You are currently viewing स्वतःतील कलागुणांना ओळखून संधी देणे गरजेचे – प्रा. जगदीश संसारे

स्वतःतील कलागुणांना ओळखून संधी देणे गरजेचे – प्रा. जगदीश संसारे

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

‘प्रत्येक व्यक्तीत काहीना काही गुण असतात फक्त ते ओळखणे गरजेचे असते. स्वतःतील कलागुणांना ओळखून संधी देणे गरजेचे आहे’, असे मत सेंट जोसेफ महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक जगदीश संसारे यांनी व्यक्त केले. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयातील माजी विद्यार्थिंनी समिती आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन २०२४-२५च्या निमित्ताने ‘वेध भविष्याचा’ या मार्गदर्शनपर व्याख्यानाच्या निमित्ताने ते बोलत होते. सदर कार्यक्रम २९ सप्टेंबर २०२४ रोजी आभासी पद्धतीने घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनीं आर. जे. माधवी पवार हिने ‘तू बुध्दी दे’ या गीतापासून केली. जीवनात यशस्वी होणे प्रत्येकाच्याच हाती आहे असं नाही, पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाहीत. स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवे, असे मत प्रा. जगदिश संसारे यांनी व्यक्त केले. “आज अनेक विद्यार्थिनी शिक्षण, सांस्कृतिक, सामजिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत आणि या यशामागे महाविद्यालयाचे संस्कार आहेत, हे विसरून चालणार नाही.” असेही ते म्हणाले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की आणि माजी विद्यार्थिंनी समितीच्या समन्वयक डॉ. सरिता कासरलकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‌ मराठी विभाग प्रमुख डॉ. रश्मी शेट्ये तुपे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले.या कार्यक्रमात ४० माजी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा