*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गणित आयुष्याचे….*
चढ संपला आयुष्याचा
उतार आता झाला सुरू
राहिलेल्या इच्छा आकांक्षा
साऱ्याच आता पूर्ण करू
खाचखळगे काटेकुटे
मागे पडली ती सारी
पुढच्या वळणावर दिसू लागली
बाग आता फुललेली
पूर्वार्ध सरला सारा आता
उत्तरार्ध हा झाला सुरू
सूर्यास्ताला काय भ्यायचे
स्वागत त्याचेही हसत करू
आयुष्याचे गणित असे हे
पायरीपायरीने सोडवायचे
अधिक उणे चूक बरोबर
सारेच आता विसरायचे
किती सरले किती उरले
हिशोब करणे नव्हे बरे
दिवस मजेत गेला आजचा
नाही उद्याचे काही खरे
@अरुणा गर्जे
नांदेड