सावंतवाडी :
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लोकांसाठी अनेक निर्णय लादण्यात आले आहेत, गावागावातील जत्रोत्सव देखील गाव मर्यादित ठेवण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यात आले आहे. तरी देखील लोकांनी कोविडच्या मर्यादेचे पालन करत जत्रोत्सव साध्या पद्धतीने करण्यास प्राधान्य दिले आहे. नाताळ सणासाठी परदेशातून आलेल्या लोकांची यादी गोळा करण्याची प्रशासनाची तयारी आहे, ब्रिटन मधून आलेले नागरिक यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. परंतु या सर्व परिस्थितीचा विचार करता आणि कोविडच्या नव्या विषाणू पासून जनतेस सुरक्षित राहण्याचे आवाहन करायचे आणि सावंतवाडी शहराला लागून असलेल्या मळगाव येथील जत्रोत्सवात जुगाराला मुभा देऊन कोरोनाच्या प्रसाराला सुद्धा वाव द्यायचा हा दुपट्टीपणा का?
मळगाव येथे आज होत असलेल्या जत्रोत्सवात अगदी बिनधास्तपणे जुगाराचे पट बसले आहेत, तीन पानी जुगार सुद्धा जोशात सुरू आहे. शहराच्या सीमेपासून काहीच अंतरावर असलेल्या गावातील जत्रोत्सवात जुगार सुरू असल्याने या बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या जत्रोत्सवातील जुगाराला कोणाचा आशीर्वाद लाभला आहे याची जोरदार चर्चा मळगाव जत्रोत्सवात सुरू आहे.
एकीकडे कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे आर्थिक लाभासाठी जुगारासारख्या अवैध आणि कोरोनाचा प्रसार अगदी सहजरित्या होणाऱ्या धंद्यांना प्रोत्साहन द्यायचे म्हणजे *तू मार मी रडल्यासारख्या करतंय* यातलाच प्रकार असल्यासारखे वाटत आहे.