You are currently viewing प्रतिभा आणि प्रतिमांची” चिंतनशील साहित्यकृती “…. ॲड. नकुल पार्सेकर

प्रतिभा आणि प्रतिमांची” चिंतनशील साहित्यकृती “…. ॲड. नकुल पार्सेकर

“प्रतिभा आणि प्रतिमांची” चिंतनशील साहित्यकृती “…. अॅड. नकुल पार्सेकर
अॅड. विलास पाटणे दक्षिण कोकणातील प्रतिभावंताच्या मंदियाळीतील सर्वज्ञात असलेले नांव. फक्त विधी क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, पञकारीता अशा विविध क्षेत्रातील सतत वळवळणारा किडा( creative worms)म्हणून ज्यांच्याकडे पहातो ते माझे जेष्ठ मिञ व मार्गदर्शक अॅड विलास पाटणे. काही काळ मी भारतीय जनता पक्ष आणि संघपरिवाराचं काम केल्याने त्यांचा माझा स्नेह जुळला. त्या प्रतिकुल परिस्थिती काम केलेले अनेक जुने जाणते आदर्श कार्यकर्ते आजही माझ्या संपर्कात आहेत हीच माझी कमाई.
विविध सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले असून त्यांना वाचनाचा दांडगा व्यासंग आहे. अक्षरप्रकाश,सापडलेले आकाश, संचित, पारिजात, न्या. रामशास्त्री प्रभुणे(ज्याचा इंग्रजी अनुवाद देशाचे माजी कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी केलेला आहे) झाशीची राणी, ही त्यांची प्रकाशित पुस्तके तर वेळोवेळी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा वृत्तपत्रातून चालु सामाजिक व राजकीय घडामोडींवर लेखन करत असतात.
त्यांच्या या ग्रंथसंपदेत आणखीन एका अतिशय मौल्यवान पुस्तकाची भर पडलेली आहे. दिनांक १४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. अभयजी ओक यांच्या शुभहस्ते आणि विधी क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देशातील न्यायपालिकेत आपल्या उतुंग बुद्धिमत्तेच्या जोरावर एक आगळा वेगळा इतिहास निर्माण करणाऱ्या दुर्मिळ व्यक्तिमत्वाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळही अधोरेखित करणाऱ्या अॅड विलास पाटणे यांनी लिहिलेल्या “प्रतिभा आणि प्रतिमा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
बदलते जग, बदलता समाज, बदललेली गुन्हेगारी, बदलतं राजकारण आणि त्या अनुषंगाने बदललेली न्यायपालिका आणि या न्याय पालिकेत वावरताना नवोदित वकिलांना हा इतिहास माहित व्हावा आणि त्या अनुषंगाने दिशा मिळावी,प्रेरणा मिळावी यासाठी हे पुस्तक एक मेजवानीच आहे.
भूतकाळात होवून गेलेले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्या. छगला, न्या. हंसराज खन्ना, न्या. यशवंतराव चंद्रचूड, राज्य घटनेचे तज्ञ नानी पालखीवाला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , मानवाधिकारचा आग्रह धरणारे साली सोराबजी यांच्या पासून अगदी वर्तमान काळातील हरीश साळवे, मुकुल रोहतगी, अभिषेक मनू सिंघवी अशा अनेकांच्या न्यायपालिकेत अभूतपूर्व खटल्यांचा उहापोह या पुस्तकात लेखकाने केलेला असून ज्या न्यायपालिके बाबत आज संशयाच वातावरण केल जात अशावेळी न्यायपालिकांचे शुध्दीकरण करण्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक खरा चेहरा दाखवणारा आरसा आहे.
हे पुस्तक आपल्या जिल्ह्यातील वकील वर्गापर्यंत पोहचावे त्यांनी ते वाचावे अशी मनापासूनची इच्छा लेखक अॅड विलास पाटणे यांनी व्यक्त केली आणि म्हणूनच शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पंचम खेमराज विधी महाविद्यालय सावंतवाडीच्या वतीने या पुस्तक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला असून देशाचे अक्षय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्रीपादजी नाईक यांच्या शुभहस्ते होणार असून मा. युवराज लखमराजे भोसले व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप भारत हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वकिल बंधू- भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले व कार्यक्रमाचे संयोजक अॅड नकुल पार्सेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा