्थित होते.

सावंतवाडी मतदारसंघाची परिस्थिती ‘जैसे थे’ – अमित सामंत

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत पुढे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात असलेल्या तीनही तालुक्यात अर्चना घारे – परब यांनी जाणीव जागर यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना जाणून घेत येथील वस्तुस्थितीचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. येथे आमच्या पक्षाला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद लाभला असून आम्हाला येथे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी चांगले वातावरण आहे. तब्बल तीन वेळा या मतदारसंघांनी आमदार केलेल्या व सध्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी या मतदारसंघाची परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच ठेवली आहे. स्थानिक आमदार जनतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले असून येथील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ते कमी पडले आहेत. मात्र आता आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीच्या हाती सत्ता येणे गरजेचे असल्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लढविण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व आधारस्तंभ शरदचंद्र पवार साहेबांनी आम्हाला सूचना केली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अर्चना घारे – परब यांच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत, असेही सुतोवाच श्री. सामंत यांनी केले.

 

मंत्री केसरकर आता केसरकर नसून ते मुंबईकर : प्रवीण भोंसलेंचा जोरदार टोला

यावेळी उपस्थित असलेले माजी मंत्री व ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले म्हणाले ज्या अपेक्षेने मंत्री दीपक केसरकर यांना येथील जनतेने तब्बल तीन वेळा आमदार केले. त्यातील साडेसात वर्ष ते मंत्री आहेत. मात्र त्यांना येथील जनतेसाठी वेळ नाही. मंत्री केसरकर आता केसरकर नसून ते मुंबईकर आहेत, असे सांगत त्यांनी मंत्री केसरकर यांच्या एकूण कारकिर्दीबद्दल टीका केली.

 

जनतेच्या डोळ्यात असलेले अश्रू पाहून वेदना होतात : अर्चना घारे – परब 

यावेळी अर्चना घारे परब यांनीही मनोगत व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने येथील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीनही तालुक्यात जनतेला भेटण्याचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. येथील युवकांना रोजगार नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना गोवा व मुंबईची वाट धरावी लागते. सत्ताधारी युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यात अपयशी ठरल्यामुळे येथील परिस्थिती बिकट आहे. अनेक घरांना कुलूप लागले जाण्याची शक्यता आहे. जनतेच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत मात्र ते पुसायला सत्ताधारी मंडळींना वेळ नाही. महिला, युवती, शेतकरी, मच्छीमार बांधव या सर्वांच्या मूलभूत प्रश्नांना सोडविण्यासाठी येथील मंत्र्यांनी व आमदारांनी प्रयत्न केले नसल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. ‘जाणीव जागर यात्रे’च्या निमित्ताने येथील जनतेच्या डोळ्यात असलेले अश्रू पाहून प्रचंड वाईट वाटले, असे सांगत असताना अर्चना घारे – परब यांचेही डोळे पाणावले होते.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब, युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला विधानसभा अध्यक्ष नीतीषा नाईक, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला शरअध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कृषी सेल अध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवती विधानसभा अध्यक्ष सुनीता भाईप, युवक तालुकाध्यक्ष ऋत्विक परब, उद्योग व्यापार विभाग तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, युवती तालुकाध्यक्ष सुधा सावंत, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय भाईप राजेंद्र वाघाटे, सुजल शेलार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा