You are currently viewing लेकीचं घर हेच वयस्कर आईचं माहेर.

लेकीचं घर हेच वयस्कर आईचं माहेर.

लेकीचं घर हेच वयस्कर आईचं माहेर…किती ह्रदयस्पर्शी कल्पना…पुण्याच्या प्रसिध्द निवेदिका विनया देसाई यांचा हा लेख जरूर वाचा…डोळे आणि मन भरून येईल तुमचं माझ्याप्रमाणे…आईच्या आठवणीने…

……सहस्र चंद्र पाहिलेली,तितकेच श्रावण पाहिलेली आई, अनेकदा माहेरपणाला माझ्या कडे येतें तेंव्हा श्रावण नसला तरी तिचं येणं हे प्रत्येकवेळी आनंदाचा श्रावण असतं.
यायच्या आधी कॅलेंडर पाहिलेलं ,कुठला बेत करायचा,काय वाचायचं ,काय आणायच,कुणाला भेटायचं सगळं सगळं ठरवलेलं असतं. माझ्या घराच्या चाळीस पायऱ्या चढून ती सावकाश येते,मग कुंड्या बघणार ‘किती ग तुळस छान आलीय,गुलाब सुकला पाणी घालायचं विसरू नको,मला सूचना करत पिशवीतून वाळलेल्या गोकर्णाच्या दोन शेंगा काढून कुंडीत लावताना म्हणते कशी, निळी गोकर्ण आहे ग,छान वेल येईल बघ.
निळी गोकर्ण पेरून छान फुलांची वाट बघणारी तिची नऊवारी मधली मूर्ती मला मूर्तिमंत प्रसन्न श्रावण वाटते.मग तिचे माहेरपण सुरू गरम चकोल्या म्हणजे वरणफळ, शेपू किंवा अंबाडीची भाजी भाकरी,कधी बाहेर इडली डोसा पार्टी सगळं ठरलेलं.
अमृतांजन,काळ्या मनुका,डोक्याचं तेल या वेळी वेगळं घे ग,अश्विनी छान आहे वाचलंय मी,छोटा पावडर डबा ,सगळी मनाजोगी खरेदी झाली की आई खुश ,पुन्हा आनंदाचा श्रावण भेटतो मला.
पण …..या वेळी मात्र मला वेळ देत नाहीस,डायरीत तुलाच निवेदनाला लागेल म्हणून लिहिलेलं वाचल नाहीस,स्वेच्छानिवृत्ती कसली ग तूझी तू सारखी कशात तरी गुंतलेली आहेसच, बस जरा किती करतेस सगळ्यांच म्हणत मला जवळ बसवलं’सारखी परदेशी जाऊ नकोस,आता कुठेच चैन नाही पडत ,डोळे झरझर वाहत होते तिचे हे बोलताना.
मी तिच्या पाठीवरून हात फिरवला ,किती बरं वाटलं तिला ,आत्ता मला कुठेही जायचं नाहीय बसू गप्पा मारत,ती खुलली ,मग अभंग डायरी वाचन लेख वाचन झालं ,पुन्हा चहा झाला.श्रावण नूर बदलला होता
आई आली की मला तिच्यासाठी वेळ देता यावा म्हणून पूर्ण मोकळीक देणार माझा नवरा विश्वेश पण चहाला आलेला.त्याचे आईचे छत्र पाचव्या वर्षीच हरवलेलं,त्याला हे खूप अप्रूप वाटायचं.
रात्री आईला शांत झोपलेली पाहून संध्या छाया भिवविती हृदया चा अर्थ ध्यानात आला.माझ्या डोळ्यातून श्रावणधारा वाहू लागल्या.
आईच्या प्रत्येक इच्छेला पूर्णत्वाला न्यायचं हा माझा वार्षिक नेम मी पुन्हा दृढ केला.आईच माहेरपण करायला मिळणं या पेक्षा सौभाग्य ते कोणतं ?
विनया देसाई
*संग्रह#अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा